राज्यात वादळी पावसाचा दणका

पाऊस
पाऊस

पुणे : राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असतानाच अनेक भागांत वादळी पावसाने दणका दिला आहे. शुक्रवारपासून सकाळच्या उन्हानंतर दुपारी ढग दाटून येत पडणाऱ्या मुसळधार सरींनी सोयबीन, मका, कपाशीसह खरिपाची पिके, द्राक्षांसह फळबागांना दणका दिला आहे. रविवारी (ता. ६) दुपारनंतर पुणे, नगर, सोलापूर, नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली तालुक्यांत मुसळधार पाऊस पडला. तर हिंगोली: वसमत तालुक्यातील काही गावांत गारांचा पाऊस झाला. 

रविवारी (ता. ६) दुपारी परभणी शहरसह पुर्णा, सेलू परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. जालना जिल्ह्यातील पातूर परिसरात  सेवली शिवारात शेतात काम करत असताना वीज पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यात आलमगाव परिसरात वादळी पावसाने कपाशी जमिनीवर आडवी झाली. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वाऱ्यासह पाऊस पडल्याने कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकात पाणी साचले. हणेगाव (ता. देगलुर) येथे वीज कोसळून दोन गाई, दोन म्हशी ठार झाल्या. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, बीड, केज, आष्टी, किल्ले धारुर भागांत अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.  

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने मोठा फटका बसणार आहे. बागलाण तालुक्यात पावसाच्या तडाख्यात मोसम आणि करंजाड खोऱ्यातील पूर्व हंगामी द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन काढणीसाठी आलेला द्राक्ष माल खराब झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दिंडोरी तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २) पावसाने झोडपून काढले. तळेगाव, खतवड, गणेश गाव, ढकांबे परिसरात कमी वेळात पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आले. सटाणा बाजार समितीमध्ये व्यापारी वर्गाने खरेदी केलेल्या कांदा उघड्यावर असल्याने भिजला. कळवण, देवळा, बागलाण तालुक्यात मक्याचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून शनिवार पाणी सोडण्यात आले. वीज पडून जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. फुलोऱ्यात आलेल्या भात पिकासाठी रब्बी परेण्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने कांदा रोपे, सोयबीन, काकडी, मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोंथिबीर, झेंडू, शेवंती व इतर फुले पिकांचे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक परिसराला विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपले. 

नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने ज्वारीसह इतर पिकांना लाभ होणार आहे. नगर तालुक्‍यातील पूर्व भागातील पावसाने काढणीला आलेल्या बाजरीच्या पिकाला काहीसा फटका बसला आहे. पारनेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी नवीन लागवड केलेल्या कांदा पिकांचे नुकसान झाले असले तरी तूर, मका व इतर काही पिकांना चांगला दिलासा मिळणार आहे. श्रीरामपूर तालुक्यात पावसाने शेतात सोयाबीन, मक्‍यासारखी पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, रब्बीच्या पेरण्यांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे.  

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस पडला. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये वादळी वाऱ्यामुळे कपाशी, तूर, ऊस पिके आडवी झाली. काढणी सुरू असलेले सोयाबीन भिजल्याने नुकसान होणार आहे. रविवारी (ता. ६) दुपारी परभणी शहर तसेच परिसरात विजांच्या कडकडात पाऊस झाला.

रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : 

कोकण : कर्जत ६५, माथेरान ४६, पोलादपूर ६७, सुधागडपाली ५४, देवगड ३३, दोडामार्ग ५७, कणकवली ४४, कुडाळ ४१, सावंतवाडी ४९, वैभववाडी ५२, अंबरनाथ ६१, उल्हासनगर ३४.

मध्य महाराष्ट्र : संगमनेर ६७, श्रीरामपूर १०७, चंदगड ५५, गडहिंग्लज ४०, दिंडोरी ३१, हर्सूल ८१, इगतपुरी ४०, नाशिक ३४, ओझरखेडा ८१, सटाना ४४, येवला ५९, बारामती ५२, पौड ३१, वडगाव मावळ ३०, आटपाडी ५४, जत ६४, विटा ३९, वाई ३१, अक्कलकोट ३१.

मराठवाडा : खुलताबाद २२, वैजापूर २८, बदनापूर ५२, घनसांगवी ३५, शिरूर अनंतपाळ २५, जाफ्राबाद २५, कळंब ४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com