crop damage
crop damage

पावसाचे धुमशान सुरुच 

राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी अधिक होत आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे शेताला नद्यांचे स्वरूप येत आहे.

पुणे   ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी अधिक होत आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे शेताला नद्यांचे स्वरूप येत आहे. त्यातच अनेक भागांत सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतातच मूग, सोयाबीन, बाजरी पिकांना कोंब फुटू लागल्याची स्थिती आहे. 

रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे. अधूनमधून पडणाऱ्या ढगफुटीसारख्या पावसाने भातशेतीची कामे खोळंबली आहेत. मुसळधार पावसाने नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी सायंकाळी उशिरा मुसळधार पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात पुराचे पाणी साचले असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुराचे पाणी घुसल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. रायगड, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हा, गाढी, सुर्या, जगबुडी, वाशिष्टी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

मध्य महाराष्ट्रातही जोर  पुणे, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत उन्हासह काही वेळा ढगाळ वातावरण होऊन जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सलग होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. वादळामुळे ऊस, कपाशी पिके आडवी झाली असून बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. सांगलीतील तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. पावसामुळे मुठा, भीमा, कोयना, कृष्णा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खानदेशात पावसाचे प्रमाण कमी असून अनेक भागात पावसाचा शिडकावा होत आहे. 

मराठवाड्यात जोर ओसरला  मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील तीन मंडळात अतिवृष्टी रूपात बरसणार पाऊस 54 मंडळात तुरळक हलका, मध्यम ते दमदार स्वरूपात बरसला. जिल्ह्यातील जुने कायगाव येथे मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. परिणामी पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या राहत्या घरात शिरले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्याची नासाडी झाली असून भीत खचली असून चूल विझल्याने रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. सोयाबीन, कपाशी, हळद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात कोथळा येथे दुधना नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने गोदावरी, शिंदफणा, पूर्णा या नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  वऱ्हाडात बुलडाणा, अकोला जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मागील तीन दिवसांत सातत्याने पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी दुपारी संग्रामपूर, जळगाव, जामोद, तेल्हारा तालुक्यात काही भागांत जोरदार पाऊस झाला. अकोल्यातही ढगांच्या गडगडासह पावसाच्या सरी पडल्या. रोजच्या पावसामुळे या भागात काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. कापसालाही फटका बसला आहे. अमरावतीमध्ये पाऊस झाला ढगाळ वातावरण असून काही भागात संततधार असल्याने सोयाबीनला कोंब फुटले आहे.  मंगळवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)  कोकण ः वेंगुर्ला २६०, मालवण २५०, रामेश्वर २४०, दोडामार्ग १५०, कुडाळ १४०, मडगाव, पेडणे, फोंडा १३०, म्हापसा १२०, केपे, सांळंगे, वाल्पोई ११०, देवगड १००  सावंतवाडी ९०, कल्याण, कणकवली, लांजा, रोहा, उल्हासनगर ७०, अंबरनाथ, माथेरान ६०, रत्नागिरी, वैभववाडी ५०. 

मध्य महाराष्ट्र ः दिंडोरी १००, अक्कलकुवा, अकोले ८०, चांदगड, खेड, विटा ७०, गिरणा धरण, कवठे महाकाळ, नेवासा ५०.  मराठवाडा ः शिरूर अनंतपाळ ९०, हिंगोली ८०, औरंगाबाद, कळमनुरी ६०, गंगापूर, खुलताबाद, पाटोदा ४०.  विदर्भ ः कुही ९०, भामरागड ५० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com