नाशिक जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाचे आगमन

नाशिक जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाचे आगमन
नाशिक जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाचे आगमन

नाशिक : नाशिकमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर दिंडोरी, मालेगाव, नांदगाव, निफाड व येवला तालुक्यांत पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले.  सोमवार (ता. २३) दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील टोमॅटो पिकांसह द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. वणी परिसरात अडीच तासात ५६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक भागांत नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिंडोरी तालुक्यात वणी शहर व परिसरात पावसाने चांगलेच झोडपून काढले. पुराचे पाणी घर व गोदामामध्ये शिरल्याने मोठी आर्थिक हानी झाली. येथील रावळा जावळा डोंगर सप्तशृंगगडाच्या पर्वतरांगा मार्कंडेय पर्वत सतीचा कडा या ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. उंच सखल भागात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वणी, मावडी, मुळाणे, बाबापुर, संगमनेर, भातोडे, चंडिकापूर तसेच वणी कळवण रस्त्यावरील शेतककऱ्यांना या पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. चालू हंगामात दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने टोमॅटो व द्राक्ष अशी नगदी पिके आहेत. द्राक्ष बागेत पाणी साचून राहिल्याने घड जिरून जाण्याची भीती, पोंगा अवस्थेतील पावसामुळे डाऊनीचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. टोमॅटो लागवडी व द्राक्षबागांमधून पाणी खळाळून वाहिले. या पावसामुळे विहिरी पूर्णत: भरल्या असून नद्या नाले दुथडी भरून वाहिले. शेतीकामाला सुरळीत होत असतानाच पावसाने कामाचे नियोजन बिघडवले आहे. 

कसमादे पट्ट्यात जोरदार पाऊस  कसमादे पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. मालेगाव शहर व तालुक्यात रविवारनंतर सोमवार (ता. २३) जोरदार पाऊस झाला. पुनंद व चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा नदीला पूर आला आहे. कसमादे पट्ट्यातील केळझर, हरणबारी, पुनंद ही धरणे पूर्णपणे भरली आहेत. गिरणेच्या पुरामुळे चनकापूर उजवा व डावा कालवा भरून वाहत आहे. त्यामुळे कसमादे पट्ट्यातील ५२ पाणीपुरवठा योजनांना त्याचा लाभ होण्याचे चित्र आहे. देवळा तालुक्यात खर्डे, वरवंडी, वाजगाव या भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com