सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मसुरे, जुवा बेट परिसरातील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले आहे.
सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कायम Heavy rains continue in Sindhudurg
सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कायम Heavy rains continue in Sindhudurg

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मसुरे, जुवा बेट परिसरातील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. नदीनाले दुथडी भरून वाहत असून, जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गावर पुराचे पाणी असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. शेती, बागायतीमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे.   जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. मालवण तालुक्यातील पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. गडनदीला पूर आल्यामुळे खोत जुवा, मसुरे जुवा या बेटावरील ग्रामस्थांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. घरांसभोवतील पुराचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ग्रामस्थांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील अनेक ग्रामस्थांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील स्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. मसुरेचा संपर्क तुटला असून, गडनदीचे पाणी पात्राबाहेरून वाहत असल्यामुळे मसुरे कावावाडी, टोकळवाडी, उसलाटवाडी यासह बांदिवडे, सय्यदजुवा, भगवंतगड या भागातील घरांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कणकवली तालुक्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे गडीनदी, जानवली नदीला पूर आला आहे. तालुक्यातील अनेक मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कणकवली-आचरा,कणकवली-बीडवाडी मार्ग, नागवे-करंजे, या मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे हे सर्व मार्ग ठप्प झाले आहेत. गड आणि जानवली या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वैभववाडी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील एडगाव येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे २० मिनिटे वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावरून वाहत असलेले पुराचे पाणी मंगळवारी (ता. २०) ओसरले. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा सपंर्क पुन्हा सुरू झाला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील केळूस, तुळस या भागात अजूनही कित्येक एकर भातशेती पाण्याखाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून भातशेती पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेती कुजण्याची चिंता आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. तिलारी, तेरेखोल या दोन्ही नद्या ओसंडून वाहत आहे. पावसाचा जोर वाढल्यास या भागात देखील पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात १४ बंधारे पाण्याखाली कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी चोवीस तासांत अडीच फुटांनी वाढली  आहे. राधानगरी धरणातून १३५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली आहेत.   गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यात आजअखेर २०२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुंभी धरण क्षेत्रात २१५ मिमी पाऊस झाला असून, धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. कोदे धरणाच्या सांडव्यावरून ९३८ क्युसेक विसर्ग होत आहे. चिकोत्रा धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिकोत्रा पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आजअखेर ५७.७९ टक्के धरण भरले आहे. पिंपळगाव परिसरात चिखल कोळपणी सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com