खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर धरणांतून विसर्ग
खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर धरणांतून विसर्ग

खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर धरणांतून विसर्ग

जळगाव  ः खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची मळणी अत्यावश्‍यक असतानाच खानदेशात काही भागांचा अपवाद वगळता सर्वत्र मंगळवारी (ता. २२) मध्यम ते जोरदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. काही प्रमुख प्रकल्पांमधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे.  रब्बीची पेरणी सुरू झाली होती. त्यातच मागील चार दिवसांपासून खानदेशात पावसाळी वातावरण आहे. मागील तीन दिवसांत चाळीसगावमधील काही भागांत ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला होता. सोमवारी (ता. २१) तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. परंतु, मंगळवारी मध्यरात्रीनंतर व पहाटे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, चोपडा, यावल, जळगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, जामनेर आदी भागांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सुमारे तासभर सरी कोसळत होत्या. पहाटे तीन वाजताच पावसाळी वातावरण तयार झाल्याने वीज बंद झाली. जळगाव तालुक्‍यातील अनेक गावे अंधारात गेली. वीजपुरवठा सकाळी नऊपर्यंत सुरळीत झालेला नव्हता. यामुळे ग्रामस्थांना ऐन सणासुदीच्या दिवसात अडचणींचा सामना करावा लागला. सोमवारीदेखील अनेक भागांत वीज बंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या नोंदीनुसार कुठेही अतिवृष्टी झाली नाही. परंतु जळगाव, धरणगाव, चोपडा तालुक्‍यांतील काही मंडळांमध्ये २० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. तासभर जोरदार बरसल्यानंतर पावसाने उसंत घेतली. नंतर अधूनमधून तुरळक पाऊस येतच होता. 

पिकांचे नुकसान या पावसामुळे खानदेशात धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव या भागांतील ज्वारी, सोयाबीन, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्वहंगामी कापूस पिकातील वेचणी पावसामुळे ठप्प झाली होती. यातच पाऊस आल्याने बोंडे काळवंडली आहेत. या पावसामुळे जामनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे. या धरणाचे १० दरवाजे मंगळवारी सकाळी उघडे होते. तर मुक्ताईनगर तालुक्‍यातील हतनूर धरणाचेदेखील दोन दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com