उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत सर्वाधिक जोर

पावसाची मराठवाड्यात जोरदार हजेरी
पावसाची मराठवाड्यात जोरदार हजेरी

औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली. उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता. तर औरंगाबाद, बीड, परभणी जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांत पावसाची बॅटिंग दमदार राहिली. या पावसामुळे नदी, नाले, दुथडी भरून वाहू लागले. ३२ मंडळांत पावसाने चांगलीच दाणादान उडवत ६५ ते १५२ मिलिमीटर दरम्यान हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव तालुक्‍यात तर पावसाने कहरच केला. या तालुक्‍यात बांध फुटून मोठ्या प्रमाणात जमिनीचे नुकसान झाल्याची घटना घटली.

पुन्हा एकदा कायम अवर्षणाचा सामना करणाऱ्या लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांसह हिंगोली, परभणी, नांदेड या शाश्वत पावसाच्या जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लागली. हिंगोली जिल्ह्यात सरासरी ४७.८९ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यात २४. ५६ मिलिमीटर, बीड जिल्ह्यात १०.२८ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यात ४५.४३ मिलिमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यात ३०.२५ मिलिमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात १२.०९ मिलिमीटर, परभणी जिल्ह्यात १५.७७ मिलिमीटर तर जालना जिल्ह्यात सरासरी ५.९२ मिलिमीटर पाऊस पडला.

परभणी जिल्ह्यातील दोन, हिंगोली जिल्ह्यातील सहा, नांदेड जिल्ह्यातील सहा, बीड जिल्ह्यातील एक, लातूर जिल्ह्यातील तेरा तर उस्मानाबाद जिल्ह्यातील चार मंडळांत ६५ ते १५२ मिलिमीटर दरम्यान पाऊस पडला. पाऊस पडलेल्या भागातील नदी-नाले दुथडी भरून वाहले तर जलसंधारणाची कामेही तुडुंब झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ मंडळांत शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. पावसाची हजेरी लागलेल्या एकूण मंडळांपैकी १७ मंडळात २७ ते ५८ मिलिमीटरदरम्यान पाऊस पडला. त्यामध्येही पाच मंडळांत ४० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. औरंगाबाद तालुक्‍यातील दोन, फुलंब्रीतील तीन, पैठणमधील तीन, सिल्लोडमधील चार, गंगापूरमधील एक, कन्नडमधील चार, तर खुलताबाद तालुक्‍यातील एका मंडळांत दमदार ते जोरदार पाऊस पडला.

नारंगवाडी, मुळज मंडळ विभागांत बांध फुटले अतिवृष्टीने नारंगवाडी, मुळज मंडळ विभागांत शेतीचे बांध फुटुन मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे पेरणी केलेले क्षेत्र वाहून गेले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यालगतच्या शेतातील बांध फुटले, काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने मातीसह कोवळ्या मोडांना धोका झाला आहे. सात जूनच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ठिकाणाची सारवासावर करताना पुन्हा दुसऱ्यांदा पावसाने दणका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान पळसगाव पाझर तलावाचा बांध फुटल्याने प्रताप पाटील, बलभिमराव पाटील, नानाराव पाटील, मोतीराम कदम, राजाराम कदम, सुर्यभान सोमवंशी, उद्धवराव पाटील, अनुसया पाटील, मोहन गायकवाड आदी शेतकऱ्यांच्या शेतीतील माती, भराव वाहून गेला आहे, ऊसासह अन्य पिकात पाणी साचले आहे. उमरगा तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९ मिलिमीटर आहे. एक ते जूनपर्यंत ३२२.८ मिलिमीटर पाऊस झाल्याने यंदा सरासरी ओलांडण्याची शक्‍यता आहे.

उमरग्यात पावसाचा कहर उमरगा शहर व तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २२) रात्री झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण शहर जलमय झाले.  शेतशिवारातील बांध फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले. उमरगा, मुळज व नारंगवाडी मंडळ विभागात ढगफुटी झाल्यागत पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com