सातपुड्यात मुसळधार, नद्यांना पूर

सातपुड्यात मुसळधार, नद्यांना पूर
सातपुड्यात मुसळधार, नद्यांना पूर

जळगाव : मागील दोन दिवसांत सातपुडा पर्वताच्या भागात मुसळधार पाऊस झाला. पर्वतालगतच्या अनेक नद्या, नाल्यांना पूर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. धुळे, जळगाव जिल्ह्यांतही मागील २४ तासांत मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. 

सातपुड्यातील अक्कलकुवा, धडगाव भागातील उदय नदीला पूर आला आहे. या भागात सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत पावसाने झोडपून काढले. धडगावात १०७ मिलिमीटर, तर अक्ककलकुवा येथे १४० मिलिमीटर पाऊस झाला. नवापुरातील रंगावली नदी, शहादामधील सुसरी, गोमाई नद्यांना पूर आला आहे. सातपुड्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या तोरणमाळ (ता. धडगाव, जि. नंदुरबार) भागातील सातपायरी घाट अतिवृष्टीमुळे सोमवारीदेखील बंदच होता. अनेक नाल्यांना पूर आल्याने व काही ठिकाणी दरड पडल्याने हा घाट बंदच आहे. 

सातपुड्यातून येणाऱ्या खर्डा नदीला पूर आल्याने तळोदा (जि. नंदुरबार) शहरात पाणी शिरले. नदीकाठी रहिवाशांना लागलीच सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला. जोरदार पावसामुळे शहादा तालुक्यातील प्रकाशा ते शहादा यादरम्यानचा मुख्य मार्ग सोमवारी सकाळपर्यंत बंद राहिला. 

जळगाव, धुळे व नंदुरबारमधील विविध तालुक्यांमधून जाणारी तापी नदी खळखळून वाहत आहे. धुळे जिल्ह्यातील जामखेडी व पांझरा नदीलाही पूर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील वाघूर नदीलाही पूर आला. चोपडा, जळगाव, रावेर, यावल, शिरपूर, नंदुरबार भागांतील काळ्या कसदार जमिनीमध्ये अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. पूर्वहंगामी कापूस पिकात यामुळे अकस्मात मर रोग येण्याची भीती आहे. मागील सात-आठ दिवसांपासून जळगाव, धुळे व नंदुरबारात सूर्यप्रकाश नाही. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.  रविवारी (ता. ४) सायंकाळी जळगाव, धुळे भागात पाऊस थांबला. परंतु ढगाळ वातावरण कायम होते. शेतीकामेही ठप्प होती.

तणनियंत्रण, फवारणी, आंतरमशागतीची कामे सर्वत्र बंद असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळीदेखील पाऊस नव्हता. पण अधूनमधून तुरळक सरी काही भागांत येत राहिल्या. 

पाऊस स्थिती (सोमवारी सकाळी आठपर्यंत)

जळगाव ः यावल ४०, चोपडा ४६, रावेर ४८, जळगाव ४७, पाचोरा ५१, चाळीसगाव ३९, भडगाव ३४, एरंडोल ४७, भुसावळ ४१, जामनेर ५३. धुळे ः शिरपूर ५२, शिंदखेडा ४१, धुळे ३७, साक्री ४३. नंदुरबार ः नवापूर १३०, नंदुरबार ६३, शहादा ८३, तळोदा ८९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com