अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस

अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात यंदा अजूनही पुरेसा पाऊस नव्हता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात जोरदार पाऊस पडत आहे.
Heavy rains in the western part of Akola
Heavy rains in the western part of Akola

नगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात यंदा अजूनही पुरेसा पाऊस नव्हता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भंडारदरा, मुळा धरणात पाण्याची चांगली आवक होत आहे. भंडारदरा धरणात दोन दिवसांत एक टीमसीपेक्षा अधिक पाणी आले असून मुळा नदी कोतूळजवळ १० हजार  ३४२ क्युसेकने वाहत आहे.

नगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, ज्या भागात दरवर्षी जोरदार पाऊस पडत असतो, त्या अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील साधारण पन्नास गावांत यंदा पुरेसा पाऊस नव्हता. त्यामुळे या भागात भातलागवडही रखडली होती. आता मुंबई, कोकणात पाऊस सुरू झाल्याने गेल्या दोन महिन्यांच्या पावसाळ्यात यंदा पहिल्यांदाच दोन दिवसांपासून रतनवाडी, घाटघर, पांजरे, वाकी, भंडारदरा, निळवंडे भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे.

दोन दिवसांत एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी आले आहे. असाच काही दिवस पाऊस सुरू राहिला तर भंडारदरा धरण दरवर्षीप्रमाणेच भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हरिचंद्रगड पट्ट्यातही पाऊस सुरू असल्यामुळे मुळा नदीतून साडेदहा हजार क्युसेकने मुळा धरणात पाणी येत आहे.

आदिवासी भागात पाऊस सुरू झाल्याने रखडलेली भातलागवड पूर्ण होईल, असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. दोन दिवसांत दहा टक्के पाणी भंडारदऱ्यात आले असून शुक्रवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत भंडारदरा धरण साठ टक्के तर निळवंडे धरण ५३ टक्के भरले आहे. मुळाही अर्धे (पन्नास टक्के) भरत आले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मिलिमीटर पाऊस असा. घाटघर १७०, रतनवाडी ः १५९, पांजरे ः १३०, वाकी ः ७०, भंडारदरा ः १२७, निळवंडे ः १७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com