नाशिक जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस

गाजरवाडी, ता. निफाड : जोरदार पावसामुळे पाणी द्राक्ष बागेत साचले, त्यामुळे काही ठिकाणी शेताचे बांधही फुटले. (छायाचित्र : माणिक देसाई)
गाजरवाडी, ता. निफाड : जोरदार पावसामुळे पाणी द्राक्ष बागेत साचले, त्यामुळे काही ठिकाणी शेताचे बांधही फुटले. (छायाचित्र : माणिक देसाई)

नाशिक : जिल्ह्यात पावसाने विसावा घेतल्यानंतर पुन्हा माॅन्सून दाखल झाला असून, बुधवारी (ता. २६) पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिक शहरात सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. तर निफाड, चांदवड, नांदगाव, तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने बळिराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  नांदगाव तालुक्यात विजांचा कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातील पांझण व रामगुळणा नद्या दुथडी भरून वाहिल्या. पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या मनमाडकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. नांदगाव तालुक्यात दीर्घ कालावधीनंतर पाऊस पडला, त्यामुळे परिसरातील नागरिक सुखावले. मांडवड, मोरझर, लक्ष्मीनगर या गावांमध्ये शेतांत पाणी साचले होते. पावसामुळे खरिपाच्या मशागतीला वेग येणार आहे. मोरझर येथील गावनाला सात ते आठ वर्षांनंतर पहिल्यांदा भरून वाहिला. भालूर, साकुर, बोराळे, दहेगाव, मोहेगाव येथेही पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील ११ सिमेंट प्लग बंधारे ओसंडून वाहिले. मात्र नांदगाव तालुक्यातील घाटमाथा परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.  चांदवड तालुक्यात निमोण व परिसरात जोरदार पाऊस झाला. निमोणे, डोणगाव, शिंगवे, रायपूर, वडगाव पंगू येथे पावसाने हजेरी लावली. बागलाण तालुक्यात डांगसौंदाणे, पठावे, पिसोरे, चिंचपाडे, मोरकुरे या गावांतही एक तास पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळ व पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.  निफाडला जोरदार पाऊस  निफाडला जोरदार पावसाचे आगमन झाले. तालुक्याच्या पूर्व भागात दोन तास पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाले तुंबले होते. त्यामुळे नैताळे, धारणगाव, गाजरवाडी येथे पूर आल्याने रस्ता बंद झाला होता. विंचूर, चांदोरी परिसरांत पावसाने हजेरी लावली. अनेक शेतांमध्ये व द्राक्ष बागांमध्ये पाणी तुंबल्याने शेताचे बांध फुटून पाणी वाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी शेतीकामासाठी आवश्यक असलेला पाऊस हजर झाल्याने कामांना आता वेग येणार आहे. सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील काही गावांमध्ये पावसाचे आगमन झाले .   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com