होय, गव्हाचे हेक्टरी ५६ क्विंटल उत्पादन शक्य

रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या गव्हाची उत्पादकता विदर्भात जेमतेमच असल्याने या पिकाकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे.
wheat
wheat

अकोला  ः रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या गव्हाची उत्पादकता विदर्भात जेमतेमच असल्याने या पिकाकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. मात्र, गव्हाच्या सुधारित आणि शिफारस केलेल्या वाणांचा वापर आणि योग्य लागवड तंत्राचा अवलंब केल्यास गव्हाच्या उत्पादनात हमखास वाढ साधता येऊ शकते, हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात घेतलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. हेक्टरी ५६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवण्यात यश आले आहे.  गव्हाचे पीक रब्बी हंगामात पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सन २०१८-१९ मध्ये विदर्भात २.२३ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली होती. विदर्भात गव्हाची प्रती हेक्टरी उत्पादकता देशाच्या तुलनेत फारच कमी, म्हणजे १३.१५ क्विंटल एवढी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे विदर्भातील उष्ण हवामान त्याचप्रमाणे तापमानातील सतत आढळून येणारे बदल ही आहेत. शिवाय गहू पिकाचे ओलीत पाटपाणी या पारंपरिक पद्धतीने केल्या जाते. काही ठिकाणी पाणीटंचाईमुळे सिंचनावर पडलेल्या ताणामुळेही गव्हाचे उत्पादन घटले आहे.  गव्हाची उत्पादकता वाढविण्यासाठी ओलिताच्या पाण्याची उपलब्धता हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पाण्याची व ओलिताची उपयोगिता वाढविण्यासाठी पाट ओलिताऐवजी आधुनिक सिंचन पद्धतीपैकी ठिबक सिंचनाचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. याच महत्त्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रित करीत ठिबक सिंचन पद्धतीने कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात गव्हाचे पीक घेण्यात आले. यासाठी आधुनिक ठिबक सिंचन व फर्टीगेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला.   विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या सूचनेनुसार कृषीविद्या विभागाचे प्रमुख डॉ. नरसिंग पार्लावर व सहायक प्रा. डॉ. संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात कृषिविद्या विभागातील आचार्य पदवीचे विद्यार्थी संजय सरोदे यांनी हा प्रयोग घेतला. या प्रयोगाच्या निष्कर्षाद्वारे गव्हाचे हेक्टरी ५६ क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन मिळाले. हा प्रयोग पुढील दोन वर्षे सुरु ठेवण्यात आला आहे.  सूक्ष्म सिंचन प्रामुख्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ४५ टक्के पाण्याची बचत होत असल्याचे प्रयोगाच्या निष्कर्षावरून सिद्ध झाले आहे. परंपरागत ओलीत पद्धतीत भरपूर पाणी दिल्या जाते. परंतु पिकाच्या गरजेनुसार व वाढीच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन केल्यास पाणी बचती सोबतच गव्हाचे भरपूर उत्पादन मिळू शकते. पाण्याची कमी उपलब्धता लक्षात घेऊन ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन करून सुद्धा गव्हाचे पीक घेणे शक्य आहे काय, हे पडताळून पाहण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे गहू लागवड तसेच रासायनिक खतांचा वापर करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग विद्यापीठाच्या कृषिविद्या विभागातील अखिल भारतीय तण व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आला. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खत व्यवस्थापनाद्वारे पाण्याच्या बचती सोबतच पारंपरिक पाणी व खते देण्याच्या तुलनेत ४१ टक्के गहू उत्पादनात वाढ आढळून आली.

गहू लागवडीविषयी महत्त्वाच्या बाबी

  • गव्हाचे वाण : पिडीकेव्ही-सरदार
  • लागवड : १९ नोव्हेंबर २०१९
  • लागवडीची पद्धत : पेरीव पद्धत (२०x१० से.मी.)
  • ठिबक सिंचनाची मांडणी : इनलाइन ठिबक,१६ मि.मी. इनलाइन ठिबक नळी (२ लिटर प्रती तास क्षमता), दोन ड्रीपर मधील अंतर ४० से.मी. ठिबक सिंचन गरजेनुसार मोजून. एका ठिबक नळीवर चार ओळी प्रमाणे मांडणी.
  • फर्टीगेशन : नत्रयुक्त खतासाठी युरिया आणि पोटॅशसाठी पांढरे म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर. स्फुरद जमिनीतून  
  • खतमात्रा : १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद, पालाश /हेक्टरी.
  • रासायनिक खतांची विभागणी : पीक वाढीच्या अवस्थेनुसार ७ दिवसाच्या अंतराने व १४ दिवसाच्या अंतराने विभागून देण्यात  आले. 
  • (प्रयोग करणारा विद्यार्थी ः संजय सरोदे मो. ७८८७६३११५२)

    प्रतिक्रिया कापूस, कांदा व तूर इत्यादी पिकांमध्ये ठिबक सिंचन व फर्टीगेशन तंत्रज्ञानाद्वारे पीक उत्पादनात भरघोस वाढ करता येते हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील चारही विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन समितीतर्फे शेतकऱ्यांसाठी तशा शिफारशीसुद्धा केल्या आहेत. शेतकऱ्यांतर्फे या शिफारशींचा अवलंब सुद्धा केल्या जात आहे. सध्याची असलेली पाण्याची कमी उपलब्धता लक्षात घेता पाणी व खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. - डॉ. संजय काकडे, सहायक प्राध्यापक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com