इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना मदत करा

पेट्रोलियम मंत्रालयाने आता थेट साखर कारखान्यांशीच करार करून आसवानी प्रकल्प तारण घेत अर्थसाह्य आणि इथेनॉल खरेदी करण्याचा तोडगा मी सुचविला आहे : केंद्रायमंत्री नितीन गडकरी
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना मदत करा
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना मदत करा

पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला दिशा देणारे साखर कारखाने सध्या आर्थिक अडचणीत आहेत. इथेनॉल प्रकल्पांना कर्ज देण्यास बॅंकाही तयार नाहीत. त्यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाने आता थेट कारखान्यांशीच करार करून आसवानी प्रकल्प तारण घेत अर्थसाह्य आणि इथेनॉल खरेदी करण्याचा तोडगा मी सुचविला आहे,” अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.   

‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन करताना ना. गडकरी बोलत होते. या वेळी इंडियन ऑइल कॉर्पोरशनचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, लेखिका वीणा गवाणकर, ‘प्राज’ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. रवींद्र उटगीकर, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते.  “शेतकरी आता गहू, तांदूळ, ऊस, मका, भाजीपाला अशी पिके घेत कधीही समृद्ध होणार नाही. शेतकरी कर्जात जन्म घेतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना इथेनॉल, बायोसीएनजीचे उत्पादक व्हावे लागेल. तोच त्यांच्या प्रगतीच्या मार्ग आहे. जैव इंधननिर्मिती वाढल्यास इंधन आयात कमी होईल. रोजगार मिळेल. ग्रामीण भागाचाही विकास होईल,” असा आशावाद ना. गडकरी यांनी व्यक्त केला.  “देशाला भरपूर इथेनॉल हवे आहे. मात्र ‘एनपीए’त गेलेल्या साखर कारखान्यांना नवे इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करताच एफआरपी द्यावी लागते. त्यामुळे हाती पैसा नाही. त्यामुळेच आता कारखान्यांशी थेट पेट्रोलियम मंत्रालयाने त्रिपक्षीय करार करावा, असा तोडगा मी सुचवला आहे. तेल कंपन्या, कारखाने यांच्यात करार झाल्यास ही समस्या सुटेल,” असे ते म्हणाले.  “दहा टक्के मिश्रणाला परवानगी दिली असली, तरी सध्या पाच टक्क्यांपर्यंतच मिश्रण होते आहे. कारण इथेनॉलचा पुरेसा पुरवठा होत नाही. दुसऱ्या बाजूला अखाद्य तांदळापासून इथेनॉलनिर्मितीला मान्यता मिळाली असली, तरी प्रकल्पाची परवानगी पत्रे मिळण्यासाठी वर्षाचा कालावधी जातो आहे,” असे निरीक्षण ना. गडकरी यांनी नोंदविले.  ‘प्राज’चे अध्यक्ष श्री. चौधरी म्हणाले, “एक होता कार्व्हर हे पुस्तक आता गावपातळीपर्यंत पोहोचविले जाईल,” असा संकल्प व्यक्त केला. “पर्यावरण व निसर्गपूरक संशोधन कार्व्हर यांचे होते. आम्ही तोच वारसा पुढे नेतो आहोत. कार्व्हर यांनी जगातील शेतकऱ्यांबाबत केलेले महान कार्य आम्हाला प्रेरणादायी आहे. जैव संशोधनातून आम्ही देशातील शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी सतत कार्यरत राहू,” असेही श्री.चौधरी म्हणाले.  टाकाऊ जैविक उत्पादनांपासून इथेनॉल ‘इंडियन ऑइल’चे अध्यक्ष श्री. वैद्य या वेळी म्हणाले, “टाकाऊ जैविक उत्पादनापासून इथेनॉलनिर्मिती करणारा आमचा ९०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. पुढील वर्षापासून तेथून ३५० कोटी लिटरचे उत्पादन मिळेल. कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी इंडियन ऑइलकडून कॉम्प्रेस बायोगॅसच्या २५०० प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.” ‘चौधरी यांचे कार्य कार्व्हर समान’ “ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या उत्थानासाठी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी जीवन समर्पित केले आहे. कार्व्हर पुरस्कार यंदा ‘प्राज’ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना मिळाला आहे. मी देशातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. जैव इंधनात चौधरी यांचे कार्य मोठे असून, त्याची जाणीव पुढील ५० वर्षांनंतर देशाला होईल. देशाचा कृषी विकासदर २५ टक्के नेण्यासाठी व खेडी समृद्ध होण्यासाठी जैविक इंधन महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे गौरवोद्‍गार ना. गडकरी यांनी काढेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com