राज्याबरोबर केंद्राच्या मदतीची गरजः शरद पवार

राज्य सरकारला काही मर्यादा असल्याने केंद्र सरकारची मदत महत्त्वाची आहे, त्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
sharad pawar
sharad pawar

उमरगा, जि. उस्मानाबाद: नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात या भागातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना वेदना देणारी आहे. अस्मानी, सुलतानी संकट कोसळल्याने राज्य सरकार मदत करेल पण राज्य सरकारला काही मर्यादा असल्याने केंद्र सरकारची मदत महत्त्वाची आहे, त्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी दिला. 

उमरगा, लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता.१८) सास्तूर, राजेगाव - कवठा शिवारातील नुकसानीची पाहणी केली. दरम्यान श्री. पवार यांनी महाप्रलयंकारी भूकंपानंतर केलेल्या मदतीमुळे आधार मिळालेल्या भूकंपग्रस्त भागात दौरा केल्याने येथील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

या वेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे,जीवनराव गोरे, सुनिल साळुंके, सक्षणा सलगर, अंकिता विधाते, पल्लवी पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, रावसाहेष पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार डॉ. रोहन काळे आदी उपस्थित होते. 

श्री. पवार यांनी सास्तूर - माकणी, राजेगाव परिसरातील तेरणा नदीकाठच्या जमिनी व पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते पुढे बोलताना म्हणाले, की आपण अनेक नैसर्गिक आपत्ती पाहिल्या पण या परिसरात झालेली नैसर्गिक आपत्ती मोठी आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीचे, नदीकाठावरील बंधारे वाहून गेले आहेत, तसेच बंधाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे, जमिनी खरडून गेल्याने येत्या पाच-सात वर्षांत जमिनी नापिकी असतील. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. 

केंद्राकडे मदत मागणार  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल, सर्वोतपरी मदतीचा प्रयत्न असेल पण राज्याला काही मर्यादा असल्याने केंद्र सरकारची मदत महत्त्वाची ठरेल, त्यासाठी येथील लोकप्रतिनिधींसह शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारच्या संबंधित मंत्र्यांशी भेट घेऊन मदत मागितली जाईल, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com