Uddhav thakarey
Uddhav thakarey

मदतीची घोषणा, की आश्वासनांनी बोळवण? मुख्यमंत्री दौऱ्याकडे लक्ष

जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने सोलापूर जिल्ह्यातील शेती अक्षरक्षः ओरबाडून गेली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टरहून अधिक पिकांचे पाऊस आणि पूरस्थितीमुळे नुकसान झाले आहे.

सोलापूर ः जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने सोलापूर जिल्ह्यातील शेती अक्षरक्षः ओरबाडून गेली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टरहून अधिक पिकांचे पाऊस आणि पूरस्थितीमुळे नुकसान झाले आहे. ऐन काढणी हंगामाच्या तोंडावरच निसर्गानं घाला घातल्याने शेतकऱ्यांची आर्थिक, मानसिक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (ता.१९) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. मुख्यमंत्री मदतीची घोषणा करत, खरंच शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार की, आश्वासनावर बोळवण करुन परतणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडच्या काही वर्षांत पहिल्यांदाच पाऊस आणि पुराचा असा मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. ऐन काढणी हंगामातील सोयाबीन, उडीद पिके पाण्यात गेली आहेत. नव्याने झालेली कांदा लागवड वाया गेली आहे. तर नव्याने होणाऱ्या कांदा लागवडीची रोपेही खराब झाली आहेत. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, माढा भागातील ऊस आडवा झाला आहे. दुसरीकडे आधीच बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचा मृग आणि हस्त बहार हातातून गेला आहे. तर द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीमध्ये व्यत्यय आला आहे. पण सप्टेंबरमध्ये छाटणी केलेल्या बागा सध्या पोंगा आणि फुलोरा अवस्थेत आहेत. या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.  भाजीपाला आणि फळभाज्यांच्या नुकसानीची गणती होऊच शकत नाही. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ६० हजार हेक्टर क्षेत्र सांगितले जात आहे. पण किमान त्याच्या दुप्पट क्षेत्र असण्याची शक्यता आहे. रात्रंदिवस कष्ट करुन डोळ्यादेखत वाहून गेलेली पिके, तर कुठे माना टाकलेल्या पिके पाहण्याची दुदैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या प्रसंगान शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झालं आहेच. पण मानसिक कोंडीही झाल्याचे चित्र आहे. श्री. ठाकरे ही सर्व परिस्थिती पाहून मदतीची जागेवरच घोषणा करणार की आश्वासन देऊन परतणार, याकडे आता लक्ष आहे.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा मुख्यमंत्री ठाकरे यांचे सोमवारी सकाळी नऊ वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी अकरा वाजता बोरी नदीची ते पाहणी करतील. येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूरकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन, बोरीउमरगेला जातील, तिथे पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन ते परत मुंबईकडे रवाना होतील.  देवेंद्र फडणवीसांचा जथ्थाही पोचणार  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही सोमवारी (ता.१९) सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दौऱ्यात सहभागी असतील. श्री. फडणवीस टेंभूर्णी, करमाळा, माढ्यासह परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. श्री. दरेकर पंढरपूर आणि अक्कलकोट भागाची पाहणी करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com