कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
गावरानपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दर
राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दर मिळू लागला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणीच्या तुलनेत सत्तर टक्के पुरवठा होत आहे.
नगर ः राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दर मिळू लागला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणीच्या तुलनेत सत्तर टक्के पुरवठा होत आहे. बर्ड फ्लूचे संकट हटल्यानंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रॉयलर चिकनला मागणी वाढली असल्याने ठोक दरात चाळीस ते पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय गावरान कोंबड्याच्या दरातही चार महिन्यांच्या तुलनेत सुधारणा होत आहे.
राज्यात साधारण ५० ते ६० हजार ब्रॉयलर पोल्ट्री उत्पादक शेतकरी असून, दर महिन्याला पावणेचार ते चार कोटी कोंबड्यांतून साडेआठ ते नऊ कोटी किलो मांस उत्पादित होते. याशिवाय परसात, तसेच शेडमध्ये गावरान कोंबड्यांचे पालन करणारे एक ते सव्वा लाख शेतकरी असून, ८० ते ९० लाख कोंबड्यांचे दर महिन्याला उत्पादन होते. नगर, नाशिक, पुणे, सांगली, मराठवाड्यात पोल्ट्री उद्योग करणारे शेतकरी अधिक आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी अचानक आलेल्या बर्ड फ्लूचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला. गावरान कोंबड्यांसोबत ब्रॉयलरचेही मोठे नुकसान झाले आहे.
पोल्ट्री उद्योगातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणाने पाच हजार कोटींपर्यंत फटका सोसावा लागला आहे. आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका आटोक्यात आलेला दिसतोय. सध्या उन्हाचा पारा वाढला असल्याने साधारण तीस टक्के उत्पादन कमी झाले आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे मागणी वाढल्याने यंदा पहिल्यांदाच गावरान पेक्षा ब्रॉयलरच्या दरात वाढ झाली आहे.
अंड्यालाही मागणी
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी चिकन, मटण, अंडी खाण्याचा डॉक्टरांकडून सल्ला दिला जात आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून अंडीलाही मागणी वाढली आहे. सध्या ब्रॉयलरच्या अंड्याला ठोक दरात तीन ते साडेतीन रुपयांचा दर मिळत असून, किरकोळ दरात पाच रुपयाला प्रति अंडे विकले जात आहे. त्या तुलनेत देशी अंड्याला मात्र अधिक दर आहे. राज्यात दर दिवसाला अडीच कोटी अंडी लागतात. त्यातील एक ते सव्वा कोटी अंडी राज्यात उत्पादित होत असून, उर्वरित अंडी अन्य राज्यांतून येत असल्याचे सांगितले जात आहे.
असे आहेत सध्याचे दर
ठोक दर
ब्रॉयलर कोंबडी ः १४० ते १६० रुपये प्रति किलो (जिवंत)
गावरान कोंबडी ः ११० ते १२० रुपये प्रति किलो (जिवंत)
किरकोळ दर
ब्रॉयलर ः
२३० ते २५० रुपये प्रति किलो
गावरान ः
१८० ते २०० रुपये प्रति किलो
- 1 of 696
- ››