मंदिरे उघडणे म्हणजेच हिंदुत्व नव्हेः मुख्यमंत्री 

मंदिरे उघडणे म्हणजेच हिंदुत्व अन् न उघडणे हा 'सेक्युलरिझम' असं असेल तर ज्या राज्यघटनेनुसार राज्यपाल पदाची शपथ घेतली त्या घटनेतील ‘सेक्युलर’वादाबाबत आपलं काय मत आहे.
Uddhav thakarey
Uddhav thakarey

मुंबई: मंदिरे उघडणे म्हणजेच हिंदुत्व अन् न उघडणे हा 'सेक्युलरिझम' असं असेल तर ज्या राज्यघटनेनुसार राज्यपाल पदाची शपथ घेतली त्या घटनेतील ‘सेक्युलर’वादाबाबत आपलं काय मत आहे ? असा सवाल करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 

राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात राज्यपालांनी १२ ऑक्टोबरला पत्र पाठवले आहे. या पत्रात हिंदुत्वाचा उल्लेख करताना अचानक आपण ‘सेक्युलर’वादी कसे झालात? असा थेट सवाल राज्यपालांनी पत्रात केला आहे. 

या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणतात की, आपण इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सुद्धा राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्याविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. 

‘‘महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

‘‘केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे ‘सेक्यूलर’ असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे तो आपल्याला मान्य नाही का? इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.  तीनही पत्रे भाजपशी संबंधित  गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com