हिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’

Cotton is being taken down in private ginning after purchase  
Cotton is being taken down in private ginning after purchase  

कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती कापूस उलाढालीचे राज्यातील मोठे केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. हंगामात तब्बल १९ लाख क्‍विंटल कापसाचे व्यवहार या ठिकाणी होतात. बाजार समितीने कापूस खरेदीदारांसाठी त्या पार्श्‍वभूमीवर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रुईच्या टक्‍केवारी आधारित दर देण्याच्या देशातील पहिल्या प्रयोगाचाही यात समावेश आहे.   महात्मा गांधी यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात कापूस आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाची संख्या मोठी आहे. वर्धा येथे स्थानिक स्तरावर चरख्यावर सुतकताई, हातमागावर कापड तयार करण्याचे काम होते. हिंगणघाट तालुक्‍यात टेक्‍सटाइल पार्क उभा राहिला आहे. या तालुक्‍यात सुमारे ४५ हजार हेक्‍टरवर कापूस लागवड होते. हिंगणघाट झाले कापसाचे हब हिंगणघाट परिसरात ‘नॅशनल टेक्‍सटाइल कॉर्पोरेशन’अंतर्गत तीन जिनिंग मिल्स होत्या. कापूस प्रक्रिया उद्योगांची संख्या वाढल्यास बाजार समितीत कापसाची आवक वाढेल, त्या माध्यमातून उत्पन्नात वाढ होईल या उद्देशाने बाजार समितीने कापूस व्यवहारावर इसेंटीव्ह देण्याचे ठरवले. परिणामी, कापूस व्यापाऱ्यांची पावले बाजार समितीकडे आपसूकच वळली. नंतरच्या काळात टेक्सस्टाइल पार्कसह कापूस प्रक्रिया उद्योगाची संख्या १९ पेक्षा अधिक झाली. या माध्यमातून हिंगणघाट कापूस खरेदी विक्रीचे हब म्हणून नावावरुपास आल्याचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी सांगितले. सेसमध्ये सवलत बाजारात कापसाची खरेदी करणाऱ्या व्यापारी, उद्योजकांना तीन वर्षांपर्यंत दहा लाखांच्या व्यवहारापोटी एक रुपया १० पैसे आकारण्यात येत असलेल्या सेसमध्ये सवलत देण्यात आली. त्याचा कापूस बाजार विस्तारात चांगला फायदा झाला. परिणामी, धान्य आणि कापूस व्यवहारातून कररूपी मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली. खुली लिलाव प्रक्रिया हिंगणघाट परिसरात ब्रिटिशकालीन रेल्वेलाइन आहे. कापसाच्या वाहतुकीसाठी त्याचा उपयोग व्हायचा. त्यावरूनच कापूस हे पीक या भागातील पारंपरिक असल्याच्या शक्‍यतेला दुजोरा मिळतो. कापूस खरेदी आणि विक्रीचे व्यवहार वाढीस लागले. त्यामुळे बाजार समितीनेही त्या पार्श्‍वभूमीवर सुविधा देण्यावर भर दिला आहे. राज्यात याच ठिकाणी केवळ खुल्या लिलाव पध्दतीने कापसाचे व्यवहार होतात. कापसाची प्रत तपासून व्यापारी बोली लावतात. त्या ठिकाणी बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित राहतात. त्यामुळे सारी प्रक्रिया पारदर्शक पार पडते. मिळणाऱ्या सुविधा बाजार समितीने अवघ्या एक रुपयात पोटभर जेवणाची सुविधा उपलब्ध केली आहे. आवश्‍यकता भासल्यास शेतकऱ्यांसाठी निवासाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी अवघ्या एक रुपयाची आकारणी होते. सकाळी दंतमंजन आणि चहादेखील निशुल्क पुरविण्यात येतो. भोजन व निवास सुविधेचा लाभ हजारो शेतकरी दरवर्षी घेत आहेत. बाजार समितीकडून बसस्थानक ते बाजार समितीपर्यंत निशुल्क बससेवाही सुरू करण्यात आली. त्याचा लाभही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. अग्निशमन सेवा हिंगणघाट हे कापूस उलाढालीचे मोठे केंद्र आहे. साहजिकच आग लागण्यासारख्या घटना घडू नयेत यासाठी केवळ नगरपालिकेच्या अग्निशमन सेवेवर अवलंबून न राहाता बाजार समितीची यंत्रणा असावी, असा प्रस्ताव संचालक ओम दालीया यांनी मांडला. आता बाजार समितीसह शंभर किलोमीटर परिघात गरजेच्यावेळी ही सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. रुईच्या टक्‍केवारी दर बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी अशा दोघांचाही विचार सातत्याने केला आहे. रुईच्या टक्‍केवारीनुसार कापूस दर देण्याचा पहिलाच प्रयोग इथे केला. सिरकॉट संस्था, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे, ओम दालीया यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. एक किलो कापूस जिनिंग केल्यास ३४ किलो रुई आणि ६६ किलो सरकी मिळते. रुईचा प्रतिकिलो दर १२० रुपये तर सरकीचा दर अवघा २० रुपये आहे. त्यामुळे एक टक्‍का जरी रुईचे प्रमाण वाढले तरी सरासरी १०० रुपये वाढीव मिळतील. बाजार समिती दृष्टिक्षेपात सुविधा

  • प्रशासकीय इमारत
  • संपूर्ण यार्डास सुरक्षा भिंत
  • कापूस लिलावासाठी पाच शेडस
  • वीज व पाणी व्यवस्था
  • आवार परिसरात दहा गोदामे व २३ दुकाने
  • जनावरासांठी प्रशस्त शेड
  • महिला, पुरुषांसाठी स्वच्छतागृह
  • विस्तार

  • मुख्य कापूस बाजार- सात एकर
  • धान बाजार- २० एकर
  • उपबाजार कांनगाव- ४ एकर
  • उपबाजार वडनेर- ८ एकर
  • परिसरातील उद्योग

  • डाळलमिल- ३०
  • ऑईल मिल- ३९
  • जिनिंग प्रेसिंग-२२
  • सोयाबीन एक्‍सस्ट्रॅक्‍शन प्लॅंट- २
  • टेक्‍सटाइल पार्क- १
  • टेक्‍सटाइल इंडस्ट्रीज- ३
  • कापूस आवक (क्‍विंटलमध्ये)

  • २०१७-१८ - १७,४४,५१२
  • २०१८-१९ - १२,७१,९९३
  • बाजार समितीतील घटक

  • खरेदीदार- २१५
  • अडते- २४०
  • मापारी-१११
  • कापूस परवानाधारक खरेदीदार- ४
  • संपर्क- सुधीर कोठारी-९४२२१४०८८७ सभापती, बाजार समिती, हिंगणघाट, वर्धा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com