हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभार

हिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यासाठी नियुक्त विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयाचा पत्ता अनेक शेतकऱ्यांना माहीत नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा कंपनी प्रतिनिधींची उपस्थिती नावालाच आहे.
Hingoli insurance company Chaos
Hingoli insurance company Chaos

हिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यासाठी नियुक्त विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयाचा पत्ता अनेक शेतकऱ्यांना माहीत नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा कंपनी प्रतिनिधींची उपस्थिती नावालाच आहे. टोल फ्री क्रमांक लागत नाही. व्यक्तिगत क्रमांकावर प्रतिसाद देत नाहीत. परिणामी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पीक नुकसान दावे अर्ज (पूर्वसूचना) सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत. विमा कंपनीच्या अनागोंदी कारभाराबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात विमा कंपनीचे कार्यालय सुरु करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात एचडीएफसी इर्गो जनरल इन्सूरंन्स या कंपनीकडून पीकविमा योजना राबविली जात आहे. कंपनीच्या जिल्हा कार्यालयाचा पत्ता शॉप नं.१, रणखांब कॉम्पलेक्स सीआरपी कॅम्प समोर, हनुमान नगर, हिंगोली असा आहे. या शिवाय हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची व्यवस्था केली आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ऑनलाइन माध्यमातून तक्रार दावे सादर करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे लागत आहे. जिल्हा कार्यालयाचा पत्ता लवकर सापडत नाही. ऑफलाइन तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुका प्रतिनिधी जागेवर हजर राहत नाहीत. तक्रारी करता येत नाहीत. कृषी विभागाने दिलेले विमा कंपनीच्या प्रतिनिधींचे संपर्क क्रमांकावर उत्तर दिले जात नाही. जनजागृती अभावी विमा योजनेत सहभागी अनेक शेतकऱ्यांना स्थानिक आपत्ती नुकसान दावे अर्जासाठी ७२ तासांची मुदत असते, या बाबतची असंख्य शेतकऱ्यांना माहितीच नाही. परिणामी अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी विमा परताव्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांचा विमा काढला आहे. त्यासाठी ९ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. अतिवृष्टीमुळे सहा एकरावरील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु त्याबाबत पूर्वसूचना कधी द्यावी, या बाबत माहिती नाही. दावा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी कोण आहेत. तसेच जिल्हा कार्यालयाचा पत्ता देखील माहिती नाही. - काशिनाथ सांगळे, केळी,ता.औंढानागनाथ.

विमा दावे सादर करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या प्रतिनिधी कक्ष असल्याबाबत ठळक फलक लावावेत. त्यांचे संपर्क क्रमांक शेतकऱ्यांना द्यावेत. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना नुकसान दावे सादर करणे सोपे होईल. - बाळासाहेब राऊत, तेलगाव, ता. वसमत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com