पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या कोठीपोटमध्ये जाते.
यशोगाथा
भाजीपाला उत्पादन ते विक्रीसाठी ‘हिराई’ कटिबद्ध
नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) येथील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हिराई शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनासाठी प्रेरित करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) येथील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हिराई शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनासाठी प्रेरित करण्यात आले. विक्रीच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी भाजीपाला संकलन, खरेदी केंद्र व त्याअंतर्गत विविध सुविधा उभारल्या. त्याद्वारे कंपनी शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये मोलाचा दुवा ठरली आहे.
कमी पर्जन्यमान, सुधारित तंत्रज्ञान व मार्गदर्शनाचा अभाव अशा अडचणींचा सामना नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) गाव परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत होता. त्यावर उपाययोजना करण्यासाठी येथील काही प्रयोगशील शेतकरी संघटित झाले. त्यांनी हिराई शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धतीकडे वळवण्याचा प्रयत्न होता.
मागील तीन-चार वर्षांचे पर्जन्यमान पाहता परिसरात अल्प क्षेत्रावर मिश्र पद्धतीने भाजीपाला लागवडी घेऊन उत्पादनवाढीचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले. यात थेट बांधावर मोबाईल व्हॅनद्वारे शेतीमाल संकलन करण्याची संकल्पनाही प्रत्यक्षात आणण्याचे ठरले. कृषी विभाग-‘आत्मा’ यांचे शास्त्रीय मार्गदर्शन कंपनीला होऊ लागले. शेतकरी प्रयोगशील झाले. भाजीपाला क्षेत्र व उत्पादनात वाढ होऊ लागली.
भाजीपाला खरेदी व संकलन केंद्र
सुरुवातीला मनमाड, नाशिक, चांदवड असे भाजीपाला विक्रीचे पर्याय होते. मात्र विक्रीत अडचणी येत होत्या. त्यावर मात करण्यासाठी शेतकरी कंपनीने पारदर्शक अशी विक्रीची व्यवस्था उभारली. त्या अंतर्गत भाजीपाला खरेदी व संकलन केंद्र सुरू केले. त्यातून शेतकरी अन व्यापारी यात समन्वय साधला गेला. देवळा तालुका ‘आत्मा’ गट तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश देवरे यांनी त्यासाठी सहकार्य केले.
दृष्टिक्षेपात शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य
- संचालक संख्या...१०
- सभासद संख्या- ३११
- दैनंदिन भाजीपाला आवक- ७ ते ८ टन
- उत्पादित भाजीपाला- मिरची, टोमॅटो, वाल, काकडी, भेंडी, वांगी, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, शेवगा गिलके, दोडके, डांगर, घेवडा, गाजर, मूग, शेवगा, पालक, बीटरूट, आले, आदी.
शेतकऱ्यांसाठी सुविधा
- प्रशस्त शेतीमाल खरेदी आवार
- स्वतंत्र शेतीमाल मोजणी सुविधा
- खरेदी केंद्रात शेतमाल हाताळणीसाठी कर्मचारी सुविधा
- शेतीमाल विक्रीनंतर रोख ‘पेमेंट’
काळानुरूप बदलांच्या दिशेने कामकाज
शेतकरी वर्गाचा भाजीपाला लागवडीकडे वाढता कल पाहून कंपनीमार्फत चांगल्या प्रतीची व सर्व प्रकारची भाजीपाला रोपे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी रोपवाटिका उभारणे, शेतकरी माहिती व सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्याबरोबर सेंद्रिय पद्धतीने उत्पादन व स्वतंत्र सेंद्रिय शेतीमाल बाजारासाठी नियोजन सुरू केले आहे. ‘आत्मा’तर्फे प्रचार- प्रसिद्धी करून शेतकरी गट तयार करण्याचे काम सुरू आहे.
प्रतिक्रिया...
परिसरातील कंपनीचे सभासद व अन्य मिळून शंभर ते दीडशे शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी येऊन घेतात. त्यासाठी सुमारे १५ व्यापारी असतात. त्यामुळे खरेदीत स्पर्धा होते. प्रतिकिलो प्रमाणे व्यवहार होतो. खरेदी झाल्यानंतर एक तासाच्या आत रोख पेमेंट दिले जाते. त्यामुळे शेतकरी हिताच्या दृष्टीने आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत.
- धर्मा पांडुरंग देवरे, अध्यक्ष
हिराई शेतकरी उत्पादक कंपनी, उमराणे
संपर्क- ९९६०४६४४४९
शेतकरी कंपनी स्थापन झाल्यानंतर उत्पादन ते विपणन ही साखळी उभी करणे, सभासदांच्या प्रगतीसाठी नव्या संकल्पना नावारूपाला आणणे यामध्ये हिराई कंपनी प्रयत्नशील आहे. भागभांडवल मर्यादित असूनही असे प्रयोग शेतकऱ्यांना बळकटी देणारे ठरणारे आहेत.
- राजेंद्र निकम,
प्रकल्प संचालक-आत्मा, नाशिक
- 1 of 91
- ››