सोलापुरात सोयाबीनसह फळपिकांना फटका

पावसाच्या नुकसानीची माहिती घेतली जात आहे. सध्या नुकसानीची नजरअंदाजाने माहिती घेण्याचे काम सुरु आहे. गेल्या चार-पाच दिवसापूर्वीच हे आदेश दिले आहेत. एक-दोन दिवसात हे काम पूर्ण होईल. -बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सोलापूर सततच्या पावसाने वातावरण बदलले आहे. रोज फवारणी करतो आहे. माझी तीन एकर डाळिंब बागेतील फुलगळ झाली आहे. आधी पाऊस नव्हता म्हणून आम्ही रडत होतो, आता पाऊस जादा झाल्याने रडण्याची वेळ आली आहे. - ज्ञानेश्‍वर वाघमोडे, शेतकरी,चळे, ता. पंढरपूर माझ्याकडे साडेचार एकरावरील सोयाबीन आणि दोन एकरवरील तूर पूर्णपणे पाण्यात आहे. कधी नव्हे ती पावसाच्या भरवशावर ती पेरली, काही तरी हातात लागेल म्हटलं, पण हाता-तोंडाला आलेला घास आता पावसाने हिरावून नेला आहे. हे नुकसान कसं भरुन निघणार. - गुरुदास काटकर, शेतकरी,कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर
सोलापुरात सोयाबीनसह फळपिकांना फटका
सोलापुरात सोयाबीनसह फळपिकांना फटका

सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे खरीपातील तूर, सोयाबीन या पिकासह कांदा, द्राक्ष, डाळिंब या फळपिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. पंढरपूर, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट या काही ठराविक भागात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देणे अपेक्षित आहे. पण अद्यापही हे आदेश झालेले नाहीत. कृषिविभागाकडून मात्र नुकसानीच्या नजर अंदाजाचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

सोलापूर जिल्ह्यात मुख्यत्वे रब्बी हंगाम घेतला जातो. पण खरीपातही बऱ्यापैकी पीके घेतली जातात. पण या सगळ्याचे गणित पावसावर अवलंबून असते. पण यंदा सुमारे चार महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. खरिपाचे जिल्ह्याचे क्षेत्र २ लाख ५० हजार हेक्‍टरपर्यंत आहे. पण शंभर टक्के पेरणी होऊ शकलेली नव्हती. पण पेरणी झालेल्या पिकावरही पावसामुळे संक्रांत आली. अनेक भागातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा पाणीप्रश्‍न सुटला. पण काढणीस आलेल्या आणि पेरणी झालेल्या पिकांना त्याचा मोठा फटका बसला.

मंगळवेढा तालुक्‍यातील सलगर बुदुक व परिसरातील द्राक्ष बागांना त्याचा फटका बसला. त्याशिवाय सांगोल्यातील जुनोनी, जवळा, कडलास, पंढरपुरातील करकंब, भोसे, सुगाव, तुंगत भागात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने या भागातील डाळिंब, द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. 

बार्शी तालुक्‍यातही सलग चार दिवस झालेल्या पावसाने सोयाबीन व द्राक्षे पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः हिंगणी, पिंपरी, पिंपळगाव, मळेगाव, बावी परिसरातील सोयाबीन पूर्णपणे पाण्यात असल्याने ते सडत आहे. हिंगणी, पिंपरी परिसरात द्राक्षाचे क्षेत्र जास्त आहे. पाऊस पडल्याने अनेक द्राक्ष बागांच्या छाटण्या झाल्या आहेत. मात्र, सततच्या पावसाने पुंजक्‍यात आलेल्या द्राक्षाला डाऊनी रोगामुळे धोका निर्माण झाला आहे. दिवसातून तीन वेळेस फवारणी करूनदेखील या वर्षीचे द्राक्ष पीक वाया गेल्याने वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. त्याला कोंब फुटू लागले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील विंचूर, मंद्रूप, निंबर्गी भागातील कांदा आणि तूर, सोयाबीन पिकात पाणी साचले आहे. जवळपास तेही आता सडून गेले आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यातील चपळगाव, हुन्नूर आणि करमाळा तालुक्‍यातील पांडे, पोथरे, वांगी या भागातही पावसामुळे कांदा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ माढ्याच्या अनेक भागात पाऊस पडेल, या भरवशावर अनेक भागात पंधरवड्यापूर्वी कांद्याच्या लागवडी पूर्ण झाल्या आहेत. पण आता कांदयाच्या सरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कांदा रोपे व काढणीस आलेल्या कांद्यावर परिणाम होत आहे. लागवडीयोग्य कांदा सततच्या पावसामुळे पिवळा पडून जळून चालला आहे. तर, काढणीयोग्य कांदा शेतातच नासत आहे. 

लोकप्रतिनिधी देवदर्शन अन्‌ सत्कारात 

नुकत्याच झालेल्या निवडणुकात अनेक लोकप्रतिनिधींनी प्रचारात शेतकऱ्यांसाठी भरभरुन आश्‍वासने दिली. पण जिल्ह्यात एकीकडे पाऊस नसल्याने शेतीचे हाल सुरु होते, आता पावसामुळे नुकसान झाले आहे. पण निवडून आलेले आणि पराभूत झालेल्या एकाही उमेदवाराला शेतीची पाहणी करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधी सध्या देवदर्शन आणि सत्काराच्या कामात गुंतले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com