शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर : किशोर तिवारी

शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर

‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात भाजप यशस्वी झाला आहे. याची नशा चढलेल्या समाजातील अनेकांना देश, राज्यातील मूळ प्रश्‍नच दिसेनासे झाले आहेत. त्यामुळेच की काय भाजपला जिंकण्याचा अतिआत्मविश्‍वास आहे. विरोधक संपविण्याकरिता त्यांना पक्षात घेतले जात आहे. त्यासोबतच भाजपमधील मित्रपक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याची खेळीदेखील खेळली जात आहे. त्याकरिता रासपच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाच्या चिन्हाऐवजी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास बाध्य करण्यात आले. एकपक्षीय प्रणाली आणण्याकडे ही वाटचाल असून येत्या काळात मोदी देशाचे सर्वेसर्वा असतील. 

ब्रिटिशकाळाप्रमाणे इजारे (जमीनदारी) वाटप करुन त्या भागात त्या त्या व्यक्‍तीमार्फत करवसुलीचे काम होईल. लोकशाही धोक्‍यात आली असतानाच फक्‍त धर्मांधतेपायी त्याविरोधात कोणीच बोलण्यास तयार नाही. या व्यवस्थेत केवळ भाजपला पैसे पुरविणाऱ्या व्यापारी, उद्योजकांचेच हित जपले जात आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशाच धूसर असून त्यामागे शेतकरी नेतेदेखील तितकेच कारणीभूत आहेत. 

शेतकरी आत्महत्या, हमीभाव, पीकविमा, शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्‍न यांसारख्या मुद्यावर एकही आंदोलन न करणाऱ्या शेतकरी संघटना बहुराष्ट्रीय कंपन्यांची चाकरी करण्यात तंत्रज्ञान स्वातंत्र म्हणजे एचटी बियाण्यांचाच आग्रह धरतात आणि त्यासाठीच आंदोलन करतात. अशा शेतकरी संघटना वाट चुकल्याप्रमाणे असून निघाले ज्ञानेश्‍वराच्या आळंदीला आणि पोचले चोराच्या आळंदीला. तेथेच ज्ञानेश्‍वर भेटल्याचा कांगावा ते करीत आहे. 

आजपर्यंत विद्यापीठांनी विकसित केलेले किती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचले, याची आकडेवारी तरी या संघटनांकडे आहे का किंवा असे भारतीय तंत्रज्ञान पोचावे याकरिता त्यांनी काही विशेष प्रयत्न केले का, मग एका विशिष्ट कंपनीच्या तंत्रज्ञानाने जादूची कांडी फिरविल्यागत बदल घडण्याची अपेक्षा त्यांनी का करावी, पीकविम्याबाबत कधी शेतकरी संघटनांनी इतका घसा कोरडा केला नाही. अशाप्रकारे सर्वांचेच काहीतरी स्वार्थ असल्याने शेतकरी आणि शेतमजूर व्यवस्थेच्या बाहेर फेकल्या गेला आहे. 

यापुढील काळात शेतकरी, शेतमजुरांचा हा प्रवास अधिक खडतर होणार आहे. कारण शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या कथित नेतृत्वांचा प्रवास दिशाहीन सुरू आहे. जो माणूस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल, दीडपट हमीभाव देईल, तेलंगणासारखे आर्थिक पॅकेज जाहिर करेल, शेतकरी त्यांच्या पाठीशी राहतील. सद्या अतिआत्मविश्‍वासी भाजप पक्षातील लोकांनाच विचारत नाही. ज्येष्ठांची अवहेलना करते. तो पक्ष शेतकरी, शेतमजुरांना काय न्याय देईल त्यांच्याकडून तसे होणे अपेक्षित देखील नाही. 

मुख्यमंत्र्यांकडे एमबीए केलेली मुले भरपूर आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसारच ते पक्षाचे काम करीत आहेत. उद्योजक आणि शहरी वर्गावरच त्यांचे लक्ष्य केंद्रित केले आहे. यावर्षी सर्वात कमी कर्जपुरवठा झाला. पीकविम्याची बोंबाबोंब आहे. आम्ही सरकारला सल्ले दिले. परंतु शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल घडविणाऱ्या सुधारणा करण्याऐवजी शेती स्वावलंन मिशनचे अध्यक्षपद देत आम्हालाच लॉलीपॉप दिल्याचे सांगण्यात आले.  (शब्दांकन ः विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com