agriculture news in marathi, horticulture become in trouble due to drought, nagar, maharashtra | Agrowon

झाडावर नाही, काळजावर घाव पडतात 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

यंदाच्या दुष्काळामुळे अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फळबागा जळाल्या आहेत. सरकारने फारसे गांभीर्याने घेतले नाही. सरकारी अनुदान नाही, विम्याचे पैसे नाहीत. यामुळे फलोत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. त्याला सावरायला खूप काळ जाईल. त्यामुळे सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

- रामदास गाडीलकर, गाडीलगाव, ता. पारनेर. 
 

नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली होती. चांगलं उत्पन्न निघत असल्याने आता कुठं सोयीला लागलं होतं; पण यंदा दुष्काळ ‘काळ’ होऊनच आला. २०० झाडं जागेवर वाळली, तोडण्याशिवाय इलाजच उरला नाही. बाग तोडताना पडणारे घाव, झाडावर नाही कळजावर पडल्यासारखे झाले होते. ही झळ साधी नाही. कित्येक वर्षे मागं गेलोत. पार मोडून गेलोत’’ कान्होबाचीवाडी (ता. पाथर्डी) येथील शेतकरी विठ्ठल लोहकरे यंदाच्या गंभीर दुष्काळाची दाहकता मांडत होते. त्यांच्या शेजारी असलेले बाळासाहेब अकोलकर यांची ६०० झाडे जागेवर करपली. करंजी परिसरात सुमारे अडीचशेवर शेतकऱ्यांच्या फळबागांचे दुष्काळामुळे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यामध्ये यंदा सुमारे ३५ हजार फळबागा वाया गेल्या असून, हजारो फळ उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाले आहेत. 

नगर जिल्ह्यामध्ये उसाचे पीक सर्वाधिक घेतले जायचे, मात्र अलीकडच्या दहा वर्षांच्या काळात उसाची जागा अनेक ठिकाणी फळबागांनी घेतली. सध्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक डाळिंब, त्यापाठोपाठ संत्रा, मोसंबी, लिंबूचे क्षेत्र आहे. जिल्हाभरात आज मितीला सुमारे ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. पाथर्डी तालुक्यातील करंजी, कान्होबाचीवाडी, कौडगाव, देवराई, मढी, निवडुंगे, खोजेवाडी, कासार पिंपळगाव, अकोले, टाकळी, नगर तालुक्यात कौडगाव, खडकी, पिंपळगाव माळवी, नेप्ती, चिंचोडी पाटील, जामखेड तालुक्यात फक्राबाद, पिंपरखेड, जवळा, आरणगाव, वंजारवाडी, नान्नज, तरडगाव, शिऊर आदी भागात लिंबू, आंबा, द्राक्ष उत्पादन घेतले जाते.

पारनेर तालुक्यातील निघोज, जवळा, राळेगण थेरपाळ, रांजणगाव मशीद, अळकुटी, वडनेर आदी पुणे जिल्ह्याला जोडून असलेल्या भागात फळबागांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. श्रीगोंदा तालुक्यात पारगाव सुद्रीक, बेलवंडी, कोळगाव, कोकणगाव, देवदैठण, मांडवगण, रुईखेल, टाकळी लोणार, भानगाव परिसर, कर्जत तालुक्यात रुई गव्हाण, खांडवी, कुंभळी, बारडगाव दगडी, तळवडी, कुळधरण, शिंदे, बिटकेवाडी, मिरजगाव, निमगाव, श्रीरामपूर तालुक्यात तांबेवाडी, गळनिंब, उक्कलगाव, उंदिरगाव, मातापूर, राहाता तालुक्यात ममतापूर, निर्मळ पिंप्री, राजुरी, गणेशनगर, शिर्डी, केलवड, संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे, पिंप्री लौकी, धांदरफळ, राजापूर, सावरगाव तळ, जवळे कडलग, निमगाव जाळी भागात फळबागांचे क्षेत्र अधिक आहेत. काही प्रमाणात पाणी उपलब्ध असलेला अपवाद वगळला तर ५० टक्के बागा जागेवर वाळून गेल्या आहेत.

शेवगाव तालुक्यात ठाकूर निमगाव, खानापुर, घोटण, कऱ्हेटाकळी, एरंडगाव, लाखेफळ, दहिफळ, दहिगाव ही धरणांच्या पट्ट्यातील गावे. या भागातील बागा काहीशा तग धरून असल्या तरी वरखेड, सोनेसांगवी, बोधेगाव, चापडगाव, चेडेचांदगाव, राक्षी, हसनापूर, कोळगाव, आखेगाव भागातील बागा ९० टक्के जळाल्या असल्याचे पाहणीतून आढळले.  

प्रयत्न ठरले व्यर्थ 
फळबाग लागवड केल्यावर पाच वर्षांनी संत्र्याला फळं लागतात. एकदा बाग वाया गेली तर साधारण पाच ते सात वर्षे न भरून निघणारं नुकसान होतं. आम्ही सोळा एकरांवर संत्रा, बोरं, सीताफळ, डाळिंबाची लागवड केली. यंदा पाणी नसल्याने विकतच्या पाण्यावर बाग जगवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न व्यर्थ गेले. त्यामुळे काही झाडं सोडून दिली. सुमारे दहा एकरांवरील बागेचं नुकसान झालं असे कान्होबाचीवाडी येथील बाळासाहेब अकोलकर यांनी सांगितले. चार महिने बाग जगवली, पण आता सोपं नाही, म्हणून २०० झाडे तोडली, आता २५० झाडे जगवायचा प्रयत्न करीत आहोत. झालं नुकसान कसं भरून काढणार. ही झळ साधी नाही असे विठ्ठल लोहकरे म्हणाले. जिल्ह्याच्या सर्वच भागात शेतकऱ्यांनी विकतच्या पाण्यावर फळबागा जगवण्याचा प्रयत्न केला, पण अनेकांचे प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत.  

शेततळी कोरडी
नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांचा विचार करता तीन ते चार वेळा फळपीक उत्पादकांनी दुष्काळाचा सामना केला आहे. फळबाग लागवड केलेल्या जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी शेततळेही केले आहे. जिल्हाभरात तीस हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांची संख्या आहे. आतापर्यंत प्रत्येक दुष्काळात शेततळे कामी आले. त्याच्या पाण्यावरच फळबागा जगवल्या, यंदा मात्र पाऊस नसल्याने जवळपास नव्वद टक्के शेततळी कोरडे आहेत. अनेक वर्षांपासून शेततळ्यावर फळबाग जगवली. यंदा मात्र पाणी नाही, शेततळे कोरडे राहण्याची पहिलीच वेळ आहे. पाणी नसल्याने दहा वर्षांपासून जोपासलेली बाग जागेवर वाळून गेली.’’ असे तिसगाव येथील शेतकरी प्रदीप वाघ यांनी सांगितले. 

फळबागांचे अनुदान अन् विमाही नाही 
फळबाग अनुदानासाठी शासकीय स्तरावर कृषी विभाग, महसूल विभागाकडे नोंदी केल्या. शासनाच्या माध्यमातून अनेक खासगी विमा कंपन्यांना स्वायत्तता दिली. मात्र, ते शेतकऱ्यांना विमा देतात की नाही, हेसुद्धा शासनाच्या प्रतिनिधींनी पाहायला 
हवे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 

भूजलपातळीत घट झालेली गावे 
जामखेडमधील ३, कर्जतमधील ४७, नगरमधील ४, राहुरीमधील २२, संगमनेरमधील ७, शेवगावमधील ५, श्रीगोंदेमधील ५, श्रीरामपूरमधील १, कोपरगावमधील ४३, पारनेरमधील ५७, पाथर्डीमधील ४४, राहाता तालुक्यातील ८ गावांमध्ये भूजलपातळीत तीन मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. 

नवीन माणूस आला की घेतली जातीय सावध भूमिका 
जनावरांसाठी छावण्या सुरू आहेत. मात्र चारा, खुराक व अन्य सुविधा पुरेशा दिल्या जातात की नाही याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने पथके नियुक्त केली आहेत. त्यामुळे छावणी चालकांना धास्तीच आहे. चिंचपूर पांगुळ (ता. पाथर्डी), बाराबाभळी (ता. नगर), करंजी (ता. पाथर्डी), चापडगाव (ता. शेवगाव) यांसह इतर छावण्यांना भेट दिली. चारा, खुराक, पाणी व अन्य सुविधा मिळतात का? याची चौकशी केली. सुरवातीला शेतकरी बोलत नाहीत. छावणीचालकांशी संबंधित लोक लगेच सावध होतात. पत्रकार असल्याचे कळल्यावर लोक बोलते झाले. मात्र छावणीत नवीन माणूस आला की सावध भूमिका घेतली जात असल्याचे पाहायला मिळाले.
 
‘आंधळं दळतं अन...’ 
जिल्ह्यातील पारनेर, नगर, पाथर्डी भागात संत्रा, मोसंबी, श्रीगोंदा, कर्जत भागांत लिंबू, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, शेवगाव भागात डाळिंब, सीताफळाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा पाऊस नसल्याने पाणी उपलब्ध नाही. अनेक भागात दिवाळीपासून म्हणजे तब्बल सहा महिन्यांपासून फळबागा जगवण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. फळबागा जगाव्यात यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने काही तरी हातभार लावावा अशी अपेक्षा, मात्र पुरता दुष्काळ सरला, आता पावसाळा जवळ आला; पण खास फळबागांसाठी म्हणून काहीही आधार मिळाला नाही. आधार सोडा, प्रशासकीय अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, राजकीय नेते कोणाही जागेवर करपत असलेल्या बागांकडे फिरकले नाही की पंचनामा केला नाही, अशी खंत भोसे (ता. पाथर्डी) येथील अशोक टेमकर यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे जिल्हाभरात यंदा नेमक्या किती बागांचे नुकसान झाले? किती तोडाव्या लागणार? याची आकडेवारी ना कृषी विभागाकडे ना जिल्हा महसूल प्रशासनाकडे. नुकसानीची नोंद ठेवण्याची जबाबदारी तशी कृषी विभागाची आहे. मात्र भर दुष्काळात येथील कृषी विभागाचा कारभार म्हणजे ‘आंधळ दळतंय अन कुत्रं पीठ खातंय’ असाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा मात्र दुष्काळाने फळबाग उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. फळबागा वाचवण्यासाठी प्रशासकीय व सरकारी पातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही. एकदा बाग वाया गेली तर सहा ते सात वर्षांचे नुकसान होते, असे भोसे (ता. पाथर्डी) येथील साईनाथ घोरपडे यांनी सांगितले.

जिल्ह्यामधील फळबागांचे क्षेत्र 
आंबा  २३,९३० (कलमे व रोपे)
काजू  ५४८
नारळ    १०९३
चिकू   १२,०५१
संत्रा १४९८
मोसंबी ३८०३
पेरु ५२२४
डाळिंब  ११,९३७
बोर ६३१६
सीताफळ ६३५१
चिंच  ५०५०
अंजीर  ३८८
कागदी लिंबू   ७६५९
जांभूळ  ४९

 


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...