विदर्भात पाण्याअभावी फळपिके धोक्‍यात

विदर्भात पाण्याअभावी फळपिके धोक्‍यात
विदर्भात पाण्याअभावी फळपिके धोक्‍यात

नागपूर : विदर्भात सूर्य आग ओकू लागला आहे, त्यासोबतच भूजलस्तरही खालावत चालल्याने त्याचा थेट फटका संत्रा, डाळिंबासोबतच बहुतांश फळपिकांना बसला आहे. जलायशेदेखील तळ गाठू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढीस लागली आहे. यावर्षी संत्र्याच्या आंबिया बहाराची उत्पादकता ५० टक्‍क्‍याने कमी होण्याची भीती वर्तविली जात आहे.  विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यांतील जलाशयात गेल्यावर्षी या महिन्यात सरासरी २३ टक्‍के साठा होता. यावर्षी उन्हाची तीव्रता वाढल्याने हा साठा अवघ्या १५ टक्‍क्‍यांवर आला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांकडे असलेले संरक्षित सिंचनाचे पर्यायदेखील कोरडे पडू लागले आहेत. परिणामी फळपिकांना वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. विदर्भात सरासरी दीड लाख हेक्‍टरवर संत्रा आहे. यातील एक लाख हेक्‍टरवरील संत्रा झाडे उत्पादनक्षम असल्याचे महाऑरेजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे सांगतात. पूर्वी मृग बहार घेण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. नजीकच्या काळात सिंचनाची सोय असलेले शेतकरी आंबिया बहार घेऊ लागले आहेत. त्यामुळे आंबिया बहाराखालील क्षेत्र ७० हजार हेक्‍टरच्या आसपास आहे. 

संत्र्याचा यावर्षीचा हंगाम चांगला राहून सीताफळ, डाळिंबाच्या तुलनेत उत्पादकता अधिक मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, आता संत्रा बागा वाचविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या अनेक उन्हाळ्यांपैकी यावर्षीच्या उन्हाळात पाणीटंचाईची तीव्रता ३० टक्‍के अधिक असल्याचे जाणकार सांगतात. बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणीटंचाईसोबतच संत्रा उत्पादक फायटोप्थोरा, शेंडेमर, डिंक्‍या यासारख्या कीडरोगांमुळेदेखील हैराण आहेत. परंतु लिंबूवर्गीय संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठ या दोघांकडून अडचणीच्या या काळात कोणतेच मार्गदर्शन संत्रा उत्पादकांना होत नसल्याचा आरोप अंजनगावसूर्जी (अमरावती) येथील ऋषीकेश सोनटक्‍के या संत्रा उत्पादकाने केला. संत्र्यासोबतच केळी, डाळिंब उत्पादकांमध्येदेखील पाणी समस्येमुळे अस्वस्थता वाढीस लागली आहे. बागा वाचविण्यासाठी शेतकरी ८०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेल घेत असून, त्याकरिता वीजपंप आणि पाईप यावर मोठा खर्च होत आहे. त्यातच बोअरवेल ड्राय गेल्यास हा खर्च निष्फळ ठरतो.  साधारणतः १२ डिसेंबर ते जानेवारीअखेरपर्यंत आंबिया बहार घेण्याकरिता पाणी दिले जाते. त्यानंतर फुलधारणा झाल्यापासून उन्हाची तीव्रता पाहता पाण्याचे नियोजन करावे लागते. या वेळी परिस्थिती अत्यंत विदारक असून भूजलस्त्रोत संपू लागल्याने संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. आंबिया बहारातील फळांची गळ होत असून काही शेतकरी काडी कचरा व तत्सम आच्छादनाचा पर्याय वापरत आहेत.  - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेज यावर्षी उन्हाचा चटका वाढल्याने सीताफळाची ५ ते दहा टक्‍के झाडे बाद होण्याची भीती आहे. सद्या झाडे विश्रांतीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी न देणे चांगले राहिले. पाणी दिल्यामुळे झाडाला नवती फुटते. छाटणी देखील उशिरा करणे फायद्याचे राहणार आहे. उन्हामुळे फुटलेली नवतीदेखील वाळण्याची भीती राहते. - शाम गट्टाणी, सीताफळ महासंघ, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com