पुणे विभागात फळबाग लागवड क्षेत्र घटले

फळबाग लागवड
फळबाग लागवड
पुणे  ः केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी जॉब कार्डची जाचक अटी लावली आहे. त्यामुळे फळबाग लागवडीत घट झाली आहे. पुणे विभागात चालू वर्षी उद्दिष्टाच्या तुलनेत १४ हजार ९३७ हेक्‍टर क्षेत्रापैकी अवघी२४५७ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली आहे. ही स्थिती पाहता शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे पाठ फिरविल्याचे दिसते. 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. ही योजना राज्यात २०११-१२ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात फळबाग लागवड करून रोजगारनिर्मिती करणे व त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, फळबाग लागवड करून फळपिकांच्या खालील क्षेत्र वाढवत शेती पूरक व्यवसाय वाढ करणे व उत्पादन वाढविणे हा मुख्य उद्देश होता.
या योजनेत जमीन तयार करणे, खड्डे खोदणे, रोप लागवड करणे, काटेरी कुंपण करणे, आंतरमशागत करणे, खते देणे, संरक्षण, पाणी देणे अशा विविध बाबींचा समावेश आहे. त्यासाठी सात बारा व आठ अ उताराधारक शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भू सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कर्जमाफी योजनेनुसार अल्प भूधारक व सिमांत शेतकरी, अनुसूचित जमातीतील व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्तीकडे जॉब कार्ड व ग्रामपंचायत, ग्रामसभेची मान्यता असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
फळबाग लागवडीचे काम लाभधारकाने स्वतः व जॉबकार्ड धारक मजुरांकडून करून घेणे आवश्‍यक आहे. याबाबींचा विचार केल्यास शेतकऱ्यांना हे शक्‍य होत नसल्याने शेतकऱ्यांनी फळबाग करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे फळबाग लागवडीत घट होऊ लागली आहे. 
गेल्या वर्षी पुणे विभागात या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या १७ हजार १९७ हेक्‍टरपैकी २६२६ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली होती. यात नगर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ५८३५ हेक्‍टरपैकी २१४६ हेक्‍टरवर लागवड झाली होती. पुणे जिल्ह्यात ६ हजार १५ हेक्‍टरपैकी ४०८ तर सोलापूर जिल्ह्यात पाच हजार ३४७ हेक्‍टरपैकी ७१ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली होती.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत फळबाग लागवडीत घट झाली असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी जून ते डिसेंबर या कालावधीत फळबाग लागवड करतात. त्यासाठी पहिल्या वर्षी ५०, दुसऱ्या वर्षी २५, तिसऱ्या वर्षी २५ टक्के अनुदान देण्यात येते. परंतु आता कालावधी संपला असून फळबाग लागवडीची स्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे दिसून येते.
 
पुणे विभागात जानेवारीअखेर झालेली लागवड (हेक्‍टर)
जिल्हा उद्दीष्ट झालेली लागवड 
नगर ४००० १४६७ 
पुणे ५५९७ ६१४
सोलापूर ५३४० ३७६

 

 
 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com