परभणी जिल्ह्यात जाचक अटींमुळे ४९ हेक्टरवरच फळबाग लागवड

फळबाग लागवड
फळबाग लागवड
परभणी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत यंदा २२०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिलेली असताना चार तालुक्यांतील ७१ शेतकऱ्यांनी ४९.३० हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. लागवड केलेल्या फळपीकांमध्ये आंबा, चिकू, पेरु, डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, सिताफळ यांचा समावेश आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असूनही जाचक अटी,निकषामुळे अनेक शेतकरी फळबाग लागवड करू शकले नाहीत.
 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत २६४ कृषी सहाय्यकांना २८०० हेक्टरवर फळबाग लागवडीचा लक्षांक देण्यात आला होता. जिल्ह्यातील एकूण २६४७ शेतकऱ्यांनी १९६४.७० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल केले होते.
 
परंतु २३०३ शेतकऱ्यांच्या १६६०.३५ हेक्टरवरील फळबाग लागवडीच्या प्रस्तावांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २२०० शेतकऱ्यांना १५३७.४५ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदले होते.
 
परंतु ग्रामरोजगार सेवकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना वेळेवर रोपे मिळाली नाहीत. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही योजनेच्या जाचक अटी निकषामुळे अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही फळबाग लागवड करता आली नाही.
 
नऊ पैकी चार तालुक्यांतील शेतकऱ्यांनी यंदा फळबाग लागवड केली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील ५०शेतकऱ्यांनी ३५.४०,  पाथरी तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी ११, सोनपेठ तालुक्यात१ शेतकऱ्यांने ५० गुंठे, गंगाखेड तालुक्यातील ४शेतकऱ्यांनी २.४० हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे.
 
फळपिकनिहाय लागवडीमध्ये २१ शेतक-यांनी ११.५० हेक्टरवर आंबा, १ शेतक-यांने १ हेक्टरवर चिकू, ४ शेतक-यांनी १.९० हेक्टरवर पेरु,३ शेतकऱ्यांनी ३ हेक्टर डाळींब, १६ शेतकऱ्यांनी १४.७० हेक्टरवर संत्रा, ५ शेतकऱ्यांनी ४.३० हेक्टरवर मोसंबी, १८ शेतकऱ्यांनी ९.९० हेक्टरवर लिंबू, ३ शेतक-यांनी ३ हेक्टरवर सिताफळ लागवड केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com