पुणे जिल्ह्यात १६३ हेक्टरवर फळबाग लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पुणे जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. त्याचा फटका रब्बी पेरण्यांसह, फळबाग लागवडीला बसला आहे. चालू आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून २८० शेतकऱ्यांनी १६२.९९ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. यामध्ये सर्वाधिक फळबाग लागवड पुरंदर तालुक्यात झाली असून १८८ शेतकऱ्यांनी सुमारे ९४.९४ हेक्टरवर नव्याने फळबाग लागवड केली आहे.  

चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात आली.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी २५ लाख ६४ रुपयांच्या निधी वाटपाचे आर्थिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी २ हजार ६३८ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पर्यायी नवे स्राेत निर्माण करणे, लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्यासाठी फळझाडांच्या लागवडीस चालना देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सात आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त कलमांद्वारेच लागवड (अपवाद नारळ), घन लागवड, इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आदि बाबी राबविता येणार होत्या. या योजनेअंतर्गत आंबा, डाळिंब, काजू, पेरु, सीताफळ, नारळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आदि फळपिकांची लागवड करता येणार आहे. 

योजनेअंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांना कमाल दहा हेक्टर तर उर्वरित विभागासाठी कमाल सहा हेक्टरपर्यंत लाभ घेता येणार होता. तसेच लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड वा अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास ते शेतकरी यातून वगळण्यात आले.

या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत होता. योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज सादर करणे बंधनकारक होते. त्यासाठी किमान ४३,५९६ ते कमाल १,०९,४८७ रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार होते. अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यापैकी १२९८ लाभार्थ्यांना कृषी विभागाकडून पूर्वसंमती देण्यात आली. लागवड करण्यासाठी ८०९ लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. 

तालुकानिहाय झालेली फळबाग लागवड (हेक्टर)
तालुका  शेतकरी संख्या फळबाग लागवड क्षेत्र
भोर  ५.२० 
वेल्हा ०.७०
हवेली   १०  ७.४० 
खेड  ७ ३.७५
जुन्नर १२   १८ 
शिरूर  १६ १२
इंदापूर २५  १४
दौंड १०  ७ 
पुरंदर  १८८ ९४.९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com