सातारा जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत ५३० हेक्‍टरवर फळबाग लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात ५३०.७७ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली आहे. गतवर्षी आघाडीवर राहिलेल्या फलटण तालुक्याने या वर्षीही आघाडी कायम ठेवली आहे. दुष्काळी माण तालुक्यातून मात्र या योजनेस प्रतिसाद मिळालेला नसल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारी स्पष्ट होत आहे. 

फलोत्पादन संचालनालय, ग्रामपंचायत व कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पडीक जमीन, सलग जमीन व बांधावर फळबाग लागवडीसाठी मनरेगातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कोकम, फणस, अंजीर, सुपारी या फळझाडांची लागवड करण्यात येत आहे. लागवडपूर्व मशागत, लागवड, संगोपन करण्यासाठी मजुरी, रोपे, खते यासाठी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पीकनिहाय मापदंडानुसार निधी दिला जातो.

मजुरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तर खते आणि रोपांसाठीचा निधी संबंधित एजन्सीच्या खात्यावरून थेट जमा करण्यात येतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून १२११ अर्ज प्राप्त झाले आहेत. ११७१.४५ हेक्टर क्षेत्रास तांत्रिक मंजूरी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यत ५३०.७७ हेक्‍टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. 

तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्‍टर) ः सातारा १६.४०, कोरेगाव ११३.८९, खटाव ५.८५, कऱ्हाड ८५.०६, पाटण ७६.८५, वाई ३१.४७, जावली ०.९०, खंडाळा २६.४४, महाबळेश्वर १.००, फलटण १७२.९१, माण ०.००. 

माण, जावली, महाबळेश्वरात अल्प प्रतिसाद जिल्ह्यात सर्वाधिक माण तालुक्यास दुष्काळाच्या झळा बसत आहे. यामुळे या तालुक्यातून मनेरगातंर्गत फळबाग लागवडीस प्रतिसाद मिळालेला नाही. या योजनेतून तालुक्यात शून्य टक्के लागवड झाली आहे. तसेच जावली व महाबळेश्वर तालुक्यातही या योजनेस अल्प प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही तालुक्यात नाममात्र फळबाग लागवड झाली आहे. अजुनही या योजनेचा कालावधी शिल्लक असल्याने किती हेक्टरवर लागवड होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com