नऊशेचे खत पाचशेला मिळते कसे ?

मिश्र खते
मिश्र खते

पुणे : एक गोणी मिश्र खत तयार करण्यासाठी किमान ९०० रुपये खर्च होत असताना बाजारात ५०० ते ७०० रुपयांना विक्री होतेच कशी, ही खते आहेत की माती, असे सवाल खत उद्योगात उपस्थित केले जात आहेत. खतामधील माफियाराजमुळे काही चांगले कारखाने देखील सतत संकटात आले असून मिश्र खत कारखाने बदनामीच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खाली दिलेल्या तक्त्यामधील माहिती खत उद्योगाकडून काही महिन्यांपूर्वी घेण्यात आलेली आहे. एक टन १८:१८:१० ग्रेडचे मिश्र खतनिर्मितीचे गणित बघता एकूण खर्च १६ हजार ७१५ रुपये येतो आहे. म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याला १८:१८:१० ग्रेडचे मिश्र खताची ५० किलोची गोणी विकण्यासाठी निव्वळ निर्मिती खर्च किमान ८३५ रुपये होतो आहे. त्यात पुन्हा उत्पादक, वितरक व डिलरचा नफा जोडल्यास किमान ९०० रुपयांपर्यंत या खताची विक्री करावी लागेल. मात्र, बाजारात ही खते ५०० ते ९०० रुपयांना विकली जात आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या नावाखाली अनुदानित खताचा बेधडक काळाबाजार सुरू आहे. प्रत्यक्ष खताचा वापर कमी करून डोलोमाईट, जिप्सम म्हणजे फरशीची भुकटी करून दाणेदार खताखाली विकली जात आहे. कृषी विभागाचा गुणनियंत्रण विभाग आणि प्रयोगशाळा यांना ताब्यात घेऊन खतांमधील माफियांनी आपले पाय पसरले आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र शासनाने मिश्र खते तयार करण्यासाठी मर्यादा घातलेल्या असताना राज्याच्या कृषी विभागाला मिश्र खताच्या ग्रेड कशासाठी हव्या आहेत, केंद्राच्या खत कायद्यातील संयुक्त खताच्या ग्रेडच्या सूचित २०:२०:० आणि २०:१०:१० असतानाही पुन्हा मिश्र खताच्या ग्रेडला मान्यता का दिली जात आहे, मिश्र खते तांत्रिकदृष्ट्या व शास्त्रीयदृष्ट्या एकसमान गुणवत्तेची तयार होऊ शकत नाहीत. आता संयुक्त खताच्या भरपूर ग्रेडस् उपलब्ध असतानाही कमी गुणवत्तेच्या मिश्र खतांच्या ग्रेडचा वापर पाहून देखील कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ देखील गप्प कसे बसतात, शेतकऱ्यांना वाटून शिल्लक राहिलेली अनुदानित खते याच मिश्र खतांसाठी वापरली जातात. त्याचे वाटप करणारी कृषी विभागाची यंत्रणा पारदर्शक का ठेवली गेली नाही, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. राज्यातील मिश्र खतांचे अड्डे जालना, नांदेड या भागांतच कसे काय तयार झाले, बोगस मिश्र खते असोत की बोगस कीटकनाशके असो त्याचे उगमस्थान मराठवाड्यातच कसे, पीक वाया जाते म्हणून शेतकरी आत्महत्यादेखील याच भागात वाढलेल्या असताना कृषी खात्याची यंत्रणा सुस्त का बसली, राज्यात बोगस खताचे परवाने कोणी वाटले, खतांवर धाडी टाकणारी आणि पुन्हा मिटमिटवी करणारी यंत्रणा कोणती, या यंत्रणेचा गॉडफादर कोण, असेही प्रश्न मिश्र खतातील माफियाराजमधून उपस्थित झालेले आहेत.  मिश्र खतामधील माफियाराज कसे संपेल

  •     मिश्र खताला मान्यता देताना उपयुक्तता तपासावी
  •     कच्च्या मालाचे म्हणजेच अनुदानित खताचे वाटप पारदर्शकपणे करावे
  •     अनुदानित खताचे महिनानिहाय पुरवठा करावा
  •     पुरवठा देताना उत्पादक व वितरक निश्चित करणे
  •     बाजारापेक्षा युरिया, डीएपी अशा उत्पादकांकडूनच थेट खत उचलण्याची सक्ती
  •     खते उचलणारे नेमके तेच घटक आहेत का, साठ्यानुसार उचल होते का हे तपासणारी यंत्रणा उभारावी
  •     अनुदानित खते पॉसवर शेतकऱ्याला विकल्यानंतरच कंपनीला अनुदान मिळते. तोच नियम मिश्र खताला देखील लावावा.
  •     म्हणजेच मिश्र खताची बॅग शेतकऱ्याने विकत घेतल्यानंतरच अनुदानित खताची सबसिडी मूळ उत्पादक कंपनीला द्यावी
  •     मिश्र खताची उपयुक्तता आणि वापर याबाबत विद्यापीठांकडून वेळोवेळी आढावा घ्यावा
  •     मिश्र खतांमधील गुणनियंत्रण यंत्रणा काटेकोरपणे करणे, भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कडक उपाय करणे.
  • एक टन १८:१८:१० मिश्र खतनिर्मितीचे गणित*

    कच्चा माल  मात्रा किलो  डीलर रेट रुपये  एकूण खर्च रुपये
    युरिया   २६०     २५८   १५०७
    डीएपी  ३३० १३४५ ५५८०
    पोटॅश    १७२   ९१०    ३०३९
    सुपर फॉस्फेट २०५  ३२०   ११५२
    फिलर (डोलोमाईट, जिप्सम)  ३३  ११०० ६७
    मजुरी   ००   ००    १५००
    वाहतूक  ००  ००    ४००
    वीज, पाणी, इतर कर  ००  ००   २००
    एकूण    १०००     ०० १६७१५

    (*काही महिन्यांपूर्वीची स्थिती आहे.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com