सांगा कसं करायचं अन् कसं जगायचं, कुणाला सांगायचं...

how to do it and how to live
how to do it and how to live

नाशिक : मागच्या वर्षी मोठा दुष्काळ पाहिला. जे काही उत्पन्न मिळाले ते उत्पन्न टँकरने पाणी विकत घेऊन बाग जगविण्यासाठी खर्च केले. चालू वर्षी पाऊस चांगला असल्याने द्राक्ष हंगाम उभा केला. जवळील थोडेफार पैसे गुंतविले. आत्ता बागांची स्थिती जोमात असताना, या पावसाने सर्व होत्याचं नव्हतं करून ठेवलंय, आता सांगा कसं करायचं अन् कसं जगायचं, कुणाला सांगायचं, आमचं हे दुःख? कोण समजून घेणार, अशी व्यथा निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील तरुण द्राक्ष उत्पादक शेतकरी किशोर निफाडे यांनी दिली. 

नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सप्टेंबर महिन्यात गोड्या छाटण्या केल्या. फुटवा झाल्यानंतर बागा हिरव्यागार व कॅनोपीमुळे डेरेदार असल्याने जोमात दिसून येतात. मात्र, आता बागेच्या आत गेले तर पहिल्या पोंगा अवस्थेतील बागांचे घड जिरले आहेत. तर फुलोरा अवस्थेतील द्राक्षाचे घड कुजले आहेत. 

ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या पावसामुळे सणवार असताना द्राक्षबागा वाचविण्यासाठी रात्री बेरात्री फवारण्या केल्या. मात्र खर्च करूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे आता अपयश आले आहे. आत्तापर्यंत जवळजवळ दीड लाख रुपये खर्च केला. मात्र माझ्या एक एकर बागेत छाटणीनंतर घडच तयार झाले नाहीत. तर जे घड पोंगा अवस्थेत होते, ते संपूर्ण जागेवरच जिरले आहेत, आता सांगा कसं करू, हा खर्च कसा वसूल करू, अशी भावना द्राक्ष उत्पादक शेतकरी अशोक काळे यांनी व्यक्त केली. 

द्राक्षबागेशिवाय दुसरं वर्षाचं पीक नाही, जे होतं ते भांडवल अडीच एकर क्षेत्रात गुंतवलं. आता हाती फक्त नुकसान उरलं आहे. कसंतरी कुटुंब चालवतो, देणं-घेणं करतो. कर्ज काढून बाग उभ्या केल्या, संसाराचं सर्व व्यवस्थित केलं, आता निवांत झालो होतो. मात्र, असा भयानक प्रसंग आला की त्यामुळे काहीच बाकी राहिलं नाही. एक झाडाला चाळीस-पन्नास घड होते, मात्र ही संख्या दोन-तीनवर आली आहे. त्यामुळे उत्पादन तर संपुष्टात आलेच; झालेलं कर्जही फेडू शकत नाही. वर्ष कसं काढायचं, अशी भावनिक प्रतिक्रिया ज्येष्ठ शेतकरी कचेश्वर निफाडे यांनी व्यक्त केली. एकंदरीत कोट्यवधींचा खर्च व येणारे कोट्यवधी रुपयांचे संभाव्य उत्पादन अडचणीत सापडले आहे.

विद्याताईंच्या अश्रूंचा बांध फुटला... संपूर्ण दोन एकर क्षेत्रात घडकुज झाली. सातवीत जाणारा माझा लहान मुलगा सार्थक त्याच्या वडिलांबरोबर पाऊस उघडल्यानंतर पावडरी मारणे, ट्रॅक्टर फसल्यानंतर त्याचा चिखल काढणे, पुन्हा ट्रॅक्टर फसल्यानंतर फवारणीच्या नळ्या ओढणे ही कामे करत होता. हाल होत असताना त्या वेदनेला काहीच मर्यादा नाहीत. आता बागेत येण्याची, काम करण्याची इच्छा राहिली नाही. आमचं नुकसान अन् मनातलं दुःख कसं सांगू! असं बोलत असताना विद्याताई निफाडे यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com