महापुराला ‘अलमट्टी’ किती दोषी?

२००५ मधील महापुरात अलमट्टीचा हा मुद्दा निघाला होता. यंदाही चर्चा होते आहे. एकट्या अलमट्टीमुळेच सांगली भागात पुराची समस्या येते, असे म्हणता येत नाही. कारण, कृष्णा खोऱ्याची भौगोलिक स्थिती, तसेच यंदा झालेली अतिवृष्टी हे मुद्देदेखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पूर परिस्थिती नेमकी कशामुळे तयार होते, याबाबत उपग्रहाच्या मदतीने नव्याने अभ्यास करण्याचा प्रस्ताव आहे. - राजेंद्र पवार, सचिव, जलसंपदा विभाग
अलमट्टी
अलमट्टी

पुणे : राज्याला हादरून सोडणाऱ्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचे ठासून सांगितले जात आहे. मात्र, तांत्रिक अभ्यासात ‘अलमट्टी’चा दोष अद्यापही सिद्ध झालेला नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. त्यामुळे पूरस्थिती नेमकी कशामुळे उद्भवते, याचे गूढ आणखी वाढले आहे. महापुराचा रहस्यभेद करण्यासाठी उपग्रह प्रणालीद्वारे नव्याने अभ्यास करण्याचा निर्णय महाराष्ट्राकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

अलमट्टीचा फुगवटा (बॅकवॉटर) व कोयनेचा विसर्ग (डिस्चार्ज) यामुळे पूर परिस्थिती उद्भवत नसल्याचा दावा कर्नाटक व महाराष्ट्र अशा दोन्ही जलसंपदा विभागांकडून होतो आहे. त्यामुळे यंदाच्या महापुराबाबत कमालीचे रहस्य तयार झाले आहे. “कृष्णा खोऱ्यात महापूर येतो; पण त्याचे निश्चित कारण सध्या कोणाकडेही नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अलमट्टी-सांगली-कोयना असा एक ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ तयार झाला आहे. त्याचा अभ्यास झाल्याशिवाय गुंता सुटणार नाही,” अशी माहिती जलसंपदा विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली.  कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ माजी कार्यकारी संचालक राम बसवंतराव घोटे म्हणाले, “अलमट्टी धरणामुळे महाराष्ट्रात पूर स्थिती तयार होत असल्याचा दावा आपला असतो. पण, तो अद्याप सिद्ध करता आले नाही. कृष्णा पाणी तंटा लवादासमोर हा मुद्दा गेला होता. तेथेही अलमट्टी आणि पूर यांचा परस्परसंबंध असल्याचे आपण पटवून देऊ शकलो नाही. त्याबाबत भरपूर अभ्यासही झालेला आहे. आयआयटीनेदेखील अभ्यास केला. मात्र, अलमट्टीमुळे महापूर येत असल्याचा निष्कर्ष निघालेला नाही. आता पुन्हा ‘अलमट्टीची थेअरी’ मांडायची असल्यास ताजी आकडेवारी व यंदाची स्थिती विचारात घेऊन फेरअभ्यास करावा लागेल.”    जलसंपदा विभागाचे माजी सचिव शि. मा. उपासे म्हणाले की, “अलमट्टी धरणामुळे महाराष्ट्रात पूर परिस्थिती तयार होत नसल्याचा निष्कर्ष अभ्यासाअंती आलेला आहे. असे असले तरी राज्यातील सध्याची पूरस्थिती जगाने बघतली आहे. त्यामुळे अलमट्टी आणि महापूर याचा संबंध त्रयस्थ यंत्रणेकडून पुन्हा तपासून पाहावा लागेल.”  “कृष्णा पाणी तंटा लवादाने कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्राचे एक आंतरराज्य मंडळ स्थापन करण्याची सूचना केली होती. हे मंडळ आस्तित्वात आल्यानंतर अलमट्टी आणि महापूर याचा मुद्दा मंडळासमोर मांडला जा शकतो,” असे श्री. उपासे यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राने विनंती करूनही अलमट्टीतून पुरेसे पाणी कर्नाटक सोडत नव्हते, या मुद्द्यावर श्री. उपासे म्हणाले, “धरणातून अत्यावश्यक पाणी सोडावेच लागते. अन्यथा धरणफुटीचा धोका असतो. अशी जोखीम पत्कारून अलमट्टीत पाणी साठवून ठेवण्याची भूमिका कर्नाटक घेईल असे वाटत नाही. तथापि, धरणातून पाणी एकावेळी सोडायचे की टप्प्याटप्प्याने सोडायचे हा निर्णय स्थानिक प्रशासनाचा असतो.” जलसंपदा सचिव श्री. पवार यांच्या मते अलमट्टीबाबत अपेक्षित कार्यवाही कर्नाटकने वेळोवेळी केली आहे. “आपली भौगोलिक स्थिती, गेल्या ४० वर्षांत झाला नाही इतका पडलेला पाऊस, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. अलमट्टीतून पाणी सोडण्याबाबत मी स्वतः कर्नाटकमधील जलसंपदा सचिवांच्या संपर्कात होतो. हवाई पाहणीदेखील आम्ही केली. अलमट्टीतून अपेक्षित पाणीही सोडले जात होते. आता राज्याच्याच पातळीवर या भागाचा अभ्यास, नव्या उपाययोजना, उपग्रह तंत्राची मदत यातून पूर परिस्थितीबाबत काही नवे नियोजन करता येते का, याची चाचपणी करावी लागेल,” असे श्री. पवार म्हणाले.  महसूल विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी मात्र पूर परिस्थितीला अलमट्टीच जबाबदार असल्याचे सांगत आहे. “अलमट्टीतून पाणी वेळोवेळी सोडले असते, तर महापूर टाळता आला असता. पाणी सोडण्याची विनंती सतत करूनही कर्नाटक शासन दाद देत नव्हते. मुख्यमंत्र्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर अलमट्टीतून पाणी सोडले गेले. परिणामी पूर ओसरत गेला,” अशी माहिती एका महसूल अधिकाऱ्याने दिली.  जलसंपदा विभागाची माहिती मात्र अजून वेगळीच आहे. कर्नाटकने अलमट्टीचा मुद्दा यंदाही केंद्रासमोर खोडून काढला आहे. “मुळात अलमट्टीची पूर्ण संचयपातळी (एफआरएल) १२३ मीटर आहे. महाराष्ट्रात पूर असताना अलमट्टीची पातळी फक्त ८५ मीटर होती. त्यामुळे धरण भरलेलेच नसताना मोठा फुगवटा होऊ शकत नाही, असे सांगत महाराष्ट्राच्या दाव्यात काहीही तथ्य नसल्याची भूमिका कर्नाटकने घेतली. त्यावर राज्य शासनाला प्रतिवाद करता आला नाही. दोन्ही ठिकाणी भाजपची सरकारे असल्याने ताणाताणी झाली नाही. मात्र, अलमट्टीचा मुद्दा सोयीसोयीने वापरला गेला,” असे जलसंपदा सूत्रांचे म्हणणे आहे. 

कसे आहे अलमट्टी धरण कृष्णा नदीवर अलमट्टी (ता. बसवाना बागेवाडी, जि. विजापूर) गावानजीक १९६४ मध्ये कर्नाटकने धरण बांधायला सुरवात केली. १४७ गावांची ४८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली घालून २००२ मध्ये बांधकाम थांबवले. धरणाची लाबी १५६४.८३ मीटर व उंची ४९.२९ मीटर आहे. त्यात सध्या ११० टीएमसीपर्यंतच पाणी साठवले जाते. पूर्ण संचयपातळी ५१९.६० मीटर आहे. अलमट्टीला दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र २० हजार २३५ हेक्टर, तर उजव्याचे १६ हजार १०० हेक्टर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com