असे करा धुक्याच्या काळात कांदा पिकाचे संरक्षण

how to take care of onion crop during fog condition
how to take care of onion crop during fog condition

धुक्याच्या प्रभावामुळे कांदारोपांची पात जळून जाते आणि गळून पडते. या काळात सावध राहून पिकाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. भूपृष्ठालगतची आर्द्र हवा थंड होऊन तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यास धुके निर्माण होते. काही प्रसंगी पृथ्वीवरील उष्ण पाणी बाष्पीभवन क्रियेने जवळील शुष्क थंड हवेत शिरते. मग हवा संतृप्त झाल्यासही धुके संभवते. वारा वाहणे मध्येच बंद झाल्यास आणि आभाळ निरभ्र झाल्यास कांदा पिकावर विपरीत परिणाम होतो. धुक्याच्या प्रभावामुळे रोपांची पात जळून जाते आणि गळून पडते. या काळातील समस्या व उपाययोजना पुढीलप्रमाणे. फुलकिडे  हे आकाराने अत्यंत लहान, पाचरीसारखे, पिवळसर तपकिरी असतात. शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. पिले आणि प्रौढ कीटक पाने खरवडून पानातील रस शोषतात. शोषण करताना असंख्य चावे घेतल्यामुळे पानांवर पांढरे ठिपके दिसतात. त्याला ‘टाक्या’ म्हणतात. असे असंख्य ठिपके जोडले जातात व पाने वेडीवाकडी होऊन वाळतात. दिवसा वाढलेल्या तापमानात ही कीड पानाच्या बेचक्‍यात खोलवर किंवा बांधावरील गवतात लपून राहते. किडीने केलेल्या जखमांमधून करपा रोगाच्या जंतूंचा प्रसार होतो.  उपाययोजना

  • लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ ते ७० टक्के आर्द्रता असताना व्हर्टिसिलियम लेकॅनी पाच ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.  
  • निंबोळ्या उपलब्ध झाल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.  
  • पिकाच्या उंचीपेक्षा वर एकरी १२ ते १८ गडद निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.  
  • शेताच्या कडेने मक्‍याच्या दोन ओळींची लागवड करावी.  
  • फिप्रोनिल १५ मिलि किंवा प्रोफेनोफॉस (५० इसी) १० मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ इसी) ५ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आलटून-पालटून फवारणी करावी. फवारणी करताना द्रावणात चिकट द्रवाचा (०.६ मिलि प्रतिलिटर पाणी) वापर करावा.  
  • फवारणी सकाळी किंवा संध्याकाळचे वेळी करावी.  
  • शेत नेहमी तणमुक्त ठेवावे.  
  • शिफारशीपेक्षा जास्त खत व पाणी देणे टाळावे.  
  • मित्रकीटकांचे संवर्धन करावे. रासायनिक कीडनाशकांचा वापर मर्यादित ठेवावा.  
  • लागवड करण्यापूर्वी रोपप्रक्रिया करावी.  
  • पिकांची फेरपालट करावी.
  • करपा रोग साधारण १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ८० ते ९० टक्के आर्द्रता या रोगाच्या वाढीस पोषक असते. रब्बी हंगामात जानेवारी-मार्चमध्ये पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण असेल तर रोगाची तीव्रता अधिक असते. हे रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतात. रोपवाटिका तसेच पुनर्लागवड झालेल्या पिकावर तसेच बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यावरही या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. रोगाची लक्षणे

  • ‘अल्टरनेरिया पोराय’ या बुरशीमुळे होणाऱ्या ‘जांभळा करपा’ या रोगामध्ये पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे. चट्ट्याचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो.   
  • असे अनेक चट्टे पाने किंवा फुलांच्या दांड्यावर पडतात. ते एकमेकांत मिसळून पाने करपतात व वाळतात. झाडाच्या माना मऊ पडतात, फुलांचे दांडे मऊ पडल्याने वाकतात किंवा मोडून पडतात.  
  • ‘स्टेम्फिलियम व्हॅसिकॅरियम’ बुरशीमुळे होणाऱ्या ‘तपकिरी करपा’ रोगात पिवळसर, तपकिरी लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसतात. चट्ट्याचा आकार वाढत जाऊन पाने सुकतात. फुलांच्या दांड्यावर रोग आल्यास दांडे मऊ होतात व जागी वाकून मोडतात.  
  • ‘कोलिटोट्रायकम ग्लेओस्पोराईडस’ या बुरशीमुळे होणाऱ्या ‘काळा करपा’ रोगात सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार ठिपके वाढू लागतात. त्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने वाळतात. चट्टे जवळून पाहिल्यास काळ्या ठिपक्याचा मधला भाग पांढरा दिसतो. त्याभोवती गोलाकार काळे पट्टे दिसतात.
  • उपाययोजना

  • लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.  
  • पुनर्लागवड केल्यावर १५ दिवसांनी मॅंकोझेब २५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. ८ ते १२ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. द्रावणात चिकट द्रवाचा (०.६ मिलि प्रति लिटर पाणी) वापर करावा.  
  • नत्रयुक्त खताचा अति आणि उशिरा वापर टाळावा.  
  • पुनर्लागवड सरी वरंब्यावर करावी.  
  • मर रोग रब्बी हंगामादरम्यान पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण असल्यास रोपवाटिकेत ‘स्क्लेरोशियम रॉलफ्सी’ या बुरशीमुळे मर रोग होतो. रोप वाढत असताना ही बुरशी जमिनीलगतच्या भागातून शिरकाव करते. जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात, सुकतात व पिवळी पडतात. त्यावर पांढरी बुरशी वाढते. बुरशी जमिनीत सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहू शकते. या रोगामुळे रोपांचे १० ते ९० टक्क्यापर्यंत नुकसान होते. प्रादुर्भवित रोपांच्या पुनर्लागवडीनंतर रोग शेतातदेखील मोठ्या प्रमाणात पसरतो. उपाययोजना

  • बियाणे निरोगी, स्वच्छ व खात्रीचे असावे.  
  • रोपवाटिकेसाठी पाण्याचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होणारी जागा निवडावी.  
  • रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. कारण त्यावर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.  
  • रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.  
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास दोन रोपांच्या ओळीत ताम्रयुक्त बुरशीनाशकाचे पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण ओतावे.  
  • धुके पडणारे वातावरण किडी-बुरशीला उपयुक्त ठरत असल्याने कीडनाशके अधिक प्रभावी काम करीत नाहीत. अशा स्थितीत पुढील प्रतिबंधात्मक उपाय करावेत.  
  • शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण, सुकलेले लाकूड आदी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेला पेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे पाहावे.  
  • पिकास थोडे पाणी द्यावे. शेतात पाणी सोडल्याने तापमान ०.५ ते २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते.  
  • ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणाऱ्या गंधक पावडरीची (८० टक्के) ४० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.  
  • शेताच्या उत्तर-पश्चिम दिशेच्या बांधावर आणि मध्यभागी ठिकठिकाणी वारा प्रतिरोधक तुती, शिसव, सुबाभूळ, जांभूळ आदी झाडांचे सजीव कुंपण तयार केल्यास गार हवेच्या झुळकांपासून पिकाचा बचाव होऊ शकतो.  
  • धुक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी शेतात अल्प प्रमाणात वाळू मिसळावी.  
  • स्युडोमोनस फ्लुरोसन्स एक किलो प्रति एकर प्रमाणात फवारावे.  
  • धुक्यापासून सर्वाधिक नुकसान नर्सरीत होते. संध्याकाळी रोपांच्या पानांवर पाण्याचा हलका फवारा मारावा.   
  • नर्सरीत रोपे रात्रीच्या वेळेत प्लॅस्टिक कागदाने झाकावेत. असे केल्याने प्लॅस्टिकमधील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढते. पॉलिथिनऐवजी पेंढा देखील वापरता येतो.  
  • रोपांना सकाळी आणि दुपारी सूर्यप्रकाश मिळण्यासाठी त्यांचा दक्षिण भाग उघडा राहील याची खबरदारी रोपे झाकताना घ्यावी.
  • टिप्स

  • कीडनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठीचे आहे. त्यांच्या शिफारसी महात्मा फुले कृषी विद्यापीठानुसार दिल्या आहेत.
  • संपर्क - डॉ. विनायक शिंदे-पाटील ७०७१७७७७६७ (सहायक प्राध्यापक, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com