सोयाबीन यंदा काढणीलाही झालं महाग

शेतात सोयाबीनच्या नुसत्या काड्या उभ्या हाईता. एक एक करून काडी कापावी लागती. निम्म्याहून अधिक शेंगा बुरशीमुळं खराब झाल्या.
hingoli
hingoli

हिंगोली ः शेतात सोयाबीनच्या नुसत्या काड्या उभ्या हाईता. एक एक करून काडी कापावी लागती. निम्म्याहून अधिक शेंगा बुरशीमुळं खराब झाल्या. दोन- चार शेंगात चांगले दाणे हाईत. बाकी सगळं डागील झालं. डागील सोयाबीन कोंबड्यांची खादवळ म्हणून देखील कुणी घेणार नाही. सोयाबीन तर काढायला महाग झालं. पण रान नीट करून पेरणीसाठी काढणं भाग आहे. तुरीत पाणी साचून राहिल्याने समदा पाला गळून गेला. त्यामुळं शेतात तुऱ्हाट्याच उभ्या हाईत. कापूस गळून पडला. सरकीला मोड फुटले. यंदा खरिपात काहीच हाती लागलं नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. वसमत तालुक्यातील आडगाव रंगेबुवा येथील ज्येष्ठ शेतकरी उत्तमराव संवडकर बैल चारत असताना अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सांगत होते. ते म्हणाले, की दोन महिन्यांपासून सारखा पाऊस असल्यामुळे शेतात पाऊल टाकता आलं नाही. पिकांमध्ये तणकटे वाढली. सोयाबीनची तर लई आबदा झाली. काढणीच्यावेळी भिजल्यामुळे मोड फुटले. बुरसलेल्या शेंगा काढताना गळून पडल्या. एकरी अडीच-तीन क्विंटलचा उतारा आला. दरवर्षी एकरी ८ ते ९ क्विंटल सोयाबीन होत असते. कापसाची बी परिस्थिती तशीच. कापसावर एकरी आठ हजारांवर खर्च झाला. मजूर न मिळाल्यामुळे वेचणीस उशीर झाला. तोपर्यंत कापसातील सरकीला मोड फुटले होते. पाणी साचून राहिल्याने खालच्या फांद्यांची बोंडे झाडावरच सडून गेली. एकरी दहा क्विंटलपर्यंत उतारा देणारा कापूस यंदा एकरी एक क्विंटलच झाला. बॅंकेचे दीड लाख रुपये कर्ज. परंतु कर्जमाफीच्या यादीत नाव नाही. यंदाच्या खरिपात आमदानीच झाली नाही. त्यामुळे कर्ज कसं फेडावं याची चिंता आहे. सरकारनं मदत करायला पाहिजे.  शिरली येथील नारायण पुंडगे मजुरासोबत स्वतः सोयाबीनची काढणी करत होते. ते म्हणाले, की सहा एकर सोयाबीन आहे. सततच्या पावसामुळे वाढ झाली नाही. पिकास फांद्या फुटल्या नाहीत. नुसतं सरळ वाढलं. ते पावसात भिजलं. पातळ शेंगा लागल्या असून त्यासुद्धा भिजून खराब झाल्या आहेत. काढणीला मजूर वेळेवर मिळाले नाहीत. आता नुसत्या काड्या उभ्या आहेत. तणकटातील एक एक काडी शोधून कापणी करावी लागत आहे. त्यामुळे खूप वेळ लागत आहे. डागील दाणे कोंबड्यांची खादावळ म्हणून सुद्धा कुणी घेणार नाही. काढणीचा खर्च देखील घरूनच करावा लागणार आहे.  कळमनुरी तालुक्यातील येळेगाव गवळी येथील ज्ञानेश्वर मंदाडे त्यांच्या पत्नी सोबत सोयाबीनच्या शेतातील गवत कापून पेरणीसाठी रान मोकळं करत होते. श्री. मंदाडे म्हणाले, की चारपैकी दोन एकरमधील तूर पाणी साचून राहिल्याने उन्मळून गेली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथील वयोवृद्ध शेतकरी रामराव पुंडगे मजूर नसल्यामुळे स्वतः शेतातून कापणी केलेल्या सोयाबीनची गंजी लावत होते. ते म्हणाले, की यंदा दुबार पेरणी करावी लागली. त्यावर दहा ते बारा हजार रुपये खर्च झाला. दरवर्षी तीन एकरांत वीस ते पंचवीस क्विंटल सोयाबीन होत असते. यंदा पावसानं झोडपून काढल्यानं खूप नुकसान झालं. एकरी तीन क्विंटलचा उतारा येण्याची शक्यता दिसत नाही. सरकारनं विमा मंजूर करून आर्थिक मदत करावी.

हळद पिकालाही फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हळदीला देखील अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीचा जोरदार फटका बसला. जमिनी खरडून गेल्यामुळे हळदीची नासाडी झाली. जिल्ह्यातील कयाधू नदी तसेच ओढे, नाल्या काठचे मिळून सुमारे सव्वादोनशे हेक्टरवरील हळदीचे नुकसान झाले आहे. सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर्णा नदीला पूर आला. त्यामुळेही नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या.

प्रतिक्रिया चार एकरावर सोयाबीनची दुबार पेरणी केली. त्यावर वीस हजारांवर खर्च झाला. काढणीला बारा हजार रुपये लागले. जमीन अजून ओलीच असल्यामुळे शेतात मळणी यंत्र आणता येत नाही. गंजी लावलेल्या सोयाबीनवर बुरशी चढली आहे. - ज्ञानेश्वर मंदाडे,  येळेगाव गवळी, ता. कळमनुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com