पुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंय

नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो, एकीकडं उसाला भाव नाही, खर्च करता-करता नाकीनऊ आले, उत्पन्नाचं साधन नसल्यानं दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो.
crop loss
crop loss

सोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो, एकीकडं उसाला भाव नाही, खर्च करता-करता नाकीनऊ आले, उत्पन्नाचं साधन नसल्यानं दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्यावरच घर आणि शेतीचा खर्च कसाबसा भागतो. पण या पुरानं सगळा ऊस आडवा पाडला. पाण्यानं पार तो ओरबाडून गेला. आता ऊसच नव्हे, तर आमचं जगणंच त्यानं खरवडून नेलंय हो, अशी व्यथा वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथील शिवानंद रामचंद्र होनमाने हा तरुण शेतकरी व्यक्त करत होता. सीना नदीच्या पुरात शिवानंदसारख्या अनेक शेतकऱ्यांची स्वप्नं वाहून गेल्याचं चित्र आहे. सोलापूर- विजयपूर महामार्गावर वडकबाळ येथून सीना नदी वाहते आहे. या नदीचा पुढे हत्तरसंगकुडल येथे भीमा नदीशी संगम होतो. यंदा उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे अडीच लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले. त्यात दुसऱ्या बाजूने सीना नदीतही पाणी सोडले. त्यामुळे दोन्ही नद्या पाण्यानं वाहू लागल्या. त्यात एवढं पाणी झालं की, त्या पात्राबाहेरही पडल्या आणि जादा पाण्यामुळे पाणी आमच्या गावापर्यंत मागे सरकले. त्याचवेळी पाऊसही सुरु असल्याने वडकबाळसह वांगी, मनगोळी, हत्तूर, औराद या भागात पुराची स्थिती निर्माण झाली. त्याचाच फटका होनमाने यांच्यासह गावातील अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांना बसला.  वडकबाळच्या गावओढ्याच्या काठावरच शिवानंदची शेती आहे. आई, पत्नी आणि तीन मुलांसह शेतातल्या वस्तीवरच तो राहतो. आपल्या स्वतःची शेती बघत, कधी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी, तर कधी ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून तो काम करुन घर भागवतो. ‘‘गेल्यावर्षीही पावसाने असाच दगा दिला. आता कुणाला सांगावं, अन काय सांगू, उपयोग काय, आपलं आपल्यालाच भोग भोगावं लागणार आहे,’’ असंही शिवानंद म्हणतो.  ‘‘१४ आणि १५ ऑक्टोबरला सलग दोन दिवस झालेल्या पावसानं त्यांचं नुकसान केलं आहे. त्यादिवशी घराच्या पत्र्यापर्यंत साधारण ८ ते १० फुटापर्यंत पाणी आलं. तेव्हा शेजारच्याच्या वस्तीवर आसऱ्यासाठी गेलो. पण तोपर्यंत घरातील २ पोती ज्वारी, ३ पोती गहू पूर्ण भिजला. चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा आणि मध्ये घर अशी अवस्था होती. यंदा किमान १०० टनापर्यंत ऊस निघाला असता अन् आमची दरिद्री हटली असती, पण काय करणार,’’ अशी भावना शिवानंदने व्यक्त केली.

हत्तूर, औराद शिवारही काळवंडलं  वडकबाळच्या बाजूला असलेल्या हत्तूर, औराद, मनगोळी शिवार पिकांच्या नुकसानीनं नुसतं काळवंडलं आहे. वडकबाळमधील लाडलेमशाक शेख यांचाही नव्यानं लागवड केलेला अडीच एकर ऊस असाच वाहून गेला. आता महिनाभरापूर्वीच सप्टेंबरमध्ये त्यांनी हा ऊस लावला होता. अजून रोपे उगवायची होती. पण पुरानं शेतातील ऊसकांड्या वाहून गेल्या. हत्तूरमधील सीनानदीच्या अगदी काठावर असलेल्या विश्वभंर लकडे यांचाही दोन एकर ऊस असाच आडवा पडला आहे. त्याशिवाय त्यांच्याच बाजूला असलेल्या मदप्पा शिवगोंडा यांच्याही दीड एकर उसाची हीच स्थिती आहे. तसेच त्यांच्या तुरीचा तर नुसताच खराटा झाला आहे.

दृष्टीक्षेपात नुकसान एकूण बाधित क्षेत्रः २ लाख २९ हजार ६६१ हेक्टर पंचनामे झालेले क्षेत्रः ८५ हजार ३१९ हेक्टर प्रमुख पिकेः ऊस, कांदा, डाळिंब, तूर, सोयाबीन अन्य भाजीपाला पंचनामे पूर्णः केवळ ३७ टक्के   पंचनामे बाकीः १ लाख ४४ हजार ३४१ हेक्टरवर

प्रतिक्रिया शेती हेच उत्पन्नाचं साधन आहे. जिल्हा बँकेचं दोन लाखाचं कर्ज आहे. आता ते फेडायचं कसं, याची चिंता आहे. - विश्वंभर लकडे,  शेतकरी, हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर तुरीची अवस्था एकदम बेकार झाली. आताच शेंगा लागल्या होत्या. यावर्षी वातावरणही पोषक होतं. पण मध्येच या पुरानं नुकसान केलं. बँकांची कर्जे नाहीत, पण बाकीच्या खर्चाचं काय करायचं.  - मदप्पा शिवगोंडा,  शेतकरी, हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर

यंदा पहिल्यांदाच असा फटका बसला. महिनाभरापूर्वीच लावलेला ऊस आता वाहून गेला आहे. सगळा खर्च पाण्यात गेला आहे. आता नव्यानं करण्याची ताकद उरली नाही.  - लाडलेमशाक शेख, शेतकरी, वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com