agriculture news in marathi Huge horticulture crop loss after lockdown | Agrowon

बाजारबंदीमुळे फळपिके मातीमोल; वाहतुकीवरील निर्बंधही भोवले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील फळांच्या सर्व बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांची रोज कोटयवधी रुपयांची हानी होत आहे.

पुणे : कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील फळांच्या सर्व बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांची रोज कोटयवधी रुपयांची हानी होत आहे. नियोजन न करता सरसकट बंद ठेवलेल्या बाजार समित्या, फळांच्या मालवाहतुकीकडे सरकारी यंत्रणांनी केलेले दुर्लक्ष यातून उद्भवलेल्या समस्येमुळे शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेल्या सोन्यासारख्या फळबागांमधील मालाची माती होत आहे. काही भागांमध्ये फळे जनावरांसमोर टाकली जात आहेत. घायकुतीला आलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने तातडीने कर्जमाफी तसेच पॅकेज देण्याची मागणी राज्यातील विविध फलोत्पादक संघांनी केली आहे. 

लॉकडाऊन कालावधीत मागचा पुढचा विचार न करता राज्यातील सर्व बाजार समित्यांतील फळांचे व्यवहार बंद करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांनी नेलेला माल व्यापाऱ्यांना विकत घेता आला नाही. काही भागात विकत घेतलेला माल वाटेतच अडकून पडला. पोलिसांकडून मालवाहतुकीला रोखण्याचा प्रयत्न देशभर झाल्याने परराज्यातून फळांच्या कमिशन एजंटांनी राज्यातील फळ व्यापाऱ्यांना नव्या ऑर्डर दिल्या नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांनी शेतशिवारातील सौदेही बंद केले. द्राक्ष, केळी, डाळिंब, कलिंगड, खरबूज अशा विविध फळांच्या शिवारसौद्यांचे भाव पाडण्यात आले. फळांची विक्री साखळीच तुटल्याने रोज विविध जिल्ह्यांमध्ये कोटयवधी रुपयाची हानी फलोत्पादक शेतकऱ्यांची होते आहे.     

सोलापुरात फळे घातली जनावरांना
 सोलापूर जिल्ह्यातील फळ उत्पादकांना लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. मार्चपर्यंत द्राक्ष, डाळिंबाला चांगला दर मिळत होता. पण गेल्या पंधरवड्यात द्राक्षाला १० ते १२ रुपये आणि डाळिंबाला १० ते २० रुपये किलो इतका दर खाली आला आहे. दुसरीकडे कलिेंगड आणि खरबूज थेट जनावरांना खाऊ घातली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात द्राक्षाचे २५ हजारांहून अधिक एकर तर डाळिंबाचे ५० हजार एकर क्षेत्र आहे. डाळिंबाचा बहार बहुतेक भागात अंतिम टप्प्यात आहे. पण द्राक्ष, कलिंगड, खरबूज उत्पादकांची ऐन हंगामातच आर्थिक कोंडी झाली आहे.

खानदेशात केळी, कलिंगडाचे नुकसान
खानदेशातील प्रसिध्द केळीची बाजारपेठ कोलमडून पडली आहे.  मुंबई, पुणे तसेच उत्तर भारतात खानदेशातील केळी तसेच कलिंगड पाठवले जातात. मात्र, बाजार आवार बंद ठेवले गेल्याने बागांमध्येच माल तुंबला. लिलाव विस्कळीत झाल्याने फळांची वाहतूक बंद पडली असून मुंबई, पुण्यातील एजंट, खरेदीदारांनी गेल्या तीन आठवडयापासून फळबागांशी संपर्क तोडल्याचे चित्र आहे. मार्च व मे या दरम्यान खानदेशातून रोज ८० ते ९० टन कलिंगड पुण्याकडे, तर १९० ते २२० टन कलिंगड मुंबईला जातात. याशिवाय रोज १४ ते २३ टन केळी पुण्यात आणि ६० ते ७० टन केळी मुंबईला पाठविली जाते. परंतु बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना कोटयवधी रुपयांचा भुर्दंड बसतो आहे. 

पुणे जिल्ह्यात ३० कोटींची हानी 
लॉकडाऊनमध्ये बाजार बंद ठेवले जात असल्याने पुणे जिल्हयातील शेतकऱ्यांचे 25 ते 30 कोटीहून जादा नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.  गेल्या पंचवीस दिवसापासून पुणे जिल्हयातील बाजार समित्या चालू-बंदचा खेळ खेळत आहेत. या खेळामुळे शेतकऱ्यांचे प्रतिएकर दीड ते दोन लाख रूपयांचे नुकसान होत असल्याची शक्यता वर्तविली जातेय. फळ विक्रीचा प्रयत्न शेतकऱ्याने केला तरी वाहतुकीच्या अडचणी, ग्राहकांचा कमी प्रतिसाद, व्यापाऱ्याकडून लूट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

सांगलीत द्राक्ष उत्पादकांना ३५० कोटीचा फटका
वीस हजार एकरांवर द्राक्ष बागा असलेल्या सांगली भागातून काही दिवसांपूर्वी द्राक्षाची देशभर वाहतूक सुरु झाली. परंतू लॉकडाऊनमुळे ग्राहक नसल्याने सध्या जिल्ह्यात पाच हजार एकरांवरील द्राक्ष बागांमधील माल काढणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतीमाल अत्यावश्यक सेवेत येत असल्याने वाहतुकीला परवानगी दिली होती. मात्र, परवाना मिळत नव्हता. त्यामुळे ही द्राक्षे बागेतच राहिली. शेतकरी आता नाईलाजाने बेदाणा निर्मितीकडे वळाले आहेत. बाजार नसल्याने ३५० कोटींचा फटका बसला आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत लांडगे म्हणाले की, कोरोना संकटामुळे द्राक्ष बागेंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने कर्ज व्याजात सवलत द्यावी. हप्ते बांधून द्यावेत. यानंतर नवीन कर्ज दिले तरच शेतकरी उभा राहील.

मराठवाडयात फळांची नासाडी
लॉकडाउनमुळे मराठवाड्यात फळांच्या बाजारपेठा अस्ताव्यस्त झाल्या. खरेदी थांबली, मागणीही घटली. परिणामी दरात मोठी घसरण झाली. यामुळे शेतामध्ये फळांची नासाडी झाली आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विशेषतः कलिंगड, लिंबू, संत्रा, मोसंबी, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी तसेच हिंगोलीच्या कळमनुरी, वसमत तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीचा फटका बसला आहे. खरेदीदारच नसल्यामुळे केळीच्या घडांची झाडावरच पिकून नासाडी झाली.

अकोला जिल्ह्यात कलिंगडाचे नुकसान
अकोला जिल्ह्यात लॉकडाऊनचा फटका या कलिंगड उत्पादकांना बसला आहे. हंगाम सुरू असतानाच बाजारपेठा बंद राहिल्याने विक्रीची गोची झाली. उन्हाळ्यात जिल्ह्यात कलिंगड, खरबूजाची लागवड केली जाते. यावर्षी सलग अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे काढणीला आलेल्या फळांना तडे गेले होते. ज्या बागा वाचल्या तेथे आता लॉकडाऊनचे संकट आले. फळवाहतुकीसाठी वाहनधारक दुप्पट भाडे मागत आहेत. अशा स्थितीत शेतकरी स्थानिक व्यापाऱ्याला माल देत आहेत. काही जण शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीतही उतरले.

द्राक्ष उत्पादकांचे 1600 कोटींवर नुकसान
द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिकमध्ये लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. संचारबंदीमुळे मालवाहतुकीची अडचण, रोडावलेली व्यापारी संख्या, घटलेली निर्यात यामुळे प्रतिकिलो 40 रुपयांपर्यंत फटका बसतो आहे.यामुळे द्राक्ष उत्पादकांचे 1600 कोटींवर नुकसान झाले आहे.  नशिक भागात 58 हजार 367 हेक्टरवर बागा असून 40 टक्के माल शिल्लक असताना समस्यांची मालिका सुरू झाली. लॉकडाऊनची घोषणा होताच व्यवहार एकदम ठप्प झाले.परराज्यातील व्यापारी निघून गेले. काढणीसाठी आलेले आदिवासी भागातील मजूर परत गेले.संचारबंदी असल्याने स्थानिक फळविक्रेत्यांनी खरेदी कमी केली.त्यामुळे अजूनही 20 हजार एकरवरील माल काढणीविना पडून आहे. लॉकडाऊन घोषणेपूर्वी 40 हजार एकरवरील चार लाख टन द्राक्षे काढणीविना राहिली.  थेट विक्री, बेदाणा निर्मिती अशा पर्यायातून 50 टक्के माल शेतकऱ्यांनी खपवला. मात्र, अजून दोन लाख टन माल पडून आहे. ही संधी साधून व्यापारी वर्ग उत्पादकांची अडवणूक करीत कमी भावात खरेदी करत आहेत.

कोकणात हापूसचे दर घसरले
आंब्याच्या ऐन हंगामात कोरोनामुळे हापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.. सर्वाधिक आंबा विक्री असलेल्या मुंबई, पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊनमुळे आंबा पोहोचू शकत नाही. वाशी बाजार समिती बंद असल्यामुळे छोट्या बागायतदाराला आंबा काढणीसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. कोकणात हापूसच्या लागवडीखालील क्षेत्र दीड लाख हेक्टरपर्यंत आहे. त्यातील उत्पादीत क्षेत्र ६० टक्के आहे. मार्च-एप्रिल महिन्यात चार-पाच डझनांच्या पेटीला सुमारे तीन ते चार हजार रुपये दर मिळतो; परंतु यंदा कोरोनामुळे दोन ते अडीच हजार रुपये भाव पेटीला मिळतो आहेत.
कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संघाचे अध्यक्ष बागायतदार डॉ. विवेक भिडे म्हणाले की, यंदा कोकणात हापूसचे केवळ ४० टक्के उत्पादन होण्याची शक्यता आहे. मार्च ते जून हा मुख्य हंगाम असताना त्यात करोनाचे संकट आल्यामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे.

शेतकरी प्रतिक्रिया...
अगोदरच महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला होता. त्यात पुन्हा कोरोनामुळे फळांच्या संपूर्ण बाजारपेठ बंद पडल्या. त्यामुळे द्राक्षासहीत इतर फळांची विक्री झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आता कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी.
— मारुती चव्हाण, 
द्राक्ष उत्पादक शेतकरी, सांगली

मी अडीच एकर कलिंगडांची लागवड केली. परंतु, कष्टाने पिकवलेला माल विक्रीला जात नाही.  माल परत आणावा लागतो आहे.  त्यामुळे सव्वा लाख रुपयाचा खर्च निघणे कठीण झाले आहे.
— सुरेश घुगे,
फळ उत्पादक, पार्डी, जि. हिंगोली.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...