मानव त्यांच्या घरांपर्यंत पोचला म्हणून...

आपण केलेल्या चुकांची फळे आपल्यालाच भोगावी लागतात त्याचे जिवंत उदाहरण आज आपल्या समोर ‘कोरोना’च्या रूपाने आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी जगात वटवाघळांना दोष देण्यापेक्षा ज्या माणसाने गुहेतून त्याला बाजारात आणलं त्या मानवी वृत्तीला आपल्याला दोष द्यावाच लागेल.
मानव त्यांच्या घरांपर्यंत पोचला म्हणून...
मानव त्यांच्या घरांपर्यंत पोचला म्हणून...

आपण केलेल्या चुकांची फळे आपल्यालाच भोगावी लागतात त्याचे जिवंत उदाहरण आज आपल्या समोर ‘कोरोना’च्या रूपाने आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी जगात वटवाघळांना दोष देण्यापेक्षा ज्या माणसाने गुहेतून त्याला बाजारात आणलं त्या मानवी वृत्तीला आपल्याला दोष द्यावाच लागेल. ऐकायला नवल वाटेल अर्थात मी २००१ पासून किमान साडेसहा हजार वटवाघूळ पकडली आणि पुन्हा निसर्गात सोडली आहेत. यातील काहींचे डिसेक्शन (विच्छेदन) करून त्यांच्या जाती शोधल्या, मात्र मला कधी कोरोना या विषाणूने त्रास दिला नाही. त्याचं कारण मी काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करीत होतो. एकदा मी ‘राबर्स केव्ह’ अर्थात गुहा मध्ये वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी गेलो असता, तेथील एवढी मोठी गुहा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. तब्बल दीड ते दोन लाख वटवाघळं असणारी गुहा, एक ते दीड किलोमीटर लांबीची एवढी अफाट गुहेसमोर मी कुठलेही मास्क न वापरता थांबलो होतो. तेवढी मात्र सुरुवातीला चूक झाली, ज्यामुळे मी पुढे दहा दिवस खूप आजारी पडलो अगदी निमोनिया पर्यंत जाऊन आलो. माझं वजन ६५ किलो होतं, ते ३७ किलो झालं होतं, मात्र प्रतिकारशक्ती खूप चांगली असल्यामुळे मी वाचलो.   वीस दिवसांनंतर पुन्हा एकदा मी माझ्या संशोधनाकडे वळलो आणि शास्त्रीय पद्धतीने वटवाघळे पकडणं त्यांना निसर्गात सोडणे, त्यांच्या प्रजाती शोधणे, त्यांच्या पासून होणारे आजार याकडे बारकाईने लक्ष देत मी माझं संशोधन सुरू ठेवलं. एकदा कामाला लागलो तदनंतर मात्र खूप कमी वेळा मी आजारी पडलो, मात्र त्यावेळेस मला कोरोना झालेला नव्हता. जगात वटवाघळांची दहशत किती आहे, तर जग बंद झालं, हो जग बंद झाले आणि ते किती दिवस बंद असेल हे आज तरी कोणीही सांगू शकत नाही अर्थात बंद होणे याला कारण ही माणूसच आहे. कारण वटवाघूळ गुहेतच राहिलं असतं तर कदाचित आज आपल्याला ही वेळ आली नसती, मात्र आपल्या असंख्य चुकांमुळे अनेक आजार आपल्यापर्यंत आणले त्यातलाच हा एक आजार कोरोना. चिनी माणसाने गुहेतल्या वटवाघळे बाजारात आणली आणि बाजारातल्या वटवाघळांनी त्यांचे सूक्ष्मजीव कोरोना आपल्याला दिले यात चूक नक्कीच आपलीच आहे वटवाघळांची नव्हे, हे निमूटपणे कबूल करावंच लागेल. जगभरात वटवाघळांचे मुख्य दोन प्रकार आहेत त्यात एक फलाहारी वटवाघळं आणि दुसरी कीटकभक्षी. प्रत्येक वटवाघळांचा जगण्याचा नियम वेगळा आहे. अर्थात एक हजार पेक्षा जास्त जातीची वटवाघळे जगभरात आढळता. २० टक्के फलाहारी वटवाघळे आहेत तर ८० टक्के वटवाघळं कीटक भक्षी आहेत. गेल्यावर्षी निपाह व्हायरस आला. त्याच्या अगोदर सुद्धा अनेक प्रकारचे पक्षी व सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्याकडून आपल्यापर्यंत अनेक विषाणू पोहोचलेत, मात्र येथेही ते पोहोचण्या मागचे कारणही माणूसच आहे. आपण प्रत्येकाच्या अधिवासात जाऊन राहायला लागलो, तिथं मौजमजा करायला लागलो, त्याचे परिणाम आज आपण भोगतोय. प्रत्येक सूक्ष्म जिवाला त्याच्या मित्र प्राण्याबरोबर राहावं लागतं आणि निपाह, रेबीज, कोरोना सूक्ष्मजीव वटवाघळं बरोबर राहतात. अर्थातच प्रत्येक विषाणूला विविध प्राण्यांच्या शरीरात जगण्याचा अधिकार निसर्गानेच दिला आहे. यालाच तर सहजीवन म्हणतात. सर्व जीवसृष्टी सहजीवन जगत आहे आणि माणूस तेही सातशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या पृथ्वीवर स्वतंत्र राहतोय.  फलाहरी वटवाघळांना मुळे माणसाला निपाह किंवा रेबीज हा आजार होऊ शकतो. गेल्याच वर्षी इंडोनेशिया मधील वटवाघळांना मुळे जगात पसरण्याचा धोका होता. मात्र वेळीच सावधानता बाळगून जगाने त्यावर मात केली. आपले पूर्वज खूप हुशार होते कारण रेबीज हा आजार वटवाघळांना मुळे वन्यजिवाकडं आणि वन्यजिवाकडून आपल्यापर्यंत पोहोचतो. या गोष्टींची निरीक्षणे करून त्यांनी वटवाघळांकडे दुर्लक्ष करावं असा सल्ला दिला. त्यामुळे वटवाघळांकडे भारतात तसे पाहत नाहीत, पकडत नाहीत किंबहुना ती खातही नाहीत. मात्र, काही आदिवासी लोक फलाहारी वटवाघळांना खातात.  कोरोना विषाणूचा प्रसार कीटक भक्षी वटवाघळे करत आहेत, त्यामधील एक rhino lophous अशी प्रजातीची वटवाघळे खाल्ल्यामुळे हा आजार माणसापर्यंत पोहोचला असे म्हटले जाते. अर्थात मी जवळपास १०० पेक्षा जास्त या प्रजातीची वटवाघळे संशोधनासाठी पकडून पुन्हा निसर्गात सोडली. कीटक भक्षी वटवाघळे रेबीज आणि कोरोना अशी दोन घातक विषाणू आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. मात्र कोणाच्याही घरी येऊन त्यांनी असे आजार पसरलेत असा आजपर्यंत कुठेही लेखी पुरावा नाही आणि चर्चा सुद्धा नाही.  चीनमध्ये अनेक प्रकारचे कीटक ,पक्षी, वटवाघळे, साप, अनेक सस्तन प्राणी, खुलेआम खात असतात. खाण्यासाठी जंगलातील पकडून आणलेले प्राणी पिंजऱ्यामध्ये ठेवतात आणि त्यांची उपासमार सुरू होते. ते वन्यप्राणी आजारी पडतात. अनेक विषाणूंच्या ते भक्षस्थळी पडतात. अशातूनच चीनमध्ये पहिल्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला. यावर उपाय एकच कोरोनाला आपले शहर, गाव आणि घरात प्रवेश बंदी करावी लागेल. याकरिता प्रत्येकाने घरातच थांबावे. जंगले वाढविणे आवश्‍यक अशा समस्यांवर एकच पर्याय उरतो तो म्हणजे पृथ्वीवर जंगल अधिक असावं, त्या जंगलात इतर सर्व जीवांसमवेत सूक्ष्मजीव असावेत आणि शेवटी माणूस असावा. अर्थात गाव तिथे जंगल, शहर तिथे जंगल हीच भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. जंगल वाढवताना सुद्धा स्थानिक वृक्षसंपदा जोपासणे गरजेचे आहे. अगदी झाडे झुडपे वेली ही सगळी स्थानिक प्रजातीची असणे अत्यंत गरजेचे आहे. अत्यंत गरीब देश भूतान जगात निसर्गसंपदेने श्रीमंत आहे तिथं  जगण्यातील आनंद आणि समाधान जगात सर्वांत जास्त आहे. भारत मात्र १३७ व्या क्रमांकावर आहे ही वृत्ती आपली बदलणे अत्यंत गरजेचे आहे.  : ९९२२४१४८२२ (लेखक वटवाघूळ अभ्यासक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com