मराठवाड्यात हुमणीचा १७ हजार हेक्‍टरला फटका

मराठवाड्यात हुमणीचा १७ हजार हेक्‍टरला फटका
मराठवाड्यात हुमणीचा १७ हजार हेक्‍टरला फटका

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे काही कमी होण्याची नाव घेत नाहीत. दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना जलसंकटात ऊस जगविण्याचे आव्हान असतानाच औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात हूमणीच्या प्रादुर्भावाने सुमारे १७ हजार ४३७ हेक्‍टरवरील ऊस उलथवून टाकण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्यात हुमणीच्या प्रादुर्भावाची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र ६८ हजार ४०० हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत २०१८ मध्ये १ लाख १३ हजार ७९३ हेक्‍टरवर उसाची लागवड झाली होती. लागवड झालेल्या उसाचे क्षेत्र पाहता यंदा मोठ्या प्रमाणात गाळपासाठी ऊस उपलब्ध होण्याची शक्‍यता होती. परंतु, पावसाळ्यात पडलेल्या अत्यल्प पावसाने उत्पादकांसमोर आपला ऊस वाचविण्याचे मोठे संकट उभे केले आहे. शिवाय हुमणीच्या प्रादुर्भावानेही ऊस उत्पादकांची मोठी पंचाईत केली आहे.

लागवड झालेल्या एकूण उसाच्या क्षेत्रापैकी औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील एकूण १७ हजार ४३७ हेक्‍टरवरील उसाचे क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक १४ हजार १११ हेक्‍टरवरील ऊस बीड जिल्ह्यात हुमणीमुळे प्रादुर्भावग्रस्त झाला आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील २२५७ हेक्‍टर तर जालना जिल्ह्यातील १०६९ हेक्‍टरवरील उसाचे क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त झाले आहे. प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रापैकी जवळपास ७१८ हेक्‍टरवर उपचार करण्यात आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. प्रादुर्भावाची तिव्रता औरंगाबाद जिल्ह्यात ३ टक्‍के, जालना जिल्ह्यात ३ टक्‍के तर बीड जिल्ह्यात २८ टक्‍के नोंदली गेली आहे.

क्षेत्राच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात ३ टक्‍के, जालना जिल्ह्यात ८ टक्‍के, तर बीड जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या ५ टक्‍के क्षेत्र प्रभावीत झाले आहे. तीनही जिल्ह्यांतील २६ हजार ८७४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील २२१५०, औरंगाबाद जिल्ह्यातील २३२६ तर जालना जिल्ह्यातील २३९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात तीनही जिल्ह्यांत ६९ प्रशिक्षण घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

लातूर, उस्मानाबादमध्ये प्रादुर्भाव नाही लातूर जिल्ह्यात यंदाच्या गाळपासाठी सुमारे ४५ हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात सुमारे ४८ हजार हेक्‍टरवरील उसाचे क्षेत्र उपलब्ध असणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात यंदा हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याची नोंद झाली नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. हुमणीचा इतर जिल्ह्याप्रमाणे प्रादुर्भाव झाला नसला तरी पावसाने मारलेली दांडी उसाच्या वाढीवर व उत्पादनावर थेट परिणाम करून गेली आहे. त्यामुळे एकरी उत्पादनात ऊस उत्पादकांना फटका बसेल हे स्पष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com