येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक धोक्यात 

जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक खोडकिड्याने अधिक प्रमाणात पोखरल्याने शेतकरी या पिकावर नांगर फिरवू लागले आहेत. या तालुक्यात येऊलखेड शिवारात आत्तापर्यंत अनेक एकरातील पीक नांगरण्यात आले आहे. सध्याच्या हंगामात या शेतकऱ्यांवर दुसऱ्यांदा हे मोठे संकट आलेले आहे.
Hundreds of acres of crops are in danger in Yeulkhed Shivara
Hundreds of acres of crops are in danger in Yeulkhed Shivara

बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक खोडकिड्याने अधिक प्रमाणात पोखरल्याने शेतकरी या पिकावर नांगर फिरवू लागले आहेत. या तालुक्यात येऊलखेड शिवारात आत्तापर्यंत अनेक एकरातील पीक नांगरण्यात आले आहे. सध्याच्या हंगामात या शेतकऱ्यांवर दुसऱ्यांदा हे मोठे संकट आलेले आहे. 

येऊलखेडचा परिसर हा खारपाण पट्ट्यात मोडतो. सोयाबीनच्या प्रत्येक झाडावर खोडकिडा आढळून येत आहे. सोबतच संपूर्ण पीक पिवळे पडले आहे. या गावशिवारात शेकडो एकरातील सोयाबीन पिकावर अशी कीड असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पिकाच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला अवगत केले असून दोन दिवसांत पथक येणार असल्याचे सांगण्यात आले. येऊलखेड परिसरात या हंगामाच्या सुरुवातीला पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यामुळे पीक न उगवल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लागले होते. दुबार पेरणी साधलेली दिसत असताना त्यावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढला. या किडीने संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले आहे. 

आता पीक नियंत्रणात येण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीपासून पिकावर नांगर फिरवणे सुरू केले. पीकविमा कंपनीला सूचना दिल्याने पंचनामा करण्यासाठी आता काहींनी मोडणे थांबवले आहे. मात्र, पंचनामे होताच नांगरटी करावी लागेल असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

जिल्हाभर खोडकिड्याचा प्रादुर्भाव  जिल्ह्यात सोयाबीनची तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झालेली आहे. सोयाबीनवर यंदा खोडकिड्याचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आलेले आहे. वेळेवर उपाययोजना केलेल्या शेतकऱ्यांना किडीवर नियंत्रण मिळवता आले. तरी खारपाण पट्टयात या किडीने मोठे नुकसान केले आहे. शेतकरी आता पीक मोडू लागल्यानंतर कृषी विभाग याकडे गांभिर्याने बघू लागला आहे. 

या हंगामात समस्या आमची पाठ सोडायला तयार नाहीत. आधी निकृष्ट बियाण्यामुळे सोयाबीन दुबार पेरावी लागली. आता उगवलेले पीक खोडकिडीच्या तडाख्यात सापडले आहे. मी काल तीन एकरांतील सोयाबीन मोडले आहे. गावात ३० ते ३५ एकरांतील मोड झाली आहे. एकाच वर्षात पीक येण्यापूर्वीच दोनदा नांगर फिरवण्याची दुर्दैवी वेळ बघावी लागली.  - शशिकांत पुंडकर, शेतकरी, येऊलखेड जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com