पांगरीत पीकविमा तक्रार यादीत शेकडो शेतकऱ्यांची नावेच नाहीत

पांगरी, ता. बार्शी ः अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी वेळेत विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर तक्रार दिली. तरीही शेकडो शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झालेल्या यादीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. मात्र, विमा कंपनीचे प्रतिनिधी दाद द्यायला तयार नसल्याची स्थिती आहे.
Hundreds of farmers are not on the list of crop insurance complaints in Pangri
Hundreds of farmers are not on the list of crop insurance complaints in Pangri

पांगरी, ता. बार्शी ः अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी वेळेत विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर तक्रार दिली. तरीही शेकडो शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झालेल्या यादीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. मात्र, विमा कंपनीचे प्रतिनिधी दाद द्यायला तयार नसल्याची स्थिती आहे. 

सध्या पीक नुकसानीचे तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांमार्फत पंचनामे चालू झाले आहे. पीकविमा व पीक नुकसानीसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करताना शेतकऱ्यांचा गोंधळ उडत आहे. विमा भरतेवेळी सातबारा उतारा, ८ अ, आधारकार्ड, बॅक पासबुक हे कागदपत्रे दिली असतानाही आता पुन्हा ही कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत.

पांगरी परिसरात यंदा जोरदार पाऊस झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतास तळ्याचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणाचे सोयाबीनसह अन्य पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या काही वर्षांत दरवर्षी खरीप हंगामातील पिकास फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी पीक विमा भरतात. सोयाबीन पिकाच्या कालावधीत पावसाने ओढ दिल्याने नुकसान, तर कधी अतिवृष्टीने नुकसानीस शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

शेकडो शेतकरी पंचनाम्याविना 

मुसळधार पावसाने नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर तक्रारी दाखल केल्या. अनेकांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर तक्रारी दिल्या. नुकतीच विमा कंपनीने तक्रार दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली. मात्र त्यात वेळेत तक्रार देऊनही शेकडो शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नाहीत. त्यामुळे पंचनामे होऊ शकलेले नाहीत. यादीत नावे नसलेल्या शेतकऱ्यांची ऑफलाईन कागदपत्रे बार्शी येथे विमा कंपनीच्या कार्यालयात जमा करण्यात सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करून आर्थिक भुर्दंड बसत आहे. तक्रार देऊनही विमा भरपाईपासून वंचित तर राहणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.

ज्या शेतकऱ्यांची यादीत नावे नाहीत. त्यांची ऑफलाइन कागदपत्रे जमा करून कंपनीकडे पाठविली जातात. त्यानंतर कंपनीकडून खाली आल्यानंतर पंचनामे होणार आहेत. विमा भरतेवेळी दिलेली कागदपत्रे असतानाही कंपनीच्या प्रोसिजरप्रमाणे पुन्हा कागदपत्रे जमा करावी लागतात. - सत्यजित भोसले, तालुका विमा प्रतिनिधी 

विमा कंपनीच्या नियमानुसार पीक नुकसानीची माहिती ७२ तासांत ऑनलाइन तक्रार केली. तरीही यादीमध्ये नाव नाही. विमा भरतेवेळी कागदपत्रे दाखल केली. तरीही परत कागदपत्रांची मागणी होत आहे. बाहेरगावच्या शेतकऱ्यांना या बाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे विम्यापासून वंचित राहावे लागते.

- संतोष बाकले, शेतकरी, चिंचोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com