पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट व्यवहारांचे सत्र सुरूच; शेतकरी हैराण

तहसील कार्यालयासमोर कर्ज प्रकरणे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक सुरू आहे. असह्य उकाड्यापेक्षाही शासकीय कार्यालयातील यंत्रणेच्या भ्रष्टाचाराचा चटका अधिक बसत असल्याचे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांतून जाणवत होते...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट व्यवहारांचे सत्र सुरूच; शेतकरी हैराण
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट व्यवहारांचे सत्र सुरूच; शेतकरी हैराण

संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण ११ ची. तहसील कार्यालयासमोर कर्ज प्रकरणे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक सुरू होती. उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने स्टॅम्पसाठी शेतकऱ्यांनी सावलीचा आश्रय घेत आपला नंबर म्हणून पिशव्यांची लाइन केली. मात्र, बाहेरच्या असह्य उकाड्यापेक्षाही शासकीय कार्यालयातील यंत्रणेच्या भ्रष्टाचाराचा चटका अधिक बसत असल्याचे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांतून जाणवत होते. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तहसील कार्यालयातील हे चित्र इतर ठिकाणीही सार्वत्रिक स्वरूपाचे झालेे आहे.  जिल्हा मुख्यालयापासून साधारणपणे १०० किलोमीटर अंतरावर संग्रामपूर तालुका आहे. काही गावांमध्ये सिंचनाच्या सोयी असल्याने बागायती क्षेत्रही आहे. आगामी हंगाम तोंडावर आलेला असल्याने एकीकडे पेरणीपूर्व कामांनी वेग घेतलेला आहे तर दुसरीकडे पीककर्ज काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कसरत सुरू आहे. पीककर्जासाठी सातबारा, नमुना आठ तसेच फेरफार ही कागदपत्रे आवश्‍यक आहेत. फेरफार, स्टॅम्पपेपरसाठी शेतकऱ्यांना तालुक्याला येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे याठिकाणी एकच गर्दी होत आहे. कोरोनाच्या संकटात सामाजिक अंतरावर जोर दिला जात आहे. येथे मात्र कुणालाही त्याबाबत गांभीर्य दिसत नव्हते. 

बुधवारी (ता. २७) फेरफार काढण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर बसलेल्यांपैकी एकाला अर्जाबाबत विचारले. अर्जाचे २० रुपये आणि आजच फेरफार काढून हवा असेल तर १०० रुपये लागतील. तुम्ही स्वतः काढणार असाल तर तुमचा तुम्ही काढा. अर्जाचे २० रुपये द्या, असे त्या व्यक्तीने शेतकऱ्याला सांगितले. अर्ज लिहून शेतकरी कार्यालयात पोचला तर फेरफार संबंधित काम करणारे कर्मचारी ११ वाजून गेले तरी कार्यालयात पोचलेले नव्हते. त्याठिकाणी उपस्थित दुसऱ्या कर्मचाऱ्याला विचारले तर ते साहेब अपडाऊन करतात. येतच असतील आता, असे सांगण्यात आले. शेतकरी तहसीलदारांच्या कक्षाजवळ जाऊन त्यांच्याबाबत चौकशी करू लागला, तर साहेब आलेले नाहीत, असे सांगण्यात आले. या तालुक्याला प्रभारी तहसीलदार आहेत. हे तहसीलदार मंगळवारी बैठकीसाठी बुलडाण्याला गेले होते. ते बुधवारी दुपारपर्यंत पोचलेले नव्हते. साहेब आज आले तर दुपारी येतील किंवा येणारही नाहीत, असे याठिकाणी काही जण सांगत होते. 

पीककर्जाच्या अर्जासोबत कुणाला दोन तर कुणाला तीन स्टॅम्प पेपर जोडावे लागत आहेत. या आठवड्यात सुरुवातीला दोन दिवस स्टॅम्प पेपर उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परत जावे लागत होते. सध्या वाहने बंद असल्याने अनेक शेतकरी दुचाकीने, तर काही रणरणत्या उन्हात पायी आले होते. दोन दिवसांपासून स्टॅम्पसाठी फेऱ्या मारलेलेही बरेच जण तेथे होते. ये-जा करण्यात अनेकांना शंभर-दोनशे रुपये घालवावे लागले होते. तरीही कागदपत्रे हातात आली नव्हती. शेतकरी स्टॅम्प, फेरफार, साहेबांच्या प्रतीक्षेत तेथे थांबून होते. कोरोना लॉकडाउनमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना या संकटाच्या काळातही सरकारी यंत्रणेकडून कसलीही विशेष वागणूक मिळत नाही. भ्रष्टाचार आहे तसाच सुरू आहे आणि शेतकऱ्याची पिळवणूकही!    शेतकऱ्यांसमोरील अडचणी

  • कागदपत्रे काढताना पैशांसोबतच दिवसही जातो वाया
  • लॉकडाऊनमुळे प्रवासाची अडचण 
  • खायला प्यायलाही काही मिळत नाही
  • एका दिवसात सहजपणे कामे होत नसल्याने हेलपाटे घालण्यात वेळ व पैशांची बरबादी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com