भारतीय कृषी परिषदेला जागतिक मृदा पुरस्कार जाहीर

अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) वतीने देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘किंग भूमिबोल जागतिक मृदा दिवस पुरस्कार’ भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) जाहीर झाला आहे.
icar
icar

नाशिक: अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) वतीने देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘किंग भूमिबोल जागतिक मृदा दिवस पुरस्कार’ भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) जाहीर झाला आहे. मातीच्या आरोग्याचे महत्त्व व त्या विषयीची व्यापक जनजागृतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अन्न व कृषी संघटनेने या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. १५ हजार डॉलर आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘एफएओ’च्या वतीने २०१८ पासून हा पुरस्कार मृदा आरोग्य जनजागृतीसाठी काम करणाऱ्या वैयक्तिक व संस्थात्मक पातळीवर देण्यात येतो. थायलंड सरकारच्या कृषी व सहकार मंत्रालयाकडून पुरस्कार प्रायोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार थायलंडच्या महाराणी महाचक्री शिरींधोरण यांच्या हस्ते जानेवारी २०२१ मध्ये बँकॉक येथे प्रदान करण्यात येणार  आहे.  थायलंडच्या सरकारने प्रायोजित केलेला हा पुरस्कार अन्नसुरक्षा, दारिद्र्यनिर्मूलन, शाश्‍वत माती व्यवस्थापन आणि पुनर्वसनाचे महत्त्व जागरूक करण्याच्या योगदाबाबद्दल थायलंडचा राजा भूमिबोल अदुल्यदेज यांच्या नावाने देण्यात येतो. यापूर्वी २०१८ मध्ये क्षेत्रीय पातळीवर कार्यवाहीमुळे बांगलादेशला, तर २०१९ मध्ये ‘कोस्टा रिकॅन सॉइल सायन्स सोसायटी’ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  या वर्षीचा पुरस्कार भारतातील कृषी संशोधन परिषदेला जाहीर झाल्याने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मागील वर्षी जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने परिषदेने ‘मृदा आरोग्य जनजागृती सप्ताह’ १ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजित केला होता. ज्यामध्ये माती आरोग्याची जनजागृती यासह पर्यावरण संतुलित ठेवण्याबरोबर पीक उत्पादकता वाढ यावर जनजागृती करण्यात आली. ज्यामध्ये शास्त्रज्ञ, शासकीय संस्था, विद्यार्थी व शेतकरी अशा १३ हजार घटकांनी सहभाग नोंदविला होता. तसेच सोशल मीडियावर ‘सॉइल-अवर मदर अर्थ’ हे अभियान राबविले होते.

मृदा आरोग्यविषयक कामाची दखल ‘आयसीएआर’ने मृदा जनजागृती सप्ताहामध्ये सर्व कृषी विद्यापीठांमध्ये माहिती सत्रांचे आयोजन, शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम, प्रदर्शन, माहितीपट, क्षेत्रीय भेटी आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले. यामध्ये युवा वर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी प्रश्‍नमंजूषा, वादविवाद स्पर्धा, क्षेत्रीय प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्याद्वारे अन्न सुरक्षा आणि हवामान बदल रोखण्याच्या दृष्टीने मृदा संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यावर भर दिला. या कामाची दखल अन्न व कृषी संघटनेने घेतली असून हा पुरस्कार जाहीर झाला आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com