‘आयसीएआर’ होणार राष्ट्रीय कृषी विद्यापीठ

‘आयसीएआर’ला स्वतंत्र कृषी विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्याबाबत निश्चित काय हालचाली सुरू आहेत, हे मी आताच सांगू शकत नाही. मात्र, असा निर्णय झालाच तर जागतिक कृषी शिक्षणाच्या यादीत ‘आयसीएआर’ची जागा निश्चितच वरच्या स्थानावर असेल. ‘आयसीएआर’ विद्यापीठाचा विद्यार्थी हा अधिक दर्जेदार व जास्त आवाका असलेला असेल. - डॉ. अनंत कुमार सिंह, उपमहासंचालक, ‘आयसीएआर’
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे ः कृषी शिक्षणाला गती देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) राष्ट्रीय कृषी विद्यापीठाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे. तसे झाल्यास देशभरातील ९८ संशोधन केंद्रांमध्ये उच्चशिक्षणाची सुविधा निर्माण होईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

‘आयसीएआर’चे देशभर कृषी संशोधन केंद्राचे मोठे जाळे तयार झालेले आहे. मात्र, या संशोधन केंद्रांना विद्यार्थ्यांना स्वंतत्रपणे शिक्षण देणे किंवा पदवी प्रदान करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे ‘आयसीएआर’च्या संशोधन केंद्रांनी मध्यवर्ती विद्यापीठ किंवा अभिमत विद्यापीठाचा (डिम्ड युनिव्हर्सिटी) दर्जा प्राप्त करणे हाच एक पर्याय आहे. 

दिल्लीमधील भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय), कर्नालची राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, इज्जतनगरमधील भारतीय पशू संशोधन संस्था आणि मुंबईमधील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था अशा चार संशोधन केंद्रांनी अभिमत विद्यापीठाचा दर्जादेखील मिळवला आहे. याशिवाय इम्फाळ, पुसा, झाशीत मध्यवर्ती कृषी विद्यापीठे आहेत.  

“आयसीएआरच्या अखत्यारीत असलेल्या अनेक संशोधन संस्थांमध्ये उच्चशिक्षण किंवा संशोधनात्मक पदवी देण्याची क्षमता आहे. मात्र, चार अभिमत विद्यापीठे सोडल्यास इतर संस्थांना स्वतंत्र पदवी प्रदान करण्याचे अधिकार नाहीत. बारामतीच्या अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे. मात्र, या दर्जाची अंमलबजावणी अद्यापही करता आलेला नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. बारामतीच्या अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला अभिमत विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मान्यता मिळालेली आहे. तथापि, विद्यापीठ अनुदान मंडळाने  अद्याप दर्जा बहाल केला नाही. बारामतीच्या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा हवा असल्यास सध्याची संस्थेची मालमत्ता ही संस्थेच्या नावाने हवी, असे आयोगाचे म्हणणे आहे. ही मालमत्ता सध्या ‘आयसीएआर’च्या नावाने आहे. 

`आयसीएआर’च्या नावाने असलेल्या मालमत्ता स्वतःच्याच मालकीच्या संस्थांकडे वैयक्तिकपणे हस्तांतरित करण्यास तांत्रिक अडचणी आहेत. अभिमत विद्यापीठे स्थापन करण्यात मालमत्तेच्या हस्तांतराची अडचण येत असल्यास ‘आयसीएआर’ने स्वतःच एक विद्यापीठ म्हणून मान्यता घ्यावी, असा पर्याय पुढे आलेला आहे. पुढील काही महिन्यांनंतर तसा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे मांडला जाईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

आयसीएआरने विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करण्याबाबत उच्च पातळीवर हालचाली सुरू आहेत. तसा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे जाईल, अशी माहिती एनआयएएसएमचे कुलपती  प्रा. नरेंद्र प्रताप पाल यांनी दिली.

राज्यातील विद्यापीठांचे सध्या ‘आयसीएआर’च्या संशोधन संस्थांबरोबर करार झालेले आहेत. त्यामुळे पीएच.डी.साठी विद्यार्थी तेथे दीड वर्ष जातात. मात्र, या संस्थांना स्वतंत्र पदवी देण्याचे अधिकार नाहीत. ‘आयसीएआर’ला भविष्यात विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास कृषी शिक्षणात स्पर्धा वाढेल. दर्जेदार शिक्षण मिळेल, असे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com