'आयसीएआर'चे पुरस्कार जाहीर; 'अॅग्रोवन'चे गद्रे, इंगोलेंसह डॉ. मार्केंडेय यांचा समावेश

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) २०१९ चे प्रतिष्ठेचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील कृषी संशोधक, शास्त्रज्ञ, शेतकरी, पत्रकार यांचा या सहभाग आहे.
 'आयसीएआर'चे पुरस्कार जाहीर; 'अॅग्रोवन'चे गद्रे, इंगोलेंसह डॉ. मार्केंडेय यांचा समावेश
'आयसीएआर'चे पुरस्कार जाहीर; 'अॅग्रोवन'चे गद्रे, इंगोलेंसह डॉ. मार्केंडेय यांचा समावेश

पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) २०१९ चे प्रतिष्ठेचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. सकाळ अॅग्रोवनचे नागपुरचे वार्ताहर विनोद इंगोले यांना एक लाखाचा; तर ‘अग्रोवन'चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे व लेखक प्राचार्य डॉ.नितीन मार्कंडेय यांना संयुक्तपणे एक लाखाचा पुरस्कार मिळाला आहे.

'आयसीएआर'चा ९२ व्या स्थापनादिन सोहळा आज (ता.१६) नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी देशातील कृषी संशोधक, शास्त्रज्ञ, शेतकरी, पत्रकार यांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला व कैलाष चौधरी, 'आयसीएआर'चे महासंचालक डॉ.त्रिलोचन महापात्रा, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल उपस्थित होते.

'आयसीएआर'कडून कृषी संशोधन व विकासात्मक कृषी पत्रकारितेसाठी दिला जाणारा २०१९ चा 'चौधरी चरण सिंग पुरस्कार' विनोद इंगोले यांना जाहीर करण्यात आला. अमित गद्रे व परभणी येथील पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मार्केंडेय संपादित ‘देशी गोवंश’पुस्तकाला 'डॉ. राजेंद्र प्रसाद पुरस्कार` मिळाला आहे. कृषी व संलग्न विषयांमधील तांत्रिक माहिती देणाऱ्या हिंदी पुस्तकासाठी हा पुरस्कार दिला जातो.

'अॅग्रोवन'ने देश आणि राज्यातील देशी गोवंशाचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन या विषयावर एक विशेषांक प्रसिद्ध केला होता. यामध्ये जातिवंत दुधाळ देशी गोवंशाचे संगोपन आणि संवर्धन , खाद्य व आरोग्य व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग आणि शास्त्रीय पद्धतीने गोशाळा व्यवस्थापन अशी विविधांगी माहिती देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी या विशेषांकाचे जोरदार स्वागत केले होते. याच विशेषांकात आणखी नव्या विषयांचा अंतर्भाव करून सकाळ प्रकाशनाकडून मराठी भाषेत समग्र माहिती देणारे ‘देशी गोवंश’ पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. भारतीय गोवंशाची शास्त्रीय माहिती देणाऱ्या या पुस्तकाच्या पाच मराठी आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. सकाळ कार्यालय तसेच सकाळ पब्लिकेशन वेबसाईट आणि'अॅमेझॉन'वर पुस्तकाची मराठी व हिंदी आवृत्ती उपलब्ध आहे. याच पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'आयसीएआर'चा पुरस्कार जाहीर होताच हे पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे. 'अॅग्रोवन' परिवारातील प्रयोगशील महिला शेतकरी विद्याताई बाबूराव रुद्राक्ष यांना देखील 'आयसीएआर'चा पुरस्कार घोषित झाला आहे. डिघोळअंबा (जि.बीड) गावात एकात्मिक शेतीविकासाचे अनोखे मॉडेल उभे करणाऱ्या विद्याताईंना 'अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी अॅवॉर्ड' देत 'अॅग्रोवन'ने २०१६ मध्ये गौरविले होते. तसेच, 'आयसीएआर'ने 'पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय कृषी पुरस्कारा'साठी बारामती फार्मर्स प्रोडयुसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ते प्रयोगशील शेतकरी असून महाऑर्गेनिक अॅन्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनचे (मोर्फा) देखील प्रतिनिधी आहेत.  देशात उत्तम कार्य करणाऱ्या १४ कृषी विज्ञान केंद्रांना 'आयसीएआर'चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये अंबाजोगाई येथील ‘केव्हीके‘चा समावेश आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पुरस्कार्थींचे अभिनंदन केले. "देशाच्या कृषी क्षेत्राला आकार देण्यात या संस्था व व्यक्तींचे योगदान मोलाचे आहे," असे कृषिमंत्र्यांनी नमूद केले.  'देशी गोवंश’ पुस्तक ऑनलाईन उपलब्ध असून खरेदीसाठी पुढील लिंकला क्लिक करा..  www.sakalpublications.com /amazon.in

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com