एकात्मिक, व्यावसायिक शेतीचे आदर्श मॉडेल

Ideal model of integrated, commercial farming  
Ideal model of integrated, commercial farming  

मौजे पेठवडज (जि. नांदेड) येथील श्‍याम जोशी यांच्या एकत्रित कुटुंबाने एकात्मिक पद्धतीतून शेतीचा शाश्‍वत विकास साधला आहे. बहुविध व व्यावसायिक पिके, जोडीला पूरक व्यवसाय, सिंचन व्यवस्थापन आदींच्या उत्कृष्ट नियोजनातून परिसरासाठी आदर्श शेतीचे मॉडेल विकसित केले आहे.  नांदेड जिल्ह्यातील मौजे पेठवडज हे कंधार तालुक्यातील गाव आहे. गावात मध्यम प्रकल्प असून, सुमारे २१५ हेक्टर शेतीला सिंचन होते. पुरेसा पाऊस न झाल्यास व प्रकल्प पूर्ण क्षमतेने न भरल्यास पाणी मिळत नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, किडी-रोग आदी नैसर्गिक आपत्तींना तोंड देत तालुक्यातील शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसायांकडे वळला आहे. जोशी यांची एकत्रित शेती पद्धती

  • गावातील श्‍याम जोशी यांची २५ एकर शेती आहे. सन २००६ मध्ये कृषी विभागातून सेवानिवृती घेऊन ते पूर्णवेळ शेती करतात. मधले बंधू मोरेश्‍वर मदत करतात. धाकटे बंधू श्रीधर मुख्याध्यापक असून, त्यांचीही शक्य ती मदत होते. नोकरीत कार्यरत असल्यापासूनच श्‍याम यांनी शेतीचा विकास व प्रगतीसाठी प्रयत्न केले. त्यातूच घरची १५ एकर शेती आज २५ एकरांपर्यंत पोचली आहे.
  • जोशी यांच्या शेतीची वैशिष्ट्ये पाणी

  • मध्यम प्रकल्पातून पाइपलाइनद्वारे पाणी शेततळ्यापर्यंत आणले.  
  • तीन विहिरी व दोन बोअर्स.  
  • संपूर्ण शेती ठिबक सिंचनावर. गरजेनुसार तुषार सिंचनाचा वापर.
  • पीक पद्धती फळबागा

  • सुमारे पाच एकरांत फळबाग  
  • सन १९९५ मध्ये अडीच एकरांत चिकूच्या १०० झाडांची लागवड (कालीपत्ती). त्याचे एकरी उत्पादन- १२ ते १५ टन. जागेवरच १० ते १५ रुपये प्रति किलो दराने खरेदी.  
  • वर्षाला हे पीक सुमारे सव्वा ते पावणेदोन लाख रुपये देते.  
  • अडीच एकरांत आंबा. दशहरी, पायरी, लंगडा, निलम, तोतापुरी, केशर वाण. विक्री न करता नैसर्गिक पद्धतीने पिकवून घरी व नातेवाईक, मित्रमंडळींसाठी वापर  
  • सात वर्षांपूर्वी हिमायतबाग, औरंगाबाद येथून चिंचेच्या क्र. २६३ वाणाची ८० रोपे आणली.  
  • बाग यंदा उत्पादनक्षम होईल.
  • व्यावसायिक पिके हळद

  • तीन ते पाच एकरांत. सेलमची बेड व ठिबक पद्धतीने लागवड. एकरी ३० ते ३२ क्विंटल उत्पादन. एकूण पाच ते सात लाखांचे उत्पन्न.
  • कलिंगड

  • सुमारे पाच एकरांत बेड व मल्चिंगवर लागवड. रमजान ईद सणाचा कालावधी पाहून लागवडीचे नियोजन. एकरी १८ ते २२ टन उत्पादन. आठ रुपये प्रति किलो दर. जागेवरच खरेदी.
  • भाजीपाला

  • पाच एकरांत भाजीपाला.  
  • टोमॅटो काढणी झाल्यावर त्याच्या तारा, बांबू, मल्चिंगवर दोडका फेब्रुवारीत.  
  • टोमॅटोचे १५०० ते १६०० क्रेट उत्पादन.  
  • स्थानिकसह आंध्र प्रदेशातील बोधन, निझामबाद, नंदीपेठ येथील व्यापाऱ्यांकडून खरेदी.  
  • दोडक्याचे १५ ते २० क्रेट प्रति दिन उत्पादन. किलोला ४० रुपयांपर्यंत दर.  
  • मिरची, काकडी, पालक, कारले यांचीही १० ते १५ गुंठ्यात लागवड.
  • परिसरात सुरणाचा नवा प्रयोग

  • अकोला येथे सुरण उत्पादकांचा गट आहे. त्यांच्याकडून माहिती व सहकार्य घेऊन यंदा २० गुंठ्यात सुरणाचा प्रथमच प्रयोग केला. सात क्विंटल कंदाची ३५०० रुपये प्रति क्विटंल दराने खरेदी केली. एकरी १२० क्विंटल उत्पादन मिळाले. सध्या कंदांची साठवण केली असून ते बियाणे म्हणून वापरात आणणार आहे. क्विंटलला १५०० ते २५०० रुपये सुरणाला दर व्यापाऱ्यांनी सांगितल्याचे जोशी म्हणाले.
  • बांधावरील वनविविधता

  • संपूर्ण बांधावर सागवान, कडुनिंब, आंबा, चिंच, बोर, जांभूळ, रामफळ, कवठ यासह नाल्याच्या कडेला बांबू. या वनसंपदेमुळे कृषी पर्यावरण चांगले राहते. वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण होते. पशुपक्षी व मधमाश्‍यांचा वावर जास्त असतो. त्यामुळे वातावरणही उत्साही राहते.
  • पारंपरिक पिके

  • खरीप व रब्बीतील पिके. उन्हाळ्यात भुईमूग.
  • यांत्रिकीकरण

  • यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर. बावीस व ५५५ एचपी क्षमतेचे दोन ट्रॅक्टर्स. छोट्या ट्रॅक्टरचा वापर मशागतीसह जनरेटरसाठी तर मोठ्या ट्रॅक्टरद्वारे शेतीकामे होतात.   
  • ट्रॅक्टरचलित नांगर, पंजी, कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, रुंद सरी वरंबा यंत्र, मळणी यंत्र आहे. काही यंत्रांना कृषी विभागाकडून अनुदान मिळाले आहे. पिकअप वाहन आहे.
  • जलसंधारण

  • शेतातून वाहणाऱ्या नाल्याचे अडीच लाख रुपये स्वखर्चाने खोली-रुंदीकरण केले. त्यामुळे विहिरीची पाणीपातळी वाढली. नाल्यातील गाळ शेतात वापरला. त्याचा वापर गावातील शेतकऱ्यांनाही करता आला.
  • जनावरे संगोपन

  • सुमारे २५ जनावरे (देशी गायी) व दोन बैलजोड्या आहेत. अद्ययावत गोठा आहे. चारही बाजूंनी कुंपण करून चिंचेच्या बागेत मुक्त संचार पद्धतीने जनावरे पाळली जातात. बाजूला मजुरांना राहण्यासाठी पक्की घरे, जनावरांना पाण्याचा हौद, कडबा कुट्टी यंत्र आहे. सुदृढ वासरे सुमारे अडीच वर्षांत विक्रीयोग्य होतात. शेणापासून गांडूळखताची निर्मिती होते.
  • नयनरम्य वातावरणात वास्तू

  • एक ते दीड एकरात बाग  
  • शेतात लाकूड व बांबूंपासून टुमदार आकर्षक घर  
  • घरासमोर गणपती, शनी देव व मारुतीचे सुंदर मंदिर  
  • घराच्या पाठीमागे नैसर्गिक रचना केलेले शेड. त्यात झोपाळा व झुलत्या खुर्च्या  
  • दगडांची नैसर्गिक प्रतीकृती करून धबधबा. नागमोडी रस्ते, लाकडी कुंपण, फुले, बोगनवेल, शोभिवंत झाडांच्या कुंड्या  
  • संपूर्ण परिसराला सुंदर रंगरंगोटी. नैसर्गिक वातावरणात मन आल्हाददायक होऊन जाते.  
  • बागेतील पालापाचोळ्याचा उपयोग गांडूळखतासाठी
  • शेततळ्यात मासेपालन

  • कृषी विभागाकडून ३४ बाय ३४ बाय ४.७ मीटर आकाराचे सामूहिक शेततळे घेतले आहे.
  • त्यात यंदा रेड तिलापिया माशाचे संगोपन केले आहे. सुमारे पंधराशे मत्स्यबीजे कोलकता येथून आणली आहेत. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला आहे. सध्या ३०० ग्रॅमपुढे माशांचे वजन झाले आहे.
  • संपर्कः श्‍याम किसनराव जोशी- ९८८१४२७२७३ रमेश देशमुख- ९४२३१५६५९३ तालुका कृषी अधिकारी, कंधार

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com