तुरीचा सेंद्रिय ब्रॅंड विकसित केल्यास देशात ओळख निर्माण होईल ः डाॅ. उस्मान
तुरीचा सेंद्रिय ब्रॅंड विकसित केल्यास देशात ओळख निर्माण होईल ः डाॅ. उस्मान

तुरीचा सेंद्रिय ब्रॅंड विकसित केल्यास देशात ओळख निर्माण होईल ः डाॅ. उस्मान

परभणी ः जमीन आणि मानवाचे आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा स्वीकार करावा. त्यासाठी आवश्यक पशुधनाची संख्या वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. सेंद्रिय उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळण्यासाठी शेतमालाचे प्रमाणिकरण करणे महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातील तूर पिकाचा सेंद्रिय ब्रॅंड विकसित केल्यास शेतकरी देशात ओळख निर्माण करू शकतील, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा) येथील विभाग प्रमुख डॉ. एम. उस्मान यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे कुलगुरू डॉ. अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या संकल्पनेतून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी दोनदिवसीय निवासी प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या वेळी कृषी अभियंता डॉ. स्मिता सोळंकी अध्यक्षस्थानी होत्या. अपारंपरिक ऊर्जा विभाग प्रमुख डॉ. आर. टी. रामटेके, सेंद्रिय शेती संशोधन केंद्राचे मुख्य संशोधक डॉ. आनंद गोरे आदींची उपस्थिती होती.

डॉ. उस्मान म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये आंतरपीक पद्धती, पिकांचा फेरपालट आवश्यक आहे. सीताफळ, करंज, कण्हेर या सारख्या वनस्पतींपासून तयार करण्यात आलेली कीडनाशकांचा वापर करून कीड व रोग व्यवस्थापन करता येईल. बायोगॅस स्लरी, गांडूळखत, निंबोळी अर्क आदी जैविक निविष्ठांच्या वापरामुळे उत्पादकता वाढीस मदत होईल. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी कडवंची (जि. जालना) या गावाप्रमाणे पाणलोट विकास कार्यक्रमातून जलसंधारणाचे मॅाडेल गावोगावी तयार करणे आवश्यक आहे.

डॉ. सोळंकी म्‍हणाल्‍या, ‘‘सेंद्रिय शेतीमध्ये पशुधनाचा वापर आवश्यक असून त्यापासून केवळ निविष्ठांचाच नव्हे तर पशुधनाचा कार्यक्षम वापर केल्यास शेती कामे कमी खर्चात आणि जमिनीचे भौतिक गुणर्धम सुधारता येतील.’’

सहभागी प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रास्‍ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. डॉ. सुनील जावळे, अभिजीत कदम, प्रल्हाद गायकवाड, शीतल ऊफाडे, बाळू धरबळे, सतिश कटरे, भागवत वाघ, सचिन रणेर, द्वारका काळे, मनिषा वानखेडे, नागेश सावंत, दीपक शिंदे आदींनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com