कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २० ऑगस्टपासून आंदोलन

कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २० ऑगस्टपासून आंदोलन
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २० ऑगस्टपासून आंदोलन

अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक रखडलेली पदोन्नती प्रक्रिया व कृषी सहायकांच्या इतर अडचणींबाबत तत्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी सहायक संघटनेने दिला आहे. मंगळवारी (ता. २०) काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल, तसेच ज्या कृषी सहायकांकडे पर्यवेक्षकपदाचा अतिरिक्त पदभार आहे तो सोडून देण्यात येईल. याबाबत अमरावती विभागीय सहसंचालकांना नुकतेच मागण्यांचे निवेदन संघटनेचे विभागीय सचिव उमेश वानखडे यांनी दिल्याची माहिती कोशाध्यक्ष अनंत देशमुख यांनी दिली. याबाबत संघटनेने म्हटले आहे की, अमरावती विभागात २०११ मध्ये कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षकपदावर पदोन्नत्या झाल्या. तेव्हापासून कृषी सहायक पदोन्नती एक दिवास्वप्न ठरली. सदरील पदोन्नती प्रक्रिया २०११ च्या अंतरिम ज्येष्ठता यादीच्या आधारे तदर्थ पदोन्नती देऊन करण्यात आली होती. ज्येष्ठता सूची ही २७ आॅक्टोबर २०१५ ला प्रमाणित करून अंतिम करण्यात आली. ही सूची प्रमाणित मानल्यास सन २०११ मध्ये देण्यात आलेल्या तदर्थ पदोन्नत्या या चुकीच्या पद्धतीने झाल्या, असे लक्षात येते. २७ आॅक्टोबर २०१५ च्या ज्येष्ठता यादीच्या आधारे झालेली पदोन्नती प्रक्रिया नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून सुरळीत होणे गरजेचे होते. परंतु, आजपावेतो ही प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे अमरावती विभागातील कृषी सहायकांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ही प्रक्रिया सुरळीत करण्याच्या हेतूने सन २०१८ मध्ये आपण चुकीच्या पद्धतीने पदोन्नती झालेल्या कृषी पर्यवेक्षकांना पदावनत करण्याचा प्रयत्न केला.  संबंधित कृषी पर्यवेक्षक न्यायालयात गेले. २० जूनला हे प्रकरण सामंजस्याने निकाली काढण्याच्या हेतूने कृषी सहायक संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना व न्यायालयात गेलेल्यांची सभा घेतली. त्या वेळी प्रकरण न्यायालयातून मागे घेण्याचे आवाहनही केले. मात्र, हे प्रकरण प्रलंबित राहलेले आहे. दरम्यान, १७ जुलैला कृषी आयुक्तालयाने अमरावती विभागातील कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षकपदावर तत्काळ पदोन्नती देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत कळविले. मात्र, या कार्यालयाकडून न्यायालयीन प्रकरणाचा संदर्भ देऊन प्रक्रियेबाबत टाळाटाळ केली जात आहे. तरी, रखडलेली ही प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. कृषी सहायकांच्या इतर मागण्या

  • सातव्या वेतन आयोगानुसार कृषी सहायकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा
  • पीककापणी प्रयोगाचे वाटप मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावे
  • कृषी सहायकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात पोकरा योजनेसाठी मुख्यालयातील रिक्त पदे भरावीत
  • कृषी विभागबाह्य कामे व नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल यंत्रणेचा दबाव कमी करावा   
  • असे असेल आंदोलन

  • २० ऑगस्ट - काळ्या फिती लावून कामकाज, पर्यवेक्षकपदाचा पदभार सोडणे
  • २१ ऑगस्ट - कार्यालयांसमोर धरणे आंदोलन
  • २२ ऑगस्ट - कृषी सहसंचालकांच्या कार्यालयासमोर धरणे
  • २६ ऑगस्टपासून - सहसंचालक कार्यालयासमोर साखळी उपोषण, सर्व योजनांच्या आॅनलाइन कामावर बहिष्कार  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com