निवडणुकीमुळे जळगावातील कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष

निवडणुकीमुळे जळगावातील कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष
निवडणुकीमुळे जळगावातील कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष

जळगाव : कमी दर, वाढता मजुरी खर्च आणि वाढत्या उन्हामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंताग्रस्त आहेत. उन्हाळ कांदा काढणीस सुरवात झाली आहे. मात्र, अपेक्षित दर नाहीत. निवडणुकीच्या धामधूमीत नेत्यांचे, प्रशासनाचे कांदा उत्पादकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्‍टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली. कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी रोपवाटिका, लागवड, फवारण्या, रासायनिक खतांवर मोठा खर्च केला. यंदा पाणीटंचाईचा फटका उन्हाळ कांदा लागवडीला बसला आहे. काही शेतकरी कांदा काढण्यासाठी कार्यवाही करीत आहेत. काहींचे पीक अजून काढणीयोग्य नसल्याची स्थिती आहे.

राज्य शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात हे अनुदान काहींना मिळाले, तर काहींना मिळाले नसल्याची स्थिती आहे. कांद्याला चाळीसगाव, जळगाव, चोपडा, धुळे, साक्री (जि.धुळे) आदी बाजार समित्यांमध्ये सुमारे ७०० रुपयांपर्यंतचे कमाल, तर किमान दर २५० रुपयांपर्यंत आहेत. ते अनुक्रमे १५०० पर्यंत आणि ४०० पेक्षा कमी नको, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सर्वत्र उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. ४१ अंश सेल्सीअसवर तापमान पोचू लागले आहे. उष्णतेमुळे कांदा पक्व होण्याची प्रक्रिया मंद झाली आहे. काढणी लांबणीवर पडू शकते. चाळीतील कांदा सडण्याची शक्‍यता आहे. कांदा उत्पादक मागील सहा-सात महिन्यांपासून नाराज आहेत. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. परंतु कांदा उत्पादकांची समस्या, नाराजी लक्षात घ्यायला कुणी नाही.

व्यापारी, शेतकऱ्यांची बैठक घ्या चाळीसगाव, जळगाव, चोपडा, यावल भागात कांदा लागवड अधिक आहे. या तालुक्‍यात कांदा उत्पादकांच्या समस्यांबाबत कार्यवाही करावी. व्यापारी-शेतकरी यांच्यात बैठक घ्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com