गुजरातमधील बीटी बियाण्यांची बुलडाण्यात मोठ्या प्रमाणावर विक्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः कापूस हंगामाला सुरवात झाली असून, अनेकांनी प्री-मॉन्सून बीटी कापूस लागवडीस प्रारंभ केला. बुलडाणा जिल्ह्यात सातपुड्याला लागून असलेल्या भागात गुजरातमधील बीटी बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. काही बियाण्यांची मूळ किमतीपेक्षा दीडपटीने ‘ऑन’वर विक्री केली जात आहेत. या बियाण्यांचे कुठलेही बिल शेतकऱ्यांना दिले जात नसून, जिल्ह्याची गुणनियंत्रण यंत्रणा मात्र हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. जिल्ह्यात अद्याप एकाही ठिकाणी कोणतीच कारवाई झालेली नाही. 

बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यांत कापसाची लागवड केली जाते. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्य शासनाने बोंड अळीला प्रतिबंध घालण्यासाठी बीटी कपाशी बियाण्याची विक्री २५ मेपर्यंत थांबविली होती. याच संधीचा फायदा गुजरातमधील कंपन्यांनी घेतला. या कंपन्यांनी एजंटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून आपले बियाणे विक्री केले.  हे बियाणे घेणाऱ्याला कुठलेही बिल दिले जात नाही. भविष्यात बियाण्याबाबत कोणत्याही अडचणी तयार झाल्या तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.  

खासगी लोकांच्या माध्यमातून हा अवैध बियाणे विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. याचा फटका जिल्ह्यातील बियाणे विक्री करणाऱ्यांना बसतो आहे. कृषी विभागाची यंत्रणासुद्धा हा प्रकार थांबविण्यास हतबल आहे. बोंड अळी निर्मूलनासाठी कृषी विभाग उपाययोजनांबाबत युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु या संधीचा लाभ गुजरातमधील बीटी बियाणे उत्पादक कंपन्या घेत आहे. चोरट्या मार्गाने हे बियाणे विकले जाते. त्यासाठी मोठी साखळी काम करीत आहे. 

राज्यात बियाणे विक्रीची परवानगी असणाऱ्या कंपन्यांच्या पाकिटावर मराठीत मजकूर असतो. गुजरातमधील या बियाण्यांच्या पाकिटावर इंग्रजी भाषेत मजकूर छापलेला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी राज्यात बियाणे विक्रीची कुठलीही परवानगी घेतलेली नाही हे स्पष्ट होते. शिवाय या पाकिटांवर संपर्कासाठी दिल्या जाणाऱ्या मोबाईलवर संपर्क साधला असता ग्राहकाला गुजरातमध्ये बियाणे मिळेल. तुम्ही ऑनलाइन मागवू शकता, असे सल्ले दिले जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com