राज्यातील डेअरी उद्योग ‘कोरोना’च्या तडाख्यात

कोरोनाचे वातावरण आणि कोसळलेला जागतिक बाजार यामुळे डेअरी उद्योग संकटात आहे. दुधाच्या प्रक्रिया उत्पादनांना सध्या मागणी शून्य टक्के आहे. पावडरची मागणीही शून्य टक्के आहे. दुधाच्या मागणीत २० टक्के घट आली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे दुधाच्या खरेदीदरात दोन-तीन रुपयांची घसरण शक्य आहे. — श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग
milk_collection
milk_collection

पुणे : राज्यातील डेअरी उद्योगावर ‘कोरोना’ची काळी छाया पसरली असून, दुधाचे दर कोसळण्याची चिन्हे आहेत. कोट्यवधी रुपयांचे पडून असलेले दूध पावडरचे साठे, प्रक्रिया उत्पादनांची घटलेली मागणी आणि पिशवीबंद दुधाच्या मागणीत ४० टक्के घट झाल्याने अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.   महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दूध व्यवसायावर आलेल्या संकाटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची आम्ही काळजी घेत आहोत. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दुधाला आतापर्यंत ३२ रुपये प्रतिलिटर दर दिला गेला. मात्र कोरोनामुळे दुधाचे दर कमी करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही,” असे संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. राज्यातील डेअरीचालक सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर ३२ रुपये खरेदीदर देत आहेत. त्यात पुन्हा वितरकांना चार रुपये कमिशन दिले जाते. यात पॅकिंग खर्च आणि नफा ठेवून ग्राहकांना सध्या दुधाची पिशवी ४५ रुपयांच्या पुढे ग्राहकांना दिली जाते. दिल्लीत ‘अमूल’कडून म्हशीचे पिशवीबंद दूध प्रतिलिटर ५७ रुपये, तर गाय दूध ४७ रुपये दराने विकले जात आहेत. दुधाला मागणी असल्याने व दूध पावडरचे बाजार आधी तेजीत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर देता येत होता. मात्र कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे.  “दुधाचे खरेदी दर ३२ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत जातील. तसेच एप्रिलमधील जगभर स्थिती काय असेल त्यानुसार दुधाचे दर ठरतील. कोरोनामुळे दूध पावडरची निर्यात ठप्प झाली असून  हे चित्र न बदलल्यास दुधाचे खरेदी दर अजून कमी होऊ शकतात,” अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. पावडर प्लांटचालकांना मोठ्या संकटाला सामना करावा लागत असून, बिस्किट कारखाने, आइस्क्रीम उद्योग, बेबी फूड या सर्व उत्पादनात दूध पावडर वापरली जाते. पावडरची मागणी ९० टक्के कमी झाली असून, हॉटेल्स व दुकाने बंद असल्याने पिशवीबंद दूध विक्रीत ४० टक्क्यांनी घटले आहे. श्रीखंड, पनीर अशा प्रक्रिया उत्पादनांच्या मागणीत ८० टक्क्यांपेक्षा घट झाली आहे.  जीवनावश्यक बाबींमध्ये दुधाचा समावेश होतो. पण दुधाचा संपूर्ण उद्योग संकटात आलेला आहे. कारण देशांतर्गत पावडर वापर करणाऱ्या व्यावसायिकांकडून पावडर मागणीत ९० टक्के घट झाली आहे. त्यामुळे राज्यात पावडरचे मोठे साठे तयार झालेले आहेत. पावडरला मागणी नसल्यास शेतकरी दुधाला देखील भाव कमी मिळतात. जागतिक स्तरावर पावडरच्या किमती आता २५० रुपये प्रतिकिलोवरून १६० रुपयांपर्यंत आलेल्या आहेत. दुधाची पावडर आयात देखील करतात. २५० रुपये किमतीची पावडर आयात करण्यासाठी ६० टक्के कर दिल्यानंतर त्याचे मूल्य ३६० ते ३७० रुपये पडत होते. त्यामुळे भारतीय व्यावसायिक विदेशातील दूध पावडरऐवजी देशातील पावडर वापरत होते. ही देशी पावडर ३३५ रुपये दराने विकत घेणे परवडतदेखील होते. श्री..कुतवळ यांच्या म्हणण्यानुसार, आता जागतिक दूध पावडरचे बाजार १५५ रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. त्यावर ९० रुपये आयातकर भरला तरी विदेशी दूध पावडरची आयात २५० रुपयांपर्यंत जाते. म्हणजेच साधारणतः ८० रुपयांनी दर कमी झाले आहेत.  देशांतर्गत पावडरचे दर प्रतिकिलो ६० रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे प्रतिकिलो ३३० ते ३३५ रुपये असा पावडरचा दर मिळेल हे गृहीत धरून पावडरचा स्टॉक करणारे युनिट कोरोनानंतर आता कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करणार आहेत.  दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुधाची शीतकरण केंद्रे, तसेच खरेदी- विक्री देखील अमूलकडून बंद ठेवली जाणार असल्याची अफवा पसरली होती. ‘‘ही अफवा असून अमूल अजून वेगाने दूध खरेदी करीत आहे,”असे अमूलच्या सूत्रांनी स्पष्ट केले.  दूध व्यवसायावर परिणाम

  • जगभरातील स्थितीनुसार दर ठरतील
  • कोरोनामुळे दूध पावडरची निर्यात ठप्प 
  • देशांतर्गत दूध पावडरच्या मागणीत ९० टक्के घट
  • पिशवीबंद दूध विक्री ४० टक्क्यांनी घटली 
  • प्रक्रिया उत्पादनांची मागणी ८० टक्के घटली 
  • दर कमी केल्याशिवाय पर्याय नाहीः राज्य दूध संघ
  • प्रतिक्रिया राज्यात मोठ्या कष्टाने उभा राहिलेला डेअरी उद्योग मोठ्या संकटाच्या तोंडावर उभा आहे. शेतकऱ्यांकडून येणाऱ्या ५० टक्के दुधाची विल्हेवाट कशी लावायची अशी चिंता आहे. पावडर, प्रक्रिया माल, आइस्क्रीमची मागणी शून्यावर आली आहे. ३०० कोटी रुपयांची १० हजार टन पावडर पडून असल्याने दुधाचे खरेदी दर कमी होतील. — दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई डेअरी उद्योग

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com