ताकारीच्या बंदिस्त पाइपलाइनचे काम निकृष्ट

 Impaired work of Takari's closed pipeline
Impaired work of Takari's closed pipeline

देवराष्ट्रे, जि. सांगली : कडेगाव तालुक्‍यातील देवराष्ट्रे ते जाधवनगरदरम्यान सुरू असलेले ताकारी योजनेचे बंदिस्त पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार शेतकऱ्यानी उघडकीस आणला असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

कडेगाव तालुक्‍यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव, खानापूर तालुक्‍यातील जाधवनगर बलवडी, पलूस तालुक्‍यातील पलूस, कुंडल, आंधळीसह कोयना वसाहत आदी गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी या बंदिस्त पाइपलाइनचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. त्यासाठी शासनाकडून ११ कोटी ८२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामधून पाइपलाइनचे काम करण्यात येईल. लाभक्षेत्रातील २७ ठिकाणी चेंबरद्वारे पाणी वितरित करण्यात येईल.

या कामात ठेकेदाराकडून सुरवातीपासूनच हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पाइपलाइनच्या कामासाठी ठेकेदारांनी सुरवातीला देवराष्ट्रे कुंडल रोड बेकायदा उकरला. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास येताच अधिकाऱ्यांकडून हे काम बंद करण्यात आले. त्यानंतर बंदिस्त पाइपलाइनचे काम करीत असताना जमीन उकरून सिमेंट पाइप बसवण्यात येतात. जमिनीमध्ये कठीण दगड असलेल्या ठिकाणी मुरमाचे अस्तरीकरण करून त्यावर सिमेंट पाइप बसवण्यात येतात.

या कामामध्ये अनेक ठिकाणी कठीण दगड आहेत. त्या ठिकाणी मुरमाचे अस्तरीकरण करूनच पाइप बसविणे गरजेचे होते. मात्र ठेकेदाराने मुरूम न पसरता कठीण दगडावरच सिमेंट पाइप बसविले. त्यामुळे भविष्यात पाइपला धोका निर्माण झाला आहे.  याबाबतची तक्रार केली, त्यावेळी अधिकाऱ्यांनीही काही ठिकाणी पाइपखाली मुरूम पसरला नसल्याचे मान्य केले. ठेकेदाराला पाइप काढून मुरूम अस्तरीकरण करण्याच्या सूचना दिल्या, तरी या कामामुळे दोन ते अडीच हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com