केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा : खासदार हेमंत पाटील

Implement the Center's plans : MP Hemant Patil
Implement the Center's plans : MP Hemant Patil

हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने कामे करावीत. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी’’, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष, खासदार हेमंत पाटील यांनी दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. २७) झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, ‘‘केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागांतील सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी ४३ योजना आहेत. निधीचे विकेंद्रीकरण न होता या योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत उपलब्ध निधीतील तरतुदीतून विविध योजना राबविण्यात येतात. योजनानिहाय देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित रस्त्यांची माहिती सादर करावी. सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेने एकत्रपणे ग्रामीण भागातील पांदण रस्ते तयार करावे.’’ 

जयवंशी म्हणाले, ‘‘एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि केंद्र पुरस्कृत योजना जिल्ह्यात राबविताना सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवावा. सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळे मिळालेला निधी विकासकामांवर वेळेत खर्च होण्यास मदत होईल.’’

रिक्त पदांची माहिती द्या

‘‘नरेगांतर्गत जिल्ह्यात विविध कामे योग्य रितीने करावी. केंद्र शासनाकडून विविध योजनांतर्गत जिल्ह्यासाठी जो निधी येणे बाकी आहे, त्याबाबतची माहिती सादर करावी. हा निधी प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यात न सुरू झालेल्या कार्यालयांची आणि जिल्ह्यातील विविध विभागांतील रिक्त पदांची माहिती सादर करावी,’’ अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com