जाणून घ्या बेल वृक्षाचे महत्त्व..

bell tree
bell tree

डोळ्याचे विकार, ताप, श्वसनमार्गाला सूज येणे आणि शरीरावरच्या जखमांवरील उपचारात बेलाच्या पानांचे गरम पोटीस बांधतात. ताप, थंडी आणि अस्थमा या विकारांमध्ये कोठा हलका करण्यासाठी पानांचा ताजा रस मधासोबत घेतात.  वनस्पती शास्त्रीय नावः एजल मारमालेस (लॅ.) कोरिया इंग्रजी नावः बेंगाल क्विन्स  स्थानिक नावः बेल (हिंदी, मराठी), बिल्व (संस्कृत) बेल आणि शिव यांचा प्राचीन काळापासून संबंध आहे. उंच, ताठ आणि दिसायला साध्या असलेल्या या झाडाचे त्रिदलपत्र हे शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहे. बिल्वपत्राने पाणी शिंपडलेला नैवेद्य नेहमी ताजा राहतो असे मानतात. बिल्व हा संस्कृत शब्द तर शिवशंकराचेच एक नाव आहे.  या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग यज्ञस्तंभासाठी केला जातो. सूर्याने पुन्हा दर्शन दिल्यानंतर बिल्व वृक्ष उगवला, असा उल्लेख यजुर्वेदात आहे. (२०.१.८) हा वृक्ष इतका पवित्र आहे की त्याचे लाकूड इंधन म्हणून जाळले जाऊ नये. (अथर्ववेदा २०.१३६.१३). या झाडाच्या ताइताच्या गुणांची स्तुती करणारे (इरा-मणी बिल्व) एक स्तोत्र सांख्यायन अरण्यका''त (१२.२०) आहे.  ''ऐतरेय ब्राहृणा''तही (२.१) या झाडाचा उल्लेख आहे. या झाडाच्या लाकडापासून यज्ञस्तंभ केल्याचा उल्लेख `शतपथ ब्राम्हणा''त (१३.४,४,८; १.३.३.२०) व ''तैत्तिरीय संहिता'' (२.१.८.१, २) मध्ये आढळतो.   वाल्मीकी रामायणातील उल्लेख

  • यज्ञस्तंभ म्हणून या वृक्षाचे सहा खांब उभारले होते (१.४.२२). दाट जंगलात हा वृक्ष आढळतो (१.११.४७). याचे फळ खाण्याजोगे असते. चित्रकूटच्या जंगलात हा वृक्ष फळाफुलांनी बहरलेला होता (२.९४.८), हा जंगलाच्या अंतर्भागात आढळणारा वृक्ष आहे (४.११.४७), आणि लंकेपर्यंत घेऊन जाणारा समुद्रावरचा सेतू बांधण्यासाठी ज्या झाडांचे लाकूड वापरले गेले, त्यापैकी हा एक आहे (६.२२.५५). ''अरण्यकांडा''मध्ये रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर सीतेला शोधण्यासाठी राम सैरावैरा हिंडत प्रत्येक झाडाला, झुडपाला आणि प्राण्यापक्ष्यांना तिच्याविषयी विचारत होता. त्याने बिल्व वृक्षाला विचारले, "अरे बिल्व वृक्षा, जर तू पिवळी, रेशमी वस्त्रे परिधान केलेल्या, तुझ्या पानांप्रमाणेच रेशमी चकाकी असलेल्या कांतीच्या कुणाला पाहिलेस तर मला सांग'' (३.६०.१३). ''किष्किंधा कांडा''त (४.१.७८), पंपा सरोवर आणि अरण्यातील अनेक झाडांच्या वर्णनात बिल्व वृक्षाचाही उल्लेख आहे. 
  • आदिवासी परंपरा

  • पूर्व भारतातील जंगलांचे राखणदार असलेल्या संथालांची बिल्व वृक्ष ही कुलदेवता आहे (पटनाईक १९९३, १५).  
  • बिहार आणि उत्तर प्रदेशात आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून स्त्रिया या झाडाची पूजा करून त्याला आलिंगन देतात. शिवभक्त आपल्या शिखेला या वृक्षाची पाने बांधतात, कारण ही पाने त्यांच्या दैवताला प्रिय आणि पवित्र वाटतात (गांधी आणि सिंग १९८९, ७५-८०).  
  • मध्य भारतातील गुरिया ही गारुडी जमात सर्पदंश बरा करण्यासाठी बिल्व वृक्षाला आणि देवांचा वैद्य असलेल्या धन्वंतरीला साकडे घालते. (एस.एम.गुप्ता १९९१, १६).  
  • बेलाचे उन्मळून पडलेले झाड इंधन म्हणून न वापरण्याची परंपरा आहे. बेलाचे फळ शिवाच्या शिरांचे प्रतीक मानले जात असल्यामुळे केरळचे लोक ते कधीच खात नाहीत.   
  • श्रावण महिन्यातील सोमवारी बेलाची पाने शंकराला वाहण्याची पद्धत आहे. या झाडाचे लाकूड होमामध्ये वापरतात. (एस.एम.गुप्ता १९९१, १७).
  • औषधी उपयोग

  • डोळ्याचे विकार, ताप, श्वसनमार्गाला सूज येणे आणि शरीरावरच्या जखमांवरील उपचारात बेलाच्या पानांचे गरम पोटीस बांधतात. ताप, थंडी आणि अस्थमा या विकारांमध्ये कोठा हलका करण्यासाठी बेलाच्या पानांचा ताजा रस मधासोबत घेतात. काविळीवरच्या उपचारांमध्ये पानांच्या रसात काळ्या मिरीची पूड टाकून तो पितात. (दस्तूर, १९६२, १०-११).   
  • अस्थमा झालेल्या व्यक्तीला कफ बाहेर पडावा म्हणून बेलाच्या पानांचा रस देतात. बेलाची कोवळी पाने भाजून ती डोळे आल्यावर, डोळ्यांवर ठेवतात. शिवाय गुप्तरोगांवरच्या उपचारातही हीच भाजलेली पाने उपयुक्त ठरतात. भाजलेल्या पानांचा रस काढून तो दिवसातून दोनदा याप्रमाणे २१ दिवस घेतला तर पित्तदोष कमी होतो (षण्मुगम, १९८९, ४३).  
  • अतिसार, उलट्या, तोंड कोरडे पडणे यांसारख्या तक्रारींवर बेलाची फुले उपयोगी असतात. बेलफळ ठेचून त्याचा अंदाजे ३ ग्रॅम लगदा म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या दह्यात मिसळून घेतला तर पोटदुखी, अपचन व जुलाबाचा त्रास कमी होतो. पिकलेल्या बेलफळाचा लगदा दुधात मिसळून अंघोळीपूर्वी सर्वांगाला लावल्यास शरीराला थंडावा मिळतो. डोळ्यांनाही ताजेपणा जाणवतो.   
  • बेलफळात आले आणि मेथीचे दाणे घालून त्याचा अर्क तयार केला तर मूळव्याधीचा आजार बरा होतो. बेलफळांपासून मिळणारे एक औषध अतिसाराचा जुना आजार, जुलाब, रक्तस्त्राव आणि सूज येण्यावर गुणकारी आहे.   
  • अधूनमधून सतत येणारा ताप आणि प्रचंड औदासिन्य, मानसिक हतबलता यांसारख्या मनोविकारांमध्ये बेलाच्या झाडाच्या मुळांचा उपयोग केला जातो.   
  • बस्तरचे आदिवासी ताप कमी करण्यासाठी मुळांच्या सालीचा अर्क पितात. (जैन १९६२, १२६-२८).   
  • बेलाच्या झाडाची पाने, फळ आणि मूळ यांच्यातील प्रतिजैविक गुणधर्म आधुनिक संशोधनामध्ये पुढे आले आहेत. बनारस हिंदू विश्वविद्यालय, केरळ विद्यापीठ आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या तीन संस्थांमधील वैज्ञानिकांनी, बेलाच्या झाडाची पाने, मूळ, साल आणि कोवळी आणि पिकलेली फळे मानसिक आजार, अल्सर आणि त्वचाविकार बरे करत असल्याचे सिद्ध केले. (वॉरिअर, नंबियार आणि रमणकुट्टी १९९४, ६२).  
  • तिरुवेलवीकुडी येथील पारंपरिक औषध पुरवणारे जय वैद्यनाथन यांच्या म्हणण्यानुसार, बेलाची पाने खाल्ल्याने स्त्रियांतील गर्भधारणेसंदर्भातील समस्या कमी होण्यास मदत होते.   
  • पायात पेटके आल्यास, बेलाच्या पानांचा अर्क काढून त्यात तिळाचे तेल मिसळून अंघोळीपूर्वी पायांना चोळतात.   
  • अल्सर बरे करण्यासाठी या अर्कात एरंडाचे तेल आणि साखर मिसळून नियमितपणे घेतात.   
  • तांब्याच्या भांड्यामध्ये बेलाच्या झाडाची साल आणि मूळ रात्रभर भिजवून ठेवून ते पाणी पिल्यास रक्तदाब, अस्थमा आणि कुष्ठरोग या आजारावर उपयुक्त ठरते.   
  • आज महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाप्रमाणेच प्रत्येक झाडाच्या संरक्षणाचा विचार केला पाहिजे. त्यालाही माणसाप्रमाणेच एक जिवंत अस्तित्व आहे, हे लक्षात घ्यावे. 
  • संपर्कः डॉ. रजनी जोशी, ९९२१०७७६२३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com